‘सुख्खूजींचा सामोसा कोणी खाल्ला ?’
हिमाचल प्रदेशात रंगले सामोशाचे राजकारण, सीआयडीकडून चौकशी होण्याची शक्यता
वृत्तसंस्था / शिमला
हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदरसिंग ऊर्फ सुख्खू यांच्यासाठी तयार करण्यात आलेले सामोसे त्यांच्या सुरक्षा रक्षकांना दिले गेल्याचे प्रकरण चांगलेच रंगले आहे. हा प्रकार 21 ऑक्टोबरला घडला होता. आता या प्रकाराची राज्याची गुप्तचर संस्था सीआयडीकडून चौकशी होण्याची शक्यता व्यक्त होत असल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. राज्यात विरोधी पक्षात असणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या हाती यामुळे आयते कोलित लागले आहे.
भारतीय जनता पक्षाची युवक शाखा असणाऱ्या भारतीय जनता युवा मोर्चाने शनिवारी या प्रकरणाच्या संदर्भात ‘सामोसा मोर्चा’चे आयोजन केले होते. या प्रकरणाच्या सीआयडी चौकशीचा विचार सुरु असल्याचे वृत्त आल्याने हा मोर्चा आयोजित करण्यात आला होता, असे या युवा संघटनेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री सुखविंदरसिंग सुख्खू हे हिमाचल प्रदेशची राजधानी शिमला येथील सीआयडी कार्यालयाला भेट देण्यासाठी गेले होते. तेव्हा त्यांच्यासाठी सामोसा आणि खाण्याचे काही पदार्थ मागविण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात ते पदार्थ त्यांना न देता त्यांच्या सुरक्षा रक्षकांना देण्यात आले. त्यामुळे मोठाच गोंधळ उडाला होता.
चौकशी कशासाठी...
या प्रकरणाची चौकशी करण्याइतके ते गंभीर आहे काय, हा प्रश्न भारतीय जनता पक्षाने उपस्थित केला आहे. मुख्यमंत्र्यांसाठी विशेषत्वाने आणण्यात आलेले पदार्थ त्यांच्या सुरक्षा रक्षकांना दिले गेल्याने असे काय आकाश कोसळले आहे की ज्याची चौकशी होणार आहे ? हा प्रकार अनावधानाने घडला आहे की त्यामागे मुख्यमंत्र्यांना खजील करण्याचा हेतू होता, हे मात्र स्पष्ट झाले पाहिजे, अशी मागणी भारतीय जनता पक्षाकडून शनिवारी करण्यात आली आहे.
मुख्यमंत्र्यांकडून सारवासारवी
मुख्यमंत्री सुखविंदरसिंग सुख्खू यांनी सीआयडी चौकशी संबंधी सारवासारवी करताना ही चौकशी या प्रकारासंबंधी नाही, असे स्पष्ट करण्याचा प्रयत्न चालविला आहे. या चौकशीचा आदेश एका वेगळ्या कारणासाठी देण्यात आला आहे. हा बेशिस्तीचा प्रकार असून या बेशिस्तीची चौकशी सीआयडीच्या माध्यमातून केली जाणार आहे. सामोसा सुरक्षारक्षकांना दिल्याच्या प्रकरणाची नाही. प्रसारमाध्यमांनी खोडसाळपणाने या चौकशीचा संबंध या प्रसंगाशी जोडून विनाकारण लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न चालविल्याचा आरोप सुखविंदरसिंग यांनी केला.
जयराम ठाकूर यांची टीका
या प्रकरणासंदर्भात हिमाचल प्रदेशातील विरोधी पक्ष नेते जयराम ठाकूर यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. या प्रसंगामुळे काँग्रेस सरकारच्या सीआयडी कार्यालयातच किती अनागोंदी कारभार चालतो, हे जगासमोर आले. त्यानंतर काँग्रेसने या प्रकाराची चौकशी याच सीआयडीकडे सोपविल्याने या अनागोंदीचा कळस गाठला गेला आहे. या प्रकरणाला अवाजवी प्रसिद्धी काँग्रेसच्याच गोंधळामुळे मिळाली आहे. यात विरोधी पक्ष किंवा वृत्तपत्रांचा काही दोष नाही. त्यामुळे त्यांच्यावर राग धरण्यात काहीही अर्थ नाही, असे प्रतिपादन त्यांनी केले.
राजकीय हेतू नाही
हिमाचल प्रदेशचे सीआयडी प्रमुख संजीव रंजन ओझा यांनी सीआयडी चौकशीमागे कोणताही राजकीय हेतू नाही, असे स्पष्ट केले आहे. हा प्रश्न सीआयडीच्या अंतर्गत आहे. ही चूक घडली कशी आणि कोणी केली, याची चौकशी केली जात असून तिला एवढी प्रसिद्धी देण्याचे कारण नाही. आम्ही केवळ नेमके काय झाले, हे समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. या प्रकरणाला अवाजवी प्रसिद्धी दिली जाऊ नये, असे आवाहनही ओझा यांनी केले.
चौकशीच्या आदेशावर टीका
ड सामोसा प्रकरणाच्या चौकशीचे कारण काय : भाजपकडून विचारणा
ड नेमके काय घडले हे जाणण्यासाठी चौकशी : सीआयडीचा खुलासा
ड प्रकरणामुळे राज्य प्रशासनातील सावळा गोधळ उघड झाल्याची टीका
ड मुख्यमंत्री सुख्खू यांच्या सारवासारवीने अधिक चिघळले हे प्रकरण