न्यूझीलंडकडून व्हाईटवॉशची भारतावर नामुष्की
न्यूझीलंड 25 धावांनी विजयी, रिषभ पंतची झुंज व्यर्थ, सामनावीर एजाज पटेल - ग्लेन पुढे भारतीय फलंदाजांची शरणागती
वृत्तसंस्था/ मुंबई
दिग्गज खेळाडूंनी खचाखच भरलेल्या भारतीय संघाला रविवारी तिसऱ्या कसोटीत 25 धावांनी पराभूत व्हावे लागल्याने न्यूझीलंडकडून अभूतपूर्व 0-3 असा व्हाईटवॉश सहन करण्याची नामुष्की ओढवली आहे. मायदेशातील खेळपट्टीवर हा पराभव स्वीकारावा लागल्याने भारताची स्थिती आणखी बिकट झाली आहे.
धाडसी रिषभ पंतने आपल्या 64 धावांच्या झुंजार खेळीसह पेचातून सुटून विजय नोंदविण्याचज आशा जागृत केली होती. पण तो तिसऱ्या पंचाच्या वादग्रस्त निर्णयानंतर पॅव्हेलियनमध्ये परतला आणि यापूर्वी या मालिकेत यापूर्वी दोनदा जसे पाहायला मिळाला आहे त्या प्रकारे भारतीय किल्ला न्यूझीलंडच्या माऱ्यासमोर लगेच ढासळला.
147 इतक्या लहान लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचे नावाजलेले फलंदाज, ज्यापैकी काहींना आधुनिक काळातील महान खेळाडू म्हणून ओळखले जाते, त्यासह सर्व जण 121 धावांवर गुंडाळले जाऊन भारतीय संघाची स्थिती दयनीय बनली. तीन सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाला क्लीन स्वीपला तोंड द्यावे लागण्याची ही पहिलीच वेळ आहे. भारताला शेवटच्या वेळी 2000 मध्ये दक्षिण आफ्रिकेकडून 0-2 असा पराभव पत्करावा लागला होता.
घरच्या मैदानावर भारतीय संघ बऱ्याच काळापासून अजिंक्य राहिलेला असून ते वलय किवीजनी विलक्षण सहजतेने दूर केले. त्यांनी केवळ परिस्थितीशी जुळवून घेतले नाही, तर प्रभुत्वही मिळविले. तिसऱ्या दिवशी माफक लक्ष्याचा देखील पाठलाग करण्यात अपयशी ठरल्याबद्दल भारताला केवळ स्वत:लाच जबाबदार धरावे लागेल. सुऊवातीसच लाजीरवाणे पतन त्यांच्या वाट्याला येऊन केवळ 16 धावांमध्ये त्यांनी पाच महत्त्वाचे फलंदाज गमावले. उपाहारानंतर 55 धावांची गरज होती आणि पाच फलंदाज हातात होते. त्यावेळी भारताच्या आशा पंतवर टिकून होत्या. परंतु तो तिसऱ्या पंचाच्या वादग्रस्त निर्णयाचा बळी ठरला, ज्यामुळे खेळ पूर्णपणे न्यूझीलंडच्या बाजूने गेला.
पंतला चुकीच्या निर्णयाचा फटका
कर्णधार रोहित शर्माच्या हाराकिरी वृतीमुळे आणि एजाज पटेलच्या (6-57) अचूकतेमुळे भारतीय डाव धक्कादायकरीत्या कोसळला. यामुळे त्यांची 5 बाद 29 अशी अवस्था होऊन पंतवर दबाव आला. पण बिनचूक नसलेल्या तंत्रज्ञानाचा तडाखा बसण्यापूर्वी प्रतिकूल परिस्थितीशी लढताना पंतने न्यूझीलंडच्या प्रत्येक आव्हानाचा सामना केला. त्याने नऊ चौकार आणि एक षटकार खेचून केवळ 57 चेंडूंत 64 धावा केल्या.
सकाळच्या सत्रात पायचितसंदर्भात दाद न मागितलेल्या न्यूझीलंडने पंत यष्टीरक्षकाकरवी झेलबाद झाला असल्याचा दावा करत दाद मागितली. परंतु 22 व्या षटकातील सदर चेंडूवर पटेलची बॅट किंवा ग्लोव्ह्ज चेंडूच्या संपर्कात आले नसल्याचे रिप्लेमध्ये दिसून येत होते. तरीही पंतला तिसऱ्या पंचानी झेलबाद ठरविले. न्यूझीलंडला आवाजावरून तो झेलबाद असल्याची खात्री पटली होती. कारण ‘डीआरएस रिप्ले’मध्ये एक लहान नोंद दिसली होती. पण पंतने मैदानावरील पंचांना त्याची बॅट पॅडला घासल्याचा हा आवाज असल्याचे सांगितले. तरीही ऑस्ट्रेलियाचे माजी खेळाडू आणि तिसरे पंच पॉल रायफल यानी विऊद्ध निर्णय दिला. एजाजचा डावातील पाचवा आणि सामन्यातील दहावा बळी ठरण्यापूर्वी पंतने न्यूझीलंडच्या या फिरकीपटूवर पूर्णपणे वर्चस्व गाजवले. त्याने एजाजच्या 27 चेंडूंत 34 धावा फटकावताना पाच चौकार व एक षटकार लगावला.
रोहितची हाराकिरी
कर्णधार रोहितने परिस्थिती पाहून खेळण्याची आवश्यकता होती. पण त्याने गोलंदाजांचा सामना करण्यासाठी नेहमीप्रमाणे अतिआक्रमक दृष्टिकोन पत्करला, जो त्याला पुन्हा महागात पडला. ही त्याची मायदेशी कसोटीत खेळण्याची शेवटची खेप ठरू शकते. रोहितने (11 धावा) मॅट हेन्रीच्या चेंडूवर पुल फटका खेळण्याचा केलेला प्रयत्न फसला. यावेळी चेंडू कंबरेइतक्या उंचीवरही नव्हता. रोहितच्या बॅटला लागून चेंडू वर उसळताच हेन्रीने आनंद साजरा करायला सुरुवात केली. ग्लेन फिलिप्सने मिडविकेटमधून मागे धावत एक चांगला झेल घेतला. शुभमन गिलने पटेलचा चेंडू फिरेल अशी अपेक्षा केली, पण तो सरळ त्याच्या ऑफ-स्टंपवर आदळला. विराट कोहलीला (1) उंची दिलेल्या चेंडूला नीट ओळखता आले नाही आणि चेंडू त्याच्या बॅटची कड घेऊन पहिल्या स्लिपमध्ये गेला.
दुसऱ्या टोकाकडून यशस्वी जैस्वाल (5) ही शरणागती पाहता होता आणि फिलिप्सने (3-42) पायचित केल्याने तोही त्याचा एक भाग बनला. सर्फराज खानने (0) कसोटीत दुसऱ्यांदा पहिल्या चेंडूवर स्वीप शॉट हाणण्याचा प्रयत्न केला आणि त्याची त्याला मोठी किंमतही चुकवावी लागली. रचिन रवींद्रने डीप स्क्वेअर लेगमधून येत त्याचा झेल घेतला.
त्यानंतर रवींद्र जडेजाने (6) पंतसोबत 42 धावांची भागीदारी करून भारताला लक्ष्याच्या जवळ नेण्याचा प्रयत्न केला, परंतु हा अष्टपैलू खेळाडू पटेलच्या चेंडूवर विल यंगकडून झेलबाद झाला. वॉशिंग्टन सुंदर आणि आर. अश्विन (6) यांनी पराभव लांबणीवर टाकण्याचा प्रयत्न केला, परंतु फिलीप्सने सलग दोन आणि पटेलने एक बळी घेत भारताचा डाव वेगाने संपुष्टात आणला.
संक्षिप्त धावफलक : न्यूझीलंड पहिला डाव 235 व दुसरा डाव 174, भारत पहिला डाव 263 व दुसरा डाव सर्व बाद 121 (रिषभ पंत 64, वॉशिंग्टन सुंदर 12 धावा. एजाज पटेल 6-57, ग्लेन फिलीप्स 3-42, मॅट हेन्री 1-10).