For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

प्रश्न सोडविताना...

06:01 AM Apr 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
प्रश्न सोडविताना
Advertisement

श्यामला कमालीची अस्वस्थ होती. तिची देहबोली, राग राग करणं, नजरेतील अस्थिरता खूप काही सांगून जात होती. श्यामलाचे हल्ली मुलांशीही खूप वाद होत असत. मुलं वडिलांचं ऐकतात, ती वडिलधार्जिणी आहेत, कोणालाही आपली गरज नाही, आपल्या कमाईवर घरचे फक्त मौजमजा करतात, परंतु आपल्याला काहीही किंमत नाही. नुसतेच खपायचे, कामवालीप्रमाणे वागवतात अशा अर्थाचे तिचे स्वगत सतत सुरु असायचे. मग श्यामलाचे रडणे, भांड्यांची आदळापट, मध्येच जीवदेण्याच्या धमक्या हे प्रकार सुरु असायचे. ती बँकेमध्ये नोकरी करत होती मग तिथल्या कामामध्ये होणाऱ्या चुका, वरिष्ठांची बोलणी त्यातून निर्माण होणारी अपमानाची भावना आणि घरी आल्यावर ‘वड्याच तेल वांग्यावर’ असा काहीसा प्रकार व्हायचा..आदळापट, त्रागा, मुलांना ताडताड बोलणं आणि चिडून न जेवताच झोपणं या तिच्या साऱ्या दिनक्रमात तिच्या घरात सुखाला शिरायला जागाच नसे. श्यामलाचे पती शशांकराव यातून जमेल तसा मार्ग काढायचा प्रयत्न करायचे, शांत चित्ताने मुलांना समजावायचे. श्यामलावर औषधोपचार सुरु होतेच सोबतीला समुपदेशनाचे सेशन्सही सुरु होतेच. श्यामलाची केस तशी चॅलेंजींग होती. तिचा दृष्टीकोन सकारात्मक आणि विवेकपूर्ण होण्यासाठी बरीच सेशन्स घ्यावी लागली.

Advertisement

हे सारे विस्तृतपणे सांगण्याचे कारण म्हणजे एखाद्या समस्येची कारणं, स्वरुप आणि त्यांना सामोरं जाण्यासाठी लागणारी विचारप्रक्रिया या बाबतीत बऱ्याचदा अनभिज्ञता आढळते. व्यक्तीतील स्वभावदोषांमुळे भावनिक गुंतागुंत वाढत जाते आणि मग समोर येतात त्या अतिरेकी किंवा अविवेकी प्रतिक्रिया! या सर्वांचा परिणाम म्हणजे त्या व्यक्तीचे मन:स्वास्थ्य हरवतेच परंतु तिच्या कुटुंबातल्या जवळच्या व्यक्तींनाही तारेवरची कसरत करावी लागते. समस्या, संघर्ष हे सारे जीवनात असतेच हे जरी खरे असले तरी अनेकदा घरगुती संघर्ष थोडं कौशल्य वापरुन, सुयोग्य हाताळणीतून सोडवणे शक्य असते. परंतु त्यासाठी आपल्या समोरील नेमका प्रश्न काय आहे हे कळणं, त्याची नीट मांडणी केली तर तो सोडविण्यासाठी योग्य दिशेने विचार करणे शक्य होईल. अन्यथा जायचे आहे एकाठिकाणी आणि रस्ता पकडला दुसराच अशी काहीशी स्थिती होईल! त्यामुळे वेळ, पैसा, श्रम वाया जातातच परंतु समस्येची गुंतागुंत वाढत जाते आणि थोडक्या प्रयत्नातून सुटू शकणारा प्रश्न चिघळत जाउन क्वचित सारं अवघडही होऊन बसतं. एखादी समस्या आली की दोन चार जणांचा फुकट सल्ला आणि स्वत:चा गोंधळ वाढवणं हे टाळायला हवं. तसेच आपण आलेल्या विचारानुसार वागून नवीन समस्या उत्पन्न करत नाही ना हे ही पहायला हवं.

समस्यांचं मूळ आणि त्याचं स्वरुप कळलं तर बऱ्याच गोष्टी सोप्या होतात. अनेकदा एका प्रश्नाचे अनेक पैलू असतात आणि उत्तरे ही वेगवेगळी असू शकतात परंतु त्यातले जास्त योग्य उत्तर कोणते ते शोधायला हवे. त्यासाठी वास्तवाचे भान, परिस्थितीचे आकलन, विचारांची स्पष्टता आणि एकूणच सकारात्मक दृष्टीकोनाची आवश्यकता असते. आपल्याला भले एखादी समस्या सोडविण्याला अडचण येत असेल तर तज्ञ आणि योग्य व्यक्तिचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

Advertisement

समस्येचे स्वरुप काय आहे यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. पहा हं..

पन्नाशीच्या मालनताईंना ऑफीसमध्ये संगणकावर काम करणं अनिवार्य केलं होतं. संगणंक शिकणं त्यांना थोडं अवघड जात होतं. कामात चुका झाल्या की वयाने तसा खूप लहान पण साहेब असलेल्या बॉसची बोलणी ऐकावी लागते. परिणामी मालनताईंना येणारी अस्वस्थता वेंधळेपणात बदलू लागली. चांगला स्वयंपाक करणाऱ्या मालनताईंचा स्वयंपाक बिघडू लागला. घरात कुरकुर होऊ लागली. आता इथे पहा ..कामाच्या स्वरुपातून निर्माण झालेल्या या प्रश्नाची सोडवणूक मालनताईंना स्वत:चे कौशल्य वाढवून करावी लागली.

काही वेळा काही प्रश्न इतर व्यक्तीमुंळे निर्माण होत असतात. वाटेल ते झालं तरी देवाला नैवेद्य दाखवल्याखेरीज जेवायला मिळणार नाही हे ठणकावून सांगणाऱ्या आजोंबामुळे नातू वैतागतच बाहेर पडला आणि वेगाचं भान न राहिल्याने अपघातात जखमी झाला.

शाम सर्व कामे, अभ्यास आवरुन नुकताच टीव्ही पहात बसला होता. शामचे काका बाहेरुन आले आणि खाटकन् टीव्ही बंद करुन निघून गेले. त्या दिवसापासून दुखावलेल्या शामने काकांजवळ बोलणे बंद केले. पहा, वरील दोन्ही प्रसंग अन्य व्यक्तींमुळे घडलेले आजोबांनी नातवाला वा काकांनी शामला योग्य संवाद साधत आपला संदेश त्यांच्यापर्यंत पोहचविला असता तर पुढील समस्या टळल्या असत्या.

घराचे घरपण हरवते तेव्हा बऱ्याचदा घरातील कुणीतरी व्यक्ती त्या समस्येच्या केंद्रस्थानी असते. काहीवेळा आपणसुद्धा! इतरांतील काय किंवा स्वत:मधीलही रागीटपणा, आळस, स्वार्थीपणा, भिडस्तपणा, अरसिक वृत्ती, घाबरटपणा इ. अनेक उणिवा प्रश्नच निर्माण करत असतात. त्यामुळे स्वत:ची आणि सोबत कुटुंबियांची परवड होते. अशा गोष्टी मान्य करुन त्यात सुधारणेच्या दृष्टीने प्रयत्न केल्यास बराच फरक पडून निर्माण होणारे प्रश्न कमी त्रासदायक ठरु शकतात.

सुरवातीला म्हटल्याप्रमाणे एखाद्या समस्येवर एकच तोडगा असेल असे नाही. कधी कधी समस्येचा फेरविचार करुन, नवनवीन कल्पना लढवाव्या लागतात आणि समस्यापूर्ती करत असताना अन्य प्रश्न निर्माण होणार नाही, काही वेगळा गुंता तयार होणार नाही याची काळजी ही घ्यावी लागते.

कुठल्याही प्रश्नाची सुयोग्य मांडणी करणं हेही महत्त्वाचे आहे. आपण वस्तुस्थिती मांडताना आहे तशी मांडली की तिचा विपर्यास केला, की ती नाकारली? हे पहाणेही महत्त्वाचे. प्रश्न वा समस्या कोणतीही असो विवेकाची कास धरणे आवश्यक असते. योग्य-अयोग्य, चूक-बरोबर, सारासार विचार करुन, भावनेला थोडं दूर ठेवुन घटनेकडे डोळसपणे पाहणे आवश्यक असते. त्यामुळे घटनेचे नेमके स्वरुप लक्षात येते आणि वस्तुस्थितीचे आकलन होण्यास मदत होते.

काहीवेळा एखाद्या प्रश्नाच्या मुळाशी अवास्तव, अशास्त्राrय, अनावश्यक अशा भावनांचं जंजाळ असतं आणि मूळ प्रश्न त्या गुंत्यातच अडकून राहतो. स्वत:ला सोईस्कर आणि अनुकूल वाटणाऱ्या समजूतींना आपण इतकं घट्ट धरुन ठेवतो की काहीवेळा दुसरा विचार अधिक चांगला असला तरी आपल्याला त्याची दखल घ्यावीशी वाटत नाही. त्यामुळे आपल्या भावभावना, विचार याबाबत सजग रहात, आपल्या स्वगताकडे लक्ष देणे, दृष्टीकोन तपासणेही आवश्यक आहे. एकाच लेखामध्ये हे सारे मांडणे शक्य नाही. याविषयी अधिक जाणून घेऊया पुढच्या लेखात.

-अॅड. सुमेधा संजिव देसाई

Advertisement
Tags :

.