For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

योग्यांना दगड, माती, सोने सगळं सारखंच वाटत असतं

06:47 AM May 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
योग्यांना दगड  माती  सोने सगळं सारखंच वाटत असतं
Advertisement

अध्याय पहिला

Advertisement

कैवल्यसाक्षात्कारी योगी समाधीसुखाचा अखंड आनंद घेत असतात. ही त्यांची जीवनमुक्त अवस्था असते. आत्तापर्यंत केलेल्या योगसाधनेमुळे त्यांना अखंड समाधीसुख उपलब्ध होत असते. ते सुख पूर्ण भोगून होईपर्यंत ते पृथ्वीवर विचरत असतात. त्या कालावधीत ते ज्यांच्या अंगात पात्रता आलेली आहे त्यांच्यावर अनुग्रह करत असतात. त्यांना कसल्याही गोष्टीची अपूर्वाई नसते. त्यामुळे जे मिळेल ते पांघरतात, कोण काय देईल ते खातात, आसरा मिळेल तिथे राहतात. त्यांना सर्वांविषयी अत्यंत करुणा वाटत असते कारण सर्वांच्यात एकसमान असलेले ईश्वरी तत्व पहात असतात. पात्र व्यक्तीचे भले व्हावे ह्यादृष्टीने योगी त्यांच्यावर अनुग्रह करण्यासाठी पृथ्वीच्या पाठीवर भ्रमण करत असतात. त्यांनी क्रोध जिंकलेला असतो, इंद्रियें जिंकलेली असतात. ह्या अर्थाचे,

येन केनचिदाच्छिन्ना येन केनचिदाहता: । येन केनचिदाकृष्टा येन केनचिदाश्रिता।।17 ।। करुणापूर्णहृदया भ्रमन्ति धरणीतले । अनुग्रहाय लोकानां जितक्रोधा जितेन्द्रिया: ।। 18 ।। हे दोन श्लोक आपण पहात आहोत.

Advertisement

वरील 17 व 18 ह्या दोन्ही श्लोकांचा आपण एकत्रित विचार करू. जे ईश्वराची भक्ती करून समर्पण भावनेने एकरूप झालेले आहेत ते ईश्वराचं कार्य सगुण रुपात पुढं चालवत असतात. त्यामुळे त्यांनी क्रोधावर आणि इंद्रियांवर विजय मिळवलेला असतो. माणसानं एकदा इंद्रियजय साधला की, त्याची अशी कोणतीच इच्छा उरत नसते. त्यामुळे अमुक वस्त्र नेसायला हवं, तमुक वस्तू खायला हवी असा त्याचा कोणताच आग्रह नसतो. मग तो जे मिळेल ते वस्त्र नेसतो. कोण काय देईल ते खातो. आपल्या दैवात जे असेल ते आपल्याला मिळणारंच अशी त्याला खात्री असल्याने तो निश्चिन्त असतो. कोणत्याही स्थानी अचानक पोहोचून तेथील पात्र अधिकारी साधक ते बरोबर ओळखून काढतात. कुणाची साधना कोणत्या टप्प्यावर आहे हे त्यांना अचूक समजते. तेथे जाऊन ते त्याला उपदेश करतात. अशा व्यक्तींचा काही लोक ऐतखाऊ म्हणून तिरस्कार करतात. तर काही जण त्यांना खायला प्यायला देऊन त्यांची काळजी घेतात. या मंडळींचे मनोबल व विवेक शक्ती मोठी प्रभावी असते. त्यामुळे जीवनात येणारे सुखदु:खाचे आवेग ते सहजी सहन करतात. असे हे सिद्धपुरुष केवळ लोककल्याणार्थ सर्वत्र फिरत असतात. उपलब्ध असलेल्या सिद्धी वापरून सर्वदूर संचार करतात व सदैव लोकांच्या भल्याचाच विचार करतात. त्यांचे नियोजित कार्य संपल्यावर त्यांनी देहत्याग केला तरी त्यांना आत्महत्येचे पाप लागत नाही.

आपण सत्पुरुषांची चरित्रे वाचतो. त्यातील निरनिराळ्या प्रसंगात आपण त्यांचं समाजात वावरणं, अनाकलनीय हालचाली करणं, अचानक काही सूचक बोलणं इत्यादी गोष्टी पाहून अचंबित झालेले असतो पण निरिच्छपणा हा त्यांचा स्वभाव असल्याने इतरांपेक्षा त्यांचं वेगळं वागणं, बोलणं इत्यादींचं स्पष्टीकरण आपल्याला बाप्पानी सांगितलेल्या वरील श्लोकातून समजतं. आता पुढील श्लोक पाहुयात,

देहमात्रभृतो भूप समलोष्टाश्मकाञ्चना: ।

एतादृशा महाभाग्या:  स्युश्चक्षुर्गोचरा:

प्रिय ।। 19 ।।

अर्थ-ते केवळ देह तेवढा धारण करतात. मातीचे ढेकूळ, दगड आणि सोने यांची त्यांना सारखीच किंमत आहे.

विवरण-राजा, अशा सत्पुरुषांनी केवळ लोककल्याणार्थ देह धारण केलेला असल्याने त्यांना दगड, माती, सोने सगळं सारखंच वाटत असतं. या गोष्टी त्यांच्या उपयोगाच्या नसतातच. म्हणून त्यांच्या लेखी सर्व ग्राह्य आणि त्याज्ज गोष्टी अगदी निरर्थक असतात. तुकाराम महाराज अशा पुरुषांच्यापैकीच होते म्हणून त्यांच्या अभंगातून ते योगी व्यक्तीच्या मन:स्थितीचं सोने रूपे आम्हां मृत्तिकेसमान। माणिके पाषाण खडे असे वर्णन करतात.

क्रमश:

Advertisement
Tags :

.