For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

प्रश्न सोडविताना...

06:27 AM Apr 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
प्रश्न सोडविताना
Advertisement

मागच्या लेखामध्ये म्हटल्याप्रमाणे तुमचा दृष्टिकोन कसा आहे यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. परंतु तो दृष्टिकोन कसा तयार होतो हे पाहणेही आवश्यक आहे. जन्मापासून कुटुंबातल्या व्यक्तींकडून, विशेषत: आईवडीलांकडून होणारे संस्कार, शिक्षक, शेजारी, मित्र, पुस्तके यांच्या माध्यमातून मिळणारे अनुभव, मूल्य, विचार हे व्यक्तीचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन तयार करत असतात.

Advertisement

शारीरिक आणि मानसिक विकासाच्या कालखंडात काही काळ अस्थिरतेचाही असतो. इथे काही विचारांची पडझड होताना दिसते, काही नवीन विचार आकाराला येताना दिसतात. वर्तनातली विसंगतीसुद्धा अनुभवावी लागते. पुढे हळूहळू वर्तनातली काही वैशिष्ट्यां स्थिर होत जातात आणि विचारांची एक पक्की चौकट तयार होते. यालाच आपण ‘स्वभाव’ म्हणतो. सर्व अनुभव याच चौकटीत तपासले जातात. त्यातील अनेक विचार, समजुती कालबाह्य ठरल्या तरी सोडवत नाहीत. काही समजुती तर आंधळेपणाने उचलल्या जातात. अनेकदा हे विचार तर्कशून्य, अशास्त्राrय, अवास्तव असे असतात. उदा. शाम याला नोकरीच्या मुलाखतीसाठी बेंगळूरला चांगल्या कंपनीमध्ये बोलावणे आले. बुधवारी मुलाखत असल्यामुळे शामने सोमवारी बसने जायचे ठरवले. सगळी आवराआवर झाली आणि आजोबांच्या लक्षात आले आज अमावस्या आहे. अमावस्येला प्रवास करणे फार अशुभ..यावर चर्चा झाली आणि त्याला शामच्या आईनेही दुजोरा दिला. शामने सोमवार ऐवजी मंगळवारी जायचे ठरविले. मंगळवारी प्रवास सुरु झाला खरा परंतु बसमध्ये बिघाड झाला. रस्त्यातच फार वेळ गेला आणि ज्या वेळेमध्ये मुलाखतीला उपस्थित राहणे गरजेचे होते ती वेळ चुकली. आता पहा हं, शामच्या बाबतीत अमावस्येला प्रवास न करण्याचा निर्णय वस्तुस्थितीला धरुन नव्हता. नोकरीच्या विचारापेक्षा अमावस्येला प्रवास न करण्याला महत्त्व दिलं गेलं आणि गोंधळ झाला. अपेक्षित वेळेत न पोहचू शकल्याने नोकरीची संधी हुकली.

वरती जसा उल्लेख केला आहे त्या पक्क्या चौकटी बाहेर पडण्याची गरज असते. परंतु ती चौकट सोडवत नाही तेव्हा संघर्ष व समस्या उत्पन्न होतात. अनुवंश आणि परिस्थिती यातून स्वभावाची, दृष्टिकोनाची जडणघडण होत असली हे जरी खरे असले तरी गरज पडल्यास त्यामध्ये लवचिकता असणे आवश्यक आहे, सारासार विचार आवश्यक आहे. ज्यांना स्वत:ला किंवा इतरांना त्रासदायक ठरणाऱ्या गोष्टी ओळखून त्यावर काम करता येते. ते दृष्टिकोनात बदल घडवू शकतात. दृष्टिकोनात बदल म्हणजेच विचारांमध्ये बदल. विचार-भावना-वर्तन वा कृती ही एक साखळी आहे. त्यांचे परस्परांशी नाते आहे. जसे विचार असतील तशा भावना उत्पन्न होतात आणि त्याप्रमाणे कृती घडते हे आपल्याला ठाऊकच आहे. आपले विचार वस्तुस्थितीला धरुन आहेत का हे तपासायला हवे. त्यासाठी स्वत:च्या मनामध्ये डोकावून पाहण्याची, आत्मपरिक्षण करण्याची सवय लावुन घ्यायला हवी.

Advertisement

विचारांची गाडी सतत भरकटत असेल आणि त्यावर काम केले नाही तर अस्वस्थतेखेरीज हाती काही लागणार नाही. तसेच एखाद्या घटनेकडे आपण कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो आहोत, त्या घटनेचा, प्रसंगाचा अर्थ आपण कसा लावतो आहोत यावर आपलं सुख दु:ख अवलंबून असते. त्या संदर्भात होणारे आपले ‘स्वगत’ही तपासणे गरजेचे आहे. आपण एका उदाहरणातून हे समजून घेऊ...

जया आणि रीमा अगदी चांगल्या मैत्रिणी. रीमाने अनेक वेळा जयाला मदत केली आहे. बालपणापासून त्या एकत्र आहेत. परिस्थिती खूपच बेताची परंतु दिसायला सुरेख असणाऱ्या जयाचे शिक्षण पूर्ण होता क्षणी लग्नही झाले. आर्थिकदृष्ट्या संपन्न कुंटुबामध्ये जया अगदी खुष आहे. त्या दिवशी बाजारामध्ये अचानक रीमाची नजर समोर जाते पाहते तर जया काहीतरी खरेदी करत असते. जयाने रीमाला न पाहिल्यामुळे ती खरेदी करते आणि निघून जाते. झालं..रीमा खूप वैतागते..रीमाचे स्वगत सुरु..काय आहे ही मुलगी. कीती मदत केली मी त्यावेळी. पण काडीची किंमत नाही. साधे पाहिलेही नाही माझ्याकडे. अभ्यासाला, जेवायला माझ्याकडेच असायची ना? कसली घमेंड आली आहे जयाला..कसली जाणीवच नाही वगैरे वगैरे..आता पहा, या घटनेमध्ये जयाचे लक्ष नसल्याने तिला तिथे रीमा आली आहे हेच मुळात कळले नाहीये परंतु रीमाने मात्र याचा जो अर्थ लावला, निष्कर्ष काढले त्यामुळे तिच्या मनात दुखावलेपणाची भावना निर्माण झाली. अन् अबोला धरण्यापर्यंत वाटचाल झाली. मुळात जे घडलंच नाही ते घडलं असं मानून वस्तुस्थितीचा रीमाने विपर्यास केला. जयाचे लक्ष नसेल, आपण हाक मारायला हवी होती असा विचार तिने केला असता तर झालेला मानसिक त्रास आणि नात्यात आलेला दुरावा ती नक्कीच टाळू शकली असती. एखाद्या प्रसंगाकडे, घटनेकडे आपण कसे पाहतो आहोत, त्याबद्दलचे आपले स्वगत कसे आहे, कितीकाळ ती घटना मनात धरुन ठेवतो आहोत यावर निर्माण होणाऱ्या भावना आणि त्याची तीव्रता अवलंबुन असते.

दुसऱ्या एका उदाहरणातून हे आपण समजुन घेउया.

मनाली दहावीला असताना शाळा आवरल्यावर बाहेर फिरायला गेली होती..अभ्यासासाठी तिचे काका तिला ओरडले. त्या क्षणी सगळ्यांसमोर काका ओरडले म्हणून तिला राग आला. दहावीनंतर पुढच्या शिक्षणासाठी ती आणि सोबत तिची आई शिक्षणासाठी परगावी गेले. पाच सहा वर्षे निघून गेली होती. मनालीच्या काकांचे काही कामानिमीत्त त्या गावी येणे होणार होते. साहजिकच, त्यांनी मनालीच्या आईला तसे कळवलेही. कॉलेजमधून मनाली घरी आल्यानंतर आईने तिला दोन दिवसांनी काका येणार आहेत असे सांगितले.

झालं..मनालीचे स्वगत सुरु झाले.. कशाला येतायत इथे.. मला रागच आहे त्यांचा. किती ओरडले होते मला तेव्हा..काय गरज होती ओरडायची, असले नातेवाईक असण्यापेक्षा नसलेले बरे. इथे येऊन आता कसले लेक्चर देणार आहेत..वगैरे वगैरे..पहा हं..या उदाहरणात मनालीचे काका दोन दिवसांनी येणार आहेत परंतु मनालीने जुनी गोष्ट, ती घटना तशीच पकडून ठेवल्याने त्या संदर्भातले स्वगत सुरु झाले आणि काका घरी यायच्या आधी राग, चिडचिड आणि अस्वस्थता घरी आली.

म्हणजेच एखाद्या घटनेकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन, त्या संदर्भातील तर्कसंगत नसलेले स्वगत आपल्याला अस्वस्थ करते. एखादी घटना वा प्रसंग घडून गेला आहे परंतु आपण ती घटना मनात तशीच घट्ट पकडून ठेवली असेल वा सतत ‘पास्टबुक’ चाळायची आपल्याला सवय असेल तरीही मानसिक शांततेपासून आपण दूरच राहु हे लक्षात घ्यायला हवे. सारासार विचार, स्वगत तपासणे, दृष्टिकोनामध्ये गरजेनुसार योग्य तो बदल करणे अशी लवचिकता ठेवल्यास जीवनाची गाडी योग्य दिशेने जाण्यास मदत होईल हे मात्र निश्चीत!

- अॅड. सुमेधा संजीव देसाई

Advertisement
Tags :

.