For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

काही समस्या सोडविताना....2

06:45 AM Mar 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
काही समस्या सोडविताना    2

मागील लेखामध्ये उल्लेख केल्याप्रमाणे ADHD या विकाराची महत्वाची लक्षणे तीन गटांत विभागता येतात

Advertisement

1.चित्ताच्या एकाग्रतेचा अभाव (Inattention)
2.अतिचंचलता व अस्थिरता (Hyperactivity)
3.भावनावशता (Impulsivity)

म्हणजे भावनेच्या आहारी जाऊन परिणामांचा विचार न करता वागणे..थोडक्यात लहरीपणा.

Advertisement

बहुतांश या विकारानेग्रस्त मुलांमध्ये वरील तीनही लक्षणे पहायला मिळतात.ADHD खेरीज काही शारीरिक कारणांमुळेही मुलांच्या वर्तनात बदल होतात, होऊ शकतात. अॅनिमिया, अपस्मार, कुपोषण, अॅलर्जी, थायरॉईड ग्रंथींचे सदोष कार्य यामुळेही मुले अस्थिर, चिडखोर, चंचल बनतात. काहीवेळा दृष्टीदोष किंवा श्रवणदोषामुळे म्हणजे मुलांना नीट दिसत नसेल वा नीट ऐकु येत नसेल तरीसुद्धा ती अस्वस्थ होतात. बंडखोरीकडे झुकतात. अशावेळी हाr ADHD चीही फसवी लक्षणे ठरु शकतात. म्हणूनच मागील लेखात म्हटल्याप्रमाणे ADHD चे निदान करताना बऱ्याच गोष्टी विचारात घ्याव्या लागतात.ADHD Ñया जोडीला अन्य काही समस्या असू शकतात. उदा. अध्ययनक्षमता. ADHD असलेल्या 50 टक्के मुलांमध्ये ही समस्या दिसून येते. अशा मुलांना लेखन, वाचन, पाठांतर, लक्षात ठेवणे या गोष्टी जड जातात. एखाद्या गोष्टीचे नीट आकलन होणे किंवा ती व्यक्त करता येणे हे या मुलांना जमत नाही. याखेरीज काहींमध्ये मनोवृत्तीत होणारे टोकाचे बदलही दिसतात. कधी अती उत्साह तर कधी अगदी उदासवाणे वाटणे हे असू शकते.

Advertisement

मुलांच्या मानसिक, बौद्धिक व सामाजिक विकासाच्या आड येणारा ADHD हा विकार मेंदूच्या कार्यात बिघाड झाल्यामुळे, त्यात जैवरासायनिक असमतोल निर्माण झाल्यामुळे उद्भवतो. कधी गर्भावस्थेत, तर कधी जन्मवेळी काही अपघात घडला तर जरी मेंदूच्या रचनेत नाही तरी कार्यात बिघाड होऊ शकतो. आपल्या मेंदूतील एका विशिष्ट आकलनयंत्रणेमुळे एक प्रकारची निवडक्षमता विकसीत झालेली पहायला मिळते. ही यंत्रणा फिल्टरचे काम करते. यामुळे व्यक्तीला तिच्या भोवताली घडत असलेल्या असंख्य गोष्टींपैकी फक्त हव्या त्या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करुन इतर गोष्टींकडे दुर्लक्ष करणे सहज जमते.

अगदी सोपे उदाहरण देउन सांगायचे तर पहा ज्यावेळी आपण टीव्हीवरती एखादी मॅच पहात असतो त्यावेळी खेळाडूच्या हालचाली दिसतात आणि समालोचकांचा आवाज तेवढा ऐकु येतो. क्रीडांगणावरील गोंगाट किंवा भोवताली चाललेली चर्चा याकडे फारसे लक्ष जात नाही ती या फिल्टरमुळे!! परंतु ADHD ग्रस्त व्यक्तींच्या बाबतीत मेंदूतील हीच यंत्रणा अपरिपक्व राहिलेली असते. त्यामुळे अनावश्यक गोष्टींकडे दुर्लक्ष करण्याची म्हणजे फिल्टर होण्याची क्रिया घडतच नाही. परिणामी या व्यक्ती त्यांच्याभोवती घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीला कमीजास्त प्रतिसाद देत राहतात. परिणामी त्या व्यक्तींचा वेंधळेपणा, धांदरटपणा, अस्थिरता जाणवत राहते. स्वत:भोवती घडणाऱ्या घटना त्यांना जाणवतात परंतु त्यांच्याशी सुसंगत वागणे मात्र जमत नाही.

या व्यक्ती सुपरचार्ज्ड असतात. अशा व्यक्तींचा मेंदू सैरावैरा धावत असतो. एखादी गोष्ट मनात आल्यावर ती करण्याचा प्रयत्न त्या करतात न करतात, तोच दुसरा विचार त्यांचा ताबा घेतो. त्याचा पाठपुरावा करायला जाणार एवढ्यातच तिसरा विचार येतो. त्यामुळे त्यांच्या वागण्याबोलण्यात अनेकदा विस्कळीतपणा दिसतोADHD हा विकार संपूर्णपणे बरा होतोच असे नाही परंतु त्याचे योग्य व्यवस्थापन मात्र करता येते. त्यासाठी औषधोपचार करणारे डॉक्टर्स, मानसतज्ञ, पालक, शिक्षक, मित्र, नातलग अशा सर्वांचाच सहकार्यात्मक सहभाग हवा असतो. या विकारावरील उपचार म्हणजे एक सांघिक कामच म्हणता येईल. परस्परसंवाद आणि फिडबॅक हे दोन्ही महत्त्वाचे असतात.

पालकांनाही स्वत:मध्ये जाणीवपूर्वक काही बदल करण्यास सुचवले जाते. उदा. परस्परांवर दोषारोप न करणे, अशा मुलांना घालून पाडून न बोलणे इ. अशा मुलांची आक्षेपार्ह वागणूक ही त्यांच्या विकाराचा भाग आहे हे मान्य करणे आणि त्या दृष्टिकोनातून पाहणेही आवश्यक असते. पालकांसाठी ही तारेवरची कसरत ठरु शकते परंतु पालकांनी सुनियोजित पद्धतीने मुलांच्या दिनचर्येकडे लक्ष पुरवणे, सहनशीलता आदी कौशल्ये आत्मसात करणे गरजेचे असते. अन्यथा घराचे घरपण हरवून कौटुंबिक सौख्य नाहीसे होते.

अनेकदा अशा मुलांच्या पालकांना मुलांच्या दिनचर्येचे वेळापत्रक आखायला मदत करणे आवश्यक असते. असेच वेळापत्रक अभ्यासाच्याबाबतीत केले तर कोणत्या वेळी काय करायचे ते मुलाला नेमकेपणाने कळते. सर्व कामांमध्ये, वागण्यात सुसूत्रता आणणे हे ADHD ग्रस्त मुलांसाठी फार आवश्यक असते. शाळेचे दप्तर, वह्या, पुस्तके, पाण्याची बाटली, खेळणी एका सुनिश्चीत ठिकाणीच ठेवणे आवश्यक असते. "place for everything and everything in its place" अशी एकदा सवय जडली की वस्तू हरवणे, न सापडणे हा वर्तनातील भाग कमी होतो. ADHD ग्रस्त मुलांचा परिपाठ अर्थात रुटीन शक्यतोवर बदलणार नाही याची काळजी घ्यायला हवी. या मुलांना वाढवताना बक्षीस आणि शिक्षेचा योग्य वापर उपयुक्त ठरतो. एखादे काम शांतपणे, एकाग्र चित्ताने करणे हे ध्येय मुलांसमोर ठेऊन ते पूर्ण झाल्यावर त्याच्या आवडीचा पदार्थ करणे, फिरायला नेणे किंवा अन्य आवडती गोष्ट देणे असं बक्षीस म्हणून देता येईल. यातून त्याला प्रोत्साहन मिळाल्याने त्यांचा अटेंन्शन स्पॅन टप्प्याटप्प्याने वाढविण्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो. तसेच आक्रस्ताळेपणा, तोडफोड किंवा इतर काही अयोग्य वर्तन केल्यास त्याला आवडणारी गोष्ट न देणे, त्याच्याशी फार न बोलणे अशी शिक्षा करु शकतो. फक्त त्याला मारणे, अंगावर खेकसणे हे मात्र कटाक्षाने टाळायला हवे. योग्य पद्धतीने बक्षीस आणि शिक्षा पद्धतीचा अवलंब केल्यास काही गोष्टी चांगल्या रितीने वर्कआऊट होऊ शकतात.

या मुलांमध्ये शारीरिक ऊर्जा खूप असते. मैदानी खेळ, पोहणे, कला, संगीत, नाट्या या पैकी कशामध्ये त्यांना गती आहे याचा शोध घेऊन त्यांना उत्तेजन दिल्यास त्यांचा आत्मविश्वास, सामाजिक कौशल्ये वाढण्यास, स्वप्रतिमा सुधारण्यास मदत होऊ शकते. अर्थात त्यांच्या वर्तनात बदल घडवून आणणे ही सोपी गोष्ट निश्चितच नाही परंतु साऱ्या घटकांच्या सहाय्याने, योग्य औषधोपचार आणि मानसतज्ञांच्या मदतीने या गोष्टी शक्य होऊ शकतात हे मात्र खरे!!

-अॅड. सुमेधा संजिव देसाई

Advertisement
Tags :
×

.