महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

स्वत:ला सतत व्यग्र ठेवताना...

06:19 AM Nov 22, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

त्या दिवशी नीलाताई भेटायला आल्या त्या अगदी काळजीतच. त्यांनी स्वत:चा सविस्तर परिचय करून दिला आणि त्या एकदम रडू लागल्या. ‘मॅडम, काय करू कळत नाही हो..माझा अगदी नाईलाज झाला आहे.’ ‘नीलाताई शांत व्हा..काय झालं आहे?’

Advertisement

‘माझी मुलगी श्रेया खूप हुशार. सासरही अगदी छान मिळाले. सासरी सगळे छान. कसलीच कमतरता नाही. पण अलीकडे काहीतरी बिनसलंय. श्रेया खूप अस्वस्थ वाटते. श्रेयाचा नवरा निवास खूप समजून घेतो तिला. तशी भांडणे वगैरे नाहीत पण नेमके काय झाले आहे हेच कळत नाही. हल्ली ती बऱ्याचदा अस्वस्थ असल्यासारखी वाटते.’

Advertisement

‘बरं, मला सांगा तिचा साधारण दिनक्रम कसा असतो?’

‘ती तशी पूर्ण व्यग्र असते. म्हणजे आताच नाही तर अगदी पूर्वीपासून सतत ती कशामधे तरी गुंतूनच असायची. तिला शांत बसायला आवडतच नसे, स्वत:ला खूप व्यग्र ठेवायची ती. कॉलेजमधे तर अनेक मुला मुलींना तिचे उदाहरण दिले जायचे.

अजूनही ती तशीच आहे. सतत कार्यमग्न असते.’

‘ठीक आहे. मला तिच्याजवळ बोलता येईल का?’ ‘हो. तिला पूर्वकल्पना देऊनच मी इथे आले आहे.’ भेटीची वेळ ठरवून नीलाताई निघून गेल्या. श्रेया ठरल्या वेळेनुसार भेटायला आली. बराच वेळ चर्चा झाली. सतत कामामध्ये व्यग्र राहणे, मनाला सतत कशात तरी गुंतवून ठेवणे, सतत सकारात्मक विचारच मनात यायला हवेत हा अट्टहास आता अस्वस्थतेमध्ये बदलला होता.

आमचा संवाद सुरू असताना श्रेयाचे लक्ष अचानक बाहेर गेले आणि ती ओरडली, ‘कुणाल.. जरा स्वस्थ बसायला काय घेशील?’ (श्रेयाचा सहा वर्षांचा मुलगा कुणाल सतत इकडून तिकडे पळत होता आणि नीलाताईंना दमवत होता.) ‘मॅडम याची सतत नुसती वळवळ. जरा स्वस्थ बसत नाही. स्वत:ची आणि दुसऱ्याचीही दमणूक.’ तिच्या बोलण्याचा हाच धागा पकडत मी म्हटलं, ‘म्हणजे श्रेया स्वस्थ बसण्याचं महत्त्व माहीत आहे तर तुला?’ ‘हो मॅडम. सतत धावपळीने शरीर, मन थकत नाही का?’ मी हसून म्हटलं, ‘कुणाल थकणार नाही. दंगामस्ती करायचंच वय आहे त्याचं पण तुझं खरं आहे. शरीर मनाला विश्र्रांती हवीच.. मला एक सांग ही विश्र्रांती तू तुझ्या मनाला देतेस का? काहीही न करता स्वस्थ बसून आपल्या शरीर मनामध्ये काय सुरू आहे हे कधी शांतपणे पाहिले आहे का?’

‘नाही मॅडम..मला कधीतरी वाटतं स्वस्थ बसावं पण शरीर आणि मनाला रिकामं ठेवून कसे चालेल ना? ते रिकामं राहिलं तर नकारात्मकता येईल. मला ते नको आहे. ते नको असेल तर आपण सतत सकारात्मक विचार करायला हवा. सतत पॉझिटिव्ह रहायला हवे ना हो?’

‘मॅडम, हल्ली काहीवेळा दमणूक झाल्यासारखी वाटते, बिझी राहूनही मनात खूप विचार येतात मग कधीतरी खूप उदास वाटतं. असं झालं की माझा मलाच राग येतो. मी इतकी स्वत:ला बिझी ठेवते, मन रिकामं ठेवत नाही. काही काम नसतं तेव्हाही स्वस्थ बसत नाही. मोटिव्हेशनल व्हीडिओज पाहते, आनंदी राहते. मग असं होतंच कसं? अलीकडे याच गोष्टीचा ताण येतो आहे मला. मला उदास वाटूच कसे शकते?’

श्रेयासोबत बराच वेळ चर्चा झाली. अनेक गोष्टी तिला समजावून सांगाव्या लागल्या. नंतर काही काळ तिच्या सोबत संवाद सुऊच होता. तिला माईंडफुलनेसची काही तंत्रं समजावून सांगितली. काही कालावधीनंतर शांत बसणे आणि सरावाने मनात येणारे विचार साक्षीभावाने पाहणे तिला जमू लागले. काही तंत्राचा अवलंब करत आणि त्यामध्ये सातत्य ठेवत ती या सर्वांमधून बाहेर पडली.

मुळातच एक लक्षात घ्यायला हवे की आपल्या कुणाचीच मन:स्थिती सतत आनंदी, उत्साही अशी राहू शकत नाही. निसर्गत: जसा हवामानामध्ये बदल होतो अगदी तसेच आपल्या शरीर-मनामध्ये बदल होणे नैसर्गिक आहे. पहा हं, आपले ब्लडप्रेशरदेखील दिवसभरात निसर्गत: बदलत असते, सकाळपेक्षा दुपारी रक्तावरचा दाब वाढलेला असतो, आपली श्वासाची गती बदलते, पाचक स्राव बदलतात. शरीराचे तापमान ठरावीक रेंजमध्ये बदलते, रक्तातील साखरेचे प्रमाण बदलते. शरीरात जसे बदल होतात तसेच मनाच्या स्थितीतही होतात. काहीवेळा आपल्याला छान, उत्साही वाटते तर कधी आपल्याला उदास वाटते. काहीवेळा काही बाह्य कारण असते असेही नाही. आपल्या मेंदूतील आणि शरीरातील रसायने सतत बदलत असतात. मेंदूतील सेरेटोनीन हे रसायन चोवीस तासात सतत बदलत असते. भावनाही बदलतात. म्हणजेच मनाची भरती ओहोटी नैसर्गिक आहे. सतत आनंदी राहण्याच्या अट्टहासापेक्षा मनात येणारे विचार, भावना सजगतेने न्याहाळायला शिकण्याचे तंत्र अवगत करणे आवश्यक आहे. हा सराव करायचा म्हणजे हे सर्व बदल साक्षीभावाने अनुभवायचे. या क्षणी मन उदास आहे तर ठीक आहे ते मान्य करायचे आणि ते किती वेळ असे राहते आहे हे पहायचे. या उदासीनतेचा परिणाम आपल्या कामावर, नात्यांवर होऊ द्यायचा नाही. दहा मिनिटे स्वस्थ बसून स्वत:च्या मनामध्ये डोकावून पाहणे, श्वासाची हालचाल जाणणे, मनात येणारे विचार, भावना न्याहाळणे यामुळे हळूहळू मनाकडे साक्षीभावाने पाहणे जमू लागते. आपण एक लक्षात घ्यायला हवे की कोणताही सुख देणारा अनुभव आपण सतत घेत राहिलो तर तो सुखद रहात नाही. समजा मला गोड पदार्थ आवडतो. मी एक लाडू खाल्ला, दोन खाल्ले, तीन, चार असे करत राहिले तर तो पदार्थ आवडता असूनही चव बदलत जाईल आणि एका क्षणी अक्षरश: नकोसे वाटू लागेल. म्हणजेच आवडता पदार्थ तोच असला तरी तो खाण्याचा माझा अनुभव सुखद रहात नाही. त्यामुळे सुखद अनुभवाच्या क्षणी त्या सुखाचा मनापासून आनंद घ्यावा परंतु सतत तसेच सुख मिळावे हा अट्टहास मात्र ओझे बनून अस्वस्थ करतो, आनंद घालवतो. सजगता तंत्र अर्थात माईंडफुलनेसच्या सरावामुळे साक्षी होणे जमू लागते.आपले शरीर आणि मन यांच्याप्रती साक्षीभाव वाढवायचा. शरीरातील संवेदना, मनातील भावना साक्षीभावाने पहायच्या. अधिक सजग व्हायचे. अर्थात याचा अर्थ कोणती जबाबदारी नाकारायची किंवा आनंदाचा, सुखाचा त्याग करायचा असे नाही. सजग व्हायचे म्हणजे आपली निर्णयक्षमता विकसित करून अधिक चांगला कर्ता व्हायचे आणि रसिकता विकसित करून अधिक चांगला भोक्ता व्हायचे. म्हणजेच सोप्या शब्दात सांगायचे तर ज्यावेळी एखादी गोष्ट, घटना आनंद देणारी आहे त्यावेळी अगदी मनापासून त्याचा आनंद घ्यायचा, जी गोष्ट वा परिस्थिती त्रासदायक आहे त्यावेळी कर्ता होऊन ती बदलण्यासाठी अवश्य प्रयत्न करायचा परंतु ज्यावेळी एखादी अशी परिस्थिती जी आपल्या आवाक्मयाबाहेरची आहे त्यावेळी साक्षी होऊन ते पहायचे. त्यामुळे अगदी कठीण प्रसंगातही त्या गोष्टीचा, प्रसंगाचा, परिस्थितीचा स्वीकार करण्याची क्षमता तर वाढते आणि त्या आलेल्या कठीण टप्प्यातून वाटचाल करत असताना मानसिक अनारोग्याच्या दिशेने होणारा प्रवासही टाळता येतो. तसेच मनात येणारे विचार आणि भावना या बाबतची सजगता वाढते. ज्या त्रासदायक भावना आहेत त्यांची तीव्रता, वारंवारता आणि कालावधी यामध्ये वाढ होत नाही ना याकडेही लक्ष राहते. त्यामुळे मानसिक आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. तसेच लक्ष देण्याचे कौशल्यही विकसित होण्यासाठी मदत होते. मात्र दररोज दहा मिनिटे शांत बसून असा सराव करायला हवा. चला तर मग...अशा सरावाला सुऊवात करता आहात ना?

-अॅड. सुमेधा संजीव देसाई

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article