परिणाम स्विकारतांना...
आमच्या लहानपणी गावात सायकलचे एखादे दुकान असायचे. कुणाकडे मोटरसायकल किंवा कार क्वचितच दिसायची. पण आता मोठे झाल्यानंतर सगळंच काही बदलून गेले. अगदी छोट्या मुलांच्या खेळातसुद्धा अनेक प्रकारच्या जगातल्या गाड्या दिसतात. शाळेतसुद्धा मुलांमध्ये कार विषयी, गाड्यांविषयी चर्चा सुरू असते. आणखीन एक फरक जाणवला तो म्हणजे आसपासची सायकलची दुकानं कमी झाली आणि जिम सगळीकडे खूप वाढली. खेळाची मैदाने ओस पडली पण जिममध्ये मात्र भरपूर गर्दी. कुठे तुम्ही हॉटेलवर गेलात तर कानावरती हमखास येणारा विषय म्हणजे कॅलरी बर्न करायच्या आहेत, चालायचं आहे, ही वाक्ये. आता चालणं मोजणारी घड्याळं आम्ही घ्यायला लागलो. या सगळ्यात घरी आलं की घरी आपल्या आया आणि ताया दोघीजणी या कॅलरी बद्दलच बोलताना दिसतात.
अगदी जेवणातसुद्धा अनेकांच्या घरात भोपळ्याच्या भाज्या, पालेभाज्या, पडवळ यासारख्या गोष्टी जास्त दिसायला लागतात. तेव्हा नक्की समजावं की यांच्याकडे कॅलरी मोजल्या गेल्यात. कोणत्या पदार्थातून किती कॅलरी शरीरात जातात, याचे तत्तेसुद्धा हल्ली घरोघरी लावलेले दिसतात. पूर्वी फार तर काय पाढ्यांचे तत्ते असायचे पण आता ह्या तक्त्यांनी जास्त जागा व्यापली आहे. आईने ताईला भात वाढू का? म्हटलं की ती लगेच सांगायची, गं बाई याच्यातून ना खूप कॅलरी जातात आणि माझ्या काही त्या बंद केल्या जात नाहीत.
खरंतर कोकणातली माणसं रोजच्या जेवणात भाताच्या पलीकडे काही खातच नाहीत पण सतत कष्ट केल्यामुळे अगदी सुटसुटीत किडकीडीत अशी त्यांची शरीरयष्टी असते. बटाटा खाण्याबद्दलही तेच. बटाट्याचं काही करू का किंवा भाजीत घालू का म्हटलं की मुलं ओरडायला लागतात. त्यांनी सुद्धा फॅट्स वाढतात पण अनेक देश असे आहेत की जिथे फक्त बटाट्याचे पीक घेतले जाते. अशा ठिकाणी लोक काही सगळेच जाड असतात असे नाही तर बरेचसे लोक बारीकही असतातच की...
आम्ही इंग्रजी भाषा जशी स्वीकारली, त्याप्रमाणे इंग्रजी संस्कृतीदेखील आपलीशी केली. ब्रिटिश जरी भारतातून निघून गेले असले तरी या अनेकशा गोष्टी आमच्याकडे तशाच राहिल्यात. त्यांच्या खाण्यापिण्याच्या पद्धती, त्यांच्या कपड्यांच्या पद्धती आणि मग लक्षात आलं की त्यांच्यासारखं फ्रोझन फूड खायची सवयसुद्धा आमच्याकडे या इंग्रजाळलेल्या लोकांमुळे आलेली आहे. या लोकांकडे असलेले फ्रिज म्हणजे त्यांच्याकडे जेव्हा बर्फ पडतो त्यावेळेला या बर्फाच्या कालखंडात त्यांना ताजं अन्न किंवा मास मटण मिळत नाही म्हणून ते फ्रोझन पदार्थ खाण्याची पद्धत त्यांच्याकडे असते. परंतु आम्ही अनुकरण करणारे अशा ह्या गोष्टी फ्रीजसारख्या गोष्टी आमच्याकडे सर्रास वापरू लागलोय आणि गरज नसताना या फ्रिजमध्ये ठेवलेले अन्न आम्ही चार चार दिवसांनी काढून खातोय. त्याच्यावर आमची आजी हसून नेहमी म्हणायची, ‘आज जेवणात काय असेल काही सांगता येत नाही.’ शिवाजीच्या काळातली खीर असेल नाहीतर संभाजीच्या बारशाची पुरणपोळी असेल. कोण केव्हा ताटात काय वाढतील काही सांगता येत नाही. तिच्या या म्हणण्यातला विनोदाचा भाग सोडला तर वास्तवात आम्हाला सगळीकडे हेच दिसतं. आम्ही अनेक पदार्थ शिळेपाके करून खात असतो. खरं म्हणजे आपल्याकडे ताजं खाण्याची सोय असतानासुद्धा, हे असं वागतो आम्ही. आमच्याकडे जरी उष्णता जास्त असली तरी या कॅलरीचे परिणाम आमच्यावर दिसायला लागले आहेत. शाळांमधून अनेक गलेलठ्ठ मुलं किंवा मुली आम्हाला दिसायला लागलेले आहेत. त्याचं कारण आजच्या युगात फ्रोझन फूड किंवा जंक फूड खाण्याचे वाढलेले प्रमाण.
या सगळ्याचा परिणाम आमच्यातली कॅलरी वाढण्याकडे होतो. हे जरी असलं तरी ह्याबरोबर लागणारे व्यायाम मात्र आम्ही बंद करून बसलेलो आहोत. सतत एका जागी बसून काम, लेखन या सगळ्यामुळे जाडी वाढते. कॅलरी वाढतात. आमचं चालणं कमी झालं आणि बोलणं जास्त वाढलं म्हणूनच या सगळ्याचे परिणाम आम्हाला कुठे ना कुठे पोहोचवायला लागतात. नॉनव्हेज जे लोक आहेत ते बसून काम करतात. त्यांनी खरं तर ह्या गोष्टी फार खाऊ नयेत आणि खाल्ल्या तर त्याच्या दुपटीने चौपटीने व्यायाम मात्र करायला हवा. पण हे कोणाला सांगणार आणि म्हणूनच आम्ही हे जे अर्धवट स्वीकारण्याचे धोरण आखले. त्याच्यामुळे कॅलरीचे प्रश्न पुढे भेडसवायला लागले आहेत.
बॉडी मास इंडेक्स बीएमआय बिघडायला आमच्या नोकऱ्या आणि आमची जीवन पद्धतीच कारणीभूत आहे. त्यासाठी
आम्हाला व्यायाम, सायकलिंग किंवा चालणं या गोष्टी वारंवार करायला हव्यात.