For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारतीय परंपरेतील लक्ष्मीपूजन

06:30 AM Nov 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
भारतीय परंपरेतील लक्ष्मीपूजन
Advertisement

आज दिवाळीतला लक्ष्मीपूजनाचा दिवस असून, दरवर्षी आश्विन महिन्यातल्या अमावस्येला लक्ष्मीपूजन मोठ्या उत्साहाने आणि भक्तीभावाने केले जाते. भारतीय धर्म आणि संस्कृतीत वंदनीय ठरलेली लक्ष्मी सगुण रुपात तिच्या हाती म्हाळुंगाचे फळ, गदा, चर्म व पानपात्र धारण केलेली दाखविलेली असते. मूर्तीत ती चतुर्भुज आणि अष्टादशभुज रुपात साकारलेली असते. लक्ष्मी देव-दानव यांनी आरंभलेल्या समुद्र मंथनातून निर्माण झाली आणि ती विष्णुपत्नी म्हणून ओळखली जाते. परंतु ती जेव्हा महालक्ष्मी होते, तेव्हा तिला शिवपत्नीचे रुप प्रदान केलेले आहे. ज्या ‘लक्ष्म’ या संस्कृत शब्दापासून लक्ष्मी या शब्दाचे उन्नयन झाले, त्याचा ‘चिन्ह’ असा अर्थ असून त्यामुळे लक्ष्मी ही कल्याणकारक, शुभदायिनी देवतेच्या रुपात वंदनीय ठरलेली पाहायला मिळते. महाराष्ट्रातील कोल्हापूर येथील महालक्ष्मी मंदिर हे एक शक्तीपीठ मानलेले असल्याकारणाने, तिला दुर्गा रुपात भाविकांनी पाहिलेले आहे.

Advertisement

हिंदू शिल्पकलेत लक्ष्मीच्या विविध तऱ्हेच्या मूर्ती आढळत असून, जैन, बौद्ध शिल्पात तिच्या मस्तकी दोन्ही बाजूंना हत्ती जलाभिषेक करीत असल्याचे दाखविलेले आहे. नेपाळातल्या नेवार लोकांनी त्याचप्रमाणे तिबेटातल्या बौद्धात लक्ष्मी ही संपत्ती, समृद्धी यांची बोधीसत्त्व देवी मानलेली आहे. बौद्ध शिल्पात अभिषेक लक्ष्मी असून, मुख्यत्वे सांची भरहूत येथील बौद्ध शिल्पात लक्ष्मी दाखविलेली आढळते. बौद्ध शिल्पकलेत दोन हातात दोन कमळाची फुले धारण केलेली अभिषेक लक्ष्मी दाखविलेली आहे तर दुसऱ्या एका बौद्ध शिल्पात कमळावर उभ्या स्थितीत आणि दोन्ही हातात कमलपुष्पे दाखविलेली आहेत. भारतीय संस्कृतीत ऐश्वर्य, धन, संपत्ती यांची देवता म्हणून वंदनीय ठरलेली लक्ष्मी आठ रुपांत पूजली जाते. त्यात आदिलक्ष्मी, धनलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, धान्य लक्ष्मी, धैर्य लक्ष्मी, संतान लक्ष्मी, विजय लक्ष्मी आणि राजलक्ष्मी अशा आठ रुपांना विशेष स्थान लाभलेले आहे. विष्णुपत्नी, शिवपत्नी म्हणून पूजनीय ठरलेल्या लक्ष्मीला हिंदू, बौद्ध, जैन परंपरेत समृद्धीची देवता म्हणून महत्त्वाचे स्थान लाभलेले आहे आणि त्यामुळे तिचा लौकिक भारतीय उपखंडाबरोबर भारतापासून दूर असलेल्या इंडोनेशिया आणि अन्य देशांत पसरलेला पाहायला मिळतो. भारतीय इतिहासातल्या गुप्त साम्राज्याच्या कालखंडात लक्ष्मीच्या मूर्ती विपुल प्रमाणात आढळलेल्या आहेत. गुप्त सम्राटांना आपल्या साम्राज्याचा विस्तार करायचा होता. उत्पादन, व्यापारातून धनसंचय करायचा होता. साहित्य, ललित कलाक्षेत्रांतच नव्हे तर जीवनाच्या सर्व क्षेत्रात सौंदर्य आणि समृद्धी आणायची होती आणि याच हेतूच्या पूर्ततेसाठी गुप्त सम्राटांनी लक्ष्मीच्या पूजनाला प्राधान्य दिले होते आणि त्यामुळे त्या काळातल्या व्यापार, उद्योगात असलेल्या लोकमानसाने लक्ष्मी पूजनाची परंपरा जोपासलेली पाहायला मिळते. गुप्त सम्राटाच्या शिक्क्यावरतीही लक्ष्मीची मूर्ती कोरलेली असायची. उज्जयिनी येथे सापडलेल्या राजमुद्रांवरती लक्ष्मीचे चित्र कोरलेले आढळलेले आहे.

श्रीलक्ष्मी असे नाव आज प्रचलित असले तरी श्री आणि लक्ष्मी हे दोन्ही शब्द ऋग्वेदात आढळलेले असून, श्री आणि लक्ष्मी ही भिन्न देवतांची नावे असल्याचे स्पष्ट झालेले आहे. संशोधकांच्यामते श्री ही लक्ष्मीच्याही पूर्वीची देवता होती आणि मोहेंजोदडो येथील उत्खननावेळी टोकदार मुकुट घातलेली मृण्मयी देवता आढळलेली आहे, ती देवी कदाचित श्री देवीच असली पाहिजे, असा मतप्रवाह आहे. असुरांची एक वैभवदात्री देवता असून, तिला माया असे नाव होते. तेज, कांती, ऐश्वर्याची देवता म्हणून मायेला स्थान लाभले होते आणि माया या देवतेतून लक्ष्मीची संकल्पना विकसित झाल्याचे मानले जाते. लक्ष्मी देवतेचे रुप जेव्हा भाविकांत वंदनीय ठरले, तेव्हा कमळ, हत्ती, सुवर्ण, बिल्वफळ आदी वस्तु निगडीत झाल्या. कमल पुष्पात वास्तव्य असणारी, हाती कमळ धारण केलेली, अतिधवल वस्त्र, शुभ्र चंदन आणि शुभ्र फळे ज्या देवतेला अर्पण केलेली आहे, अशी लक्ष्मी भारतीय धर्म आणि संस्कृतीत वंदनीय ठरलेली आहे. तिच्या ठायी शांती, प्रेम, दया, सलोखा, न्याय-नीती, औदार्य आदी गुण असल्याकारणाने भाविकांना ती प्रिय ठरलेली आहे. पद्मावस्थेत म्हणजे कमळावर आसनस्थ झालेली, पद्मग्रहे हाती कमळ धारण केलेली आणि पद्मवत्स म्हणजे कमलपुष्पांनी युक्त देवीची रुपे प्रिय ठरलेली आहेत.

Advertisement

समुद्र मंथनातून जशी लक्ष्मी प्रकट झाली, त्याचप्रमाणे अलक्ष्मीही प्रकट झाली. अलक्ष्मीला कलहप्रिया, दारिद्र्या म्हणून ओळखले जाते. अलक्ष्मीच्या आगमनाने घरातले स्थैर्य, शांती आणि समृद्धी गायब होते. भावा-भावात भांडण-तंटे होऊन त्यांच्यातला संघर्ष टोकाला जातो आणि त्यामुळे त्यांचे आर्थिक स्थैर्यही लोप पावते, अशी लोकमानसाची धारणा आहे. अलक्ष्मीला लक्ष्मीची सावली मानलेली असली तरी तिच्या आगमनाने कलह दारिद्र्या येत असल्याकारणाने तिला अशुभकारक मानलेले आहे. अशुभ, पाप, दारिद्र्या, वेदना, विनाश येत असल्याने तिला दुर्भाग्याची देवता म्हटलेली आहे. केरसुणी आणि कावळाही अलक्ष्मीची चिन्हे तर गाढवाला तिचे वाहन मानलेले आहे. घुबड हे तिचे वाहन मानलेले आहे. भारतीय धर्म संस्कृतीतल्या देवी पूजनात आश्विनातल्या नवरात्रीत महाकाली, महासरस्वती यांची ज्याप्रमाणे पूजा केली जाते, त्याचप्रमाणे महालक्ष्मीच्या पूजनाचीही परंपरा आहे. बंगाल, आसाम आदी राज्यात नवरात्रोत्सवाच्या अंतिम टप्प्यात महालक्ष्मीचे पूजन केले जाते.

परंतु असे असले तरी आश्विनातल्या अमावस्येला होणाऱ्या लक्ष्मी पूजनाला देशभरातल्या उद्योग, व्यवसाय आदी क्षेत्रांत गुंतलेल्या मंडळींकडून विशेष महत्त्व दिलेले आहे. नरक चतुर्दशीला नरकासूर दहन करून, दिव्यांची सुरेख आरास सजवून दिवाळी साजरी केली जाते आणि दुसऱ्या दिवशी धनदौलतीची प्राप्ती व्हावी आणि घरात सुख-समृद्धी यावी म्हणून लक्ष्मी पूजन मोठ्या उत्साहात साजरे केले जाते. यादिवशी घरातून दारिद्र्या जावे म्हणून केरसुणीचे पूजन केले जाते. शरद ऋतूमधील कोजागरी पौर्णिमेच्या रात्रीही, कोण जागे आहेत, हे पाहण्यासाठी प्रत्यक्ष लक्ष्मी येते आणि जागृत असणाऱ्या भाविकांवरती धन-संपत्तीचा वर्षाव करते, अशी धारणा रुढ आहे. परंतु दिवाळीतला लक्ष्मी पूजनाचा दिवस हा विशेष महत्त्वाचा मानलेला असून, त्या रात्री भक्तीरसपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन उत्साहाने केले जाते. पूर्वीच्या काळी जेव्हा भातकापणी होऊन अन्नाचे दाणे-गोटे अंगणात यायचे, तेव्हा इथला कष्टकरी आनंदित व्हायचा आणि त्याला लक्ष्मीचे आगमन झाल्याचे वाटून आपला आनंद लक्ष्मी पूजनातून द्विगुणीत करायचा.

- राजेंद्र पां. केरकर

Advertisement
Tags :

.