सर्वाधिक काम कोणत्या देशात ?
एका कर्मचाऱ्याने एका आठवड्यात किती तास काम करावे, हा सध्या देशात चर्चेचा विषय बनला आहे. नुकतेच एका प्रसिद्ध कंपनीच्या उच्च अधिकाऱ्याने यासंदर्भात विधान केले असून त्याने आठवड्याला 90 तास काम करावे, असे प्रतिपादन केले आहे. घरात आपण आपल्या पत्नीकडे कितीवेळ पहात बसणार आहात ? त्यापेक्षा रविवारीही कामाला या, असा सल्ला त्याने कर्मचाऱ्यांना दिल्याने उलटसुलट प्रतिक्रियांचे मोहोळ समाज माध्यमांवर उठलेले दिसून येते.
त्यामुळे ज्या देशात कर्मचाऱ्यांना सर्वाधिक काम करावे लागते, तो कोणता, असा प्रश्न अनेकांच्या मनात उमटला असल्यास आश्चर्य नाही. कित्येकांची समजूत अशी आहे, की चीन या देशात कर्मचाऱ्यांना सर्वाधिक काम करावे लागत असावे. कारण, चीनमध्ये कर्मचाऱ्यांना कशी वागणूक दिली जाते, हे स्पष्टपणे कधीच समोर येत नाही. आर्थिक उदारीकरण या देशाने पन्नास वर्षांपूर्वीपासून स्वीकारले असले, तरी राजकीय पोलादी पडदा मात्र हटविलेला नाही. त्यामुळे या देशाची कोणत्याही क्षेत्रातली नेमकी स्थिती कधी बाहेरच्या जगाला समजत नाही. तथापि, जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार कामाच्या तासांच्या संदर्भात चीन भारतापेक्षाही मागे आहे. प्रत्येक सप्ताहात सर्वाधिक काम करावे लागणाऱ्या देशात संयुक्त अरब अमिरातीचा क्रमांक प्रथम आहे. या भागात आठवड्याला 59.9 तास, अर्थात जवळजवळ 60 तास काम करावे लागते.
दुसऱ्या क्रमांकावर आपला भारत असून येथे प्रतिसप्ताह 50.3 तास काम करावे लागते. पाकिस्तानात 49.9 तास तर बांगला देशातही 49.9 तास काम करावे लागते. चीनमध्ये या देशांच्या तुलनेत कमी, म्हणजे प्रतिसप्ताह 45.7 तास काम करावे लागते. कर्मचाऱ्यांवर वाजवीपेक्षा अधिक काम करण्याची वेळ आली, तर त्यांच्या प्रकृतीवर गंभीर आणि दीर्घकालीन परिणाम होतात. त्यांची कार्यक्षमता आणि विशेषत: त्याची बौद्धिक कार्यक्षमता कमी होते. तसेच, त्याला शारिरीक आणि मानसिक अशा दोन्ही प्रकारांच्या समस्यांना तोंड द्यावे लागते.