For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हवं ते मिळाले किंवा न मिळाले तरी जो स्थिर असतो तो बाप्पांना प्रिय असतो

06:30 AM May 16, 2025 IST | Tarun Bharat Portal
हवं ते मिळाले किंवा न मिळाले तरी जो स्थिर असतो तो बाप्पांना प्रिय असतो
Advertisement

अध्याय नववा

Advertisement

बाप्पांनी सांगितलेली भक्तलक्षणे आपल्या वर्तनातून व्यक्त व्हावीत व हळूहळू ती इतकी अंगवळणी पडावीत की, आपल्याला बाप्पांनी सांगितलेल्या उपदेशानुसार वागायचंय हे मुद्दामहून लक्षात ठेवायची गरज पडू नये. तो आपला सहजस्वभाव व्हावा. पुढे बाप्पा म्हणतात, अमुक मिळाले म्हणून आनंदी, तमुक मिळालं नाही म्हणून दु:खी अशी भावना न बाळगणाऱ्या भक्ताला क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाचे ज्ञान असते. ह्या आशयाचा अनिष्टाप्तौ च न द्वेष्टीष्टप्राप्तौ च न तुष्यति । क्षेत्रतज्ञौ च यो वेत्ति समे प्रियतमो भवेत् ।। 19।। हा श्लोक आपण अभ्यासत आहोत. त्यानुसार अनिष्टप्राप्ति झाली असता जो द्वेष करत नाही, इष्टप्राप्ति झाली असता जो संतोष पावत नाही, क्षेत्र व क्षेत्रज्ञ यांना जो जाणतो तो मला अत्यंत प्रिय आहे. स्वत:ला कर्ता समजणारा मनुष्य मनात काहीतरी हेतू धरून कर्म करत असतो. पण मनासारखं झालं नाही की, आपण केलेले कष्ट वाया गेले असे त्याला वाटतं. साहजिकच मिळालेल्या फळावर तो समाधानी नसतो. कष्टाच्या मानानं मिळालेलं फळ अपेक्षेप्रमाणे नसल्याने हा आपल्यावर अन्यायच आहे अशा समजातून तो मिळालेल्या फळाचा द्वेषही करत असतो.

उदाहरणार्थ परीक्षेत कमी मार्क्स पडले की, पालक, विद्यार्थी दोघेही नाराज होतात आणि मिळालेल्या मार्कांवर नाराजी व्यक्त करत असतात किंवा काही वेळा असंही म्हणतात की, नापास झाला असतास तर बरं झालं असतं म्हणजे पुन्हा परीक्षेला तरी बसता आलं असतं. आता पास होऊनही काही उपयोग नाही. असं एकूणच परीक्षा आणि निकालाबाबत द्वेषपूर्ण बोललं जातं. तसंच उत्तम मार्क्स पडले असले तर त्या जोरावर पालक आणि विद्यार्थी हुरळून जातात. वास्तविक पाहता मिळालेले मार्क्स हे विद्यार्थ्याने केलेल्या कर्माचे म्हणजे अभ्यासाचे फळ असते. कसून प्रयत्न करणे हे विद्यार्थ्यांच्या हातात असते. त्यानुसार ते करतातही परंतु प्रयत्न आणि फळ यांच्यामध्ये नियती उभी असते. त्यामुळे प्रयत्न व फळ यांचा सरळ संबंध न येता आपल्या पूर्वकर्मानुसार आपल्याला फळ मिळत असतं आणि त्यावर कुणाचाही इलाज चालत नाही. हे ज्याच्या मनावर बिंबलेलं असतं तो एखादी गोष्ट मिळवण्यासाठी कसून प्रयत्न केल्यावर जे फळ मिळेल ते आपल्या हिताचं आहे हे लक्षात घेऊन स्वस्थ बसतो. हे स्वस्थ बसणं त्याला ईश्वराच्या भक्तीतून आलेलं असतं. तो हे जाणून असतो की, ईश्वर सदैव त्याच्या हिताच्याच गोष्टी घडवून आणतो आहे आणि आणणार आहे. तसेच त्याच्या हिताच्या गोष्टी घडवणं केवळ आणि केवळ ईश्वराच्या हातात आहे. हे सर्व लक्षात घेतल्याने, त्याच्यावर षड्रिपुंचा अंमल चालत नाही. तो मायेच्या प्रभावातून बाहेर पडलेला असतो. त्यामुळे त्याला सुखदु:ख, रागद्वेष, हर्षशोक आदि विकार जाणवत नाहीत. विकारमुक्त भक्त मायेच्या पलीकडे पोहोचलेला असतो. त्यामुळे त्याला स्वत:च्या शरीराबद्दल व त्याचं चालन करणाऱ्या ईश्वराबद्दल सर्व माहिती झालेली असते. यालाच क्षेत्रक्षेत्रज्ञविचार असं म्हणतात. ह्या अध्यायाचा मुख्य विषय हाच असून येथून पुढे आपण त्याचा सविस्तर अभ्यास करणार आहोत. क्षेत्र म्हणजे शरीर आणि त्याबाबत जाणणारा म्हणजे क्षेत्रज्ञ होय. तसेच ह्या अखिल ब्रह्मांडाचा परमेश्वराने मांडलेला पसारा हे ईश्वराच्या दृष्टीने क्षेत्र असून त्याबद्दल सविस्तर जाणणारा परमेश्वर हा क्षेत्रज्ञ आहे. श्लोकात बाप्पांनी सांगितल्याप्रमाणे क्षेत्रक्षेत्रज्ञविचार समजून घेऊन ते ज्याने जीवनात उपयोगात आणलेले आहेत असा विकारमुक्त भक्त बाप्पांचे प्रतिरूप झालेला असल्याने बाप्पांना अत्यंत प्रिय असतो.

Advertisement

क्रमश:

Advertisement
Tags :

.