For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

प्रगत एआय राष्ट्र : भारताची दुर्दम्य इच्छाशक्ती

06:53 AM Dec 15, 2025 IST | Tarun Bharat Portal
प्रगत एआय राष्ट्र   भारताची दुर्दम्य इच्छाशक्ती
Advertisement

9 डिसेंबर 2025 रोजी मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नडेला यांच्या भेटीतून साकारलेले नव्या गुंतवणूक धोरणाचे सोनेरी पैलू लक्षात घेण्यासारखे आहे. त्यामुळे सामान्य माणसाच्या जीवनशैलीत क्रांतिकारक बदल होणार आहेत व लोकांना कल्याणकारी योजना त्यांच्या घराच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचणार आहेत. विकसित भारताकडे वाटचाल करताना हे एक दमदार पाऊल आहे.

Advertisement

कृत्रिम प्रज्ञा किंवा एआय हे एक उगवते क्षेत्र आहे. या क्षेत्रात जगाचे भविष्य भारतामध्ये सामावले आहे. प्रथम अशी स्पष्ट भूमिका घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतीय उपखंडात कृत्रिम प्रज्ञा प्रसारासाठी कटिबद्ध झाले आहेत. त्यांच्या दृढ संकल्पाचा प्रत्यय नित्यनूतन ध्येयधोरणातून येतो. त्यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे डिजिटल इंडियाचे स्वप्न साकार झाले आहे आणि भारतामध्ये माहिती तंत्रज्ञानाबरोबरच कृत्रिम प्रज्ञा तंत्रज्ञानसुद्धा गतीने पुढे झेपावत आहे. जागतिक पातळीवर याचा प्रसार वाढणे ही गोष्ट संबंध विकसनशील जगाच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. या दृष्टीने विचार करता बिल गेट्स यांच्या मायक्रोसॉफ्ट या कंपनीने भारतात 17.5 दशलक्ष डॉलर्स गुंतवणुकीचा जो प्रस्ताव घोषित केला आहे त्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे.

नवीन गरुडझेप

Advertisement

लोकसंख्येच्या प्रमाणात एआयचा प्रसार वाढविण्यासाठी मायक्रोसॉफ्ट भारतामध्ये 17.5 अब्ज अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे. त्यामुळे होणारे लाभ बहुआयामी आहेत. भारताची लोकसंख्या 142 कोटीपेक्षा अधिक आहे. त्या तुलनेत एआयच्या प्रसाराची गती मात्र धीमी आहे. ही गती कशी वाढवता येईल हा मोठा चिंतेचा प्रश्न होता, परंतु मायक्रोसॉफ्टचे प्रमुख बिल गेट्स यांची दूरदृष्टी आणि उदार भूमिका यामुळे भारतीय उपखंडाला त्याचा लाभ होत आहे. मागील वर्षी आशिया खंडात मायक्रोसॉफ्टने या क्षेत्रात तीन अब्ज डॉलर गुंतवणुकीची घोषणा केली होती, यावर्षी ही रक्कम सहापट वाढविण्यात आली. एआयचे डेटा सेंटर जगभरात वाढत आहेत. त्यात भारताचा क्रमांक वरचा आहे. अशावेळी भारताची या क्षेत्रातील कामगिरी अधिक वर्धिष्णू व्हावी म्हणून मायक्रोसॉफ्टचे प्रयत्न खरोखरच वरदान ठरणारे आहेत. भारतातील 31 कोटी कर्मचाऱ्यांना इस्रम तसेच राष्ट्रीय करियर सेवा व्यासपीठावर उपस्थिती वाढविण्यासाठी मायक्रोसॉफ्टचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नडेला यांचे प्रयत्न हे एआय एकात्मिक विकासासाठी फलदायी ठरतील अशी आशा आहे.

2030 पर्यंत भारताची कौशल्य उपस्थिती सक्रिय व्हावी म्हणून मायक्रोसॉफ्ट वीस दशलक्ष अमेरिकन डॉलरपेक्षा अधिक निधी भारतात पोहचवणार आहे. त्यामुळे विकासाची वचनबद्धता 2030 पर्यंत 20 दशलक्षपर्यंत म्हणजे दुप्पट होईल अशी अपेक्षा आहे. या सर्व प्रस्तावांचे दूरगामी परिणाम काय होतील याचा विचार करता काही उपेक्षित पैलूवर प्रकाश टाकावा लागेल.

परिवर्तनाच्या उंबरठ्यावर

2025 मध्ये भारत एआय क्षेत्रात आज परिवर्तनाच्या उंबरठ्यावर उभा आहे. अशावेळी येथील सक्रिय आणि उत्पादक लोकसंख्येला एआयच्या वापराचे प्रशिक्षण दिल्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल आणि जीडीपीमध्ये अधिक वाढ होऊ शकेल. सर्वसमावेशक शाश्वत विकास आणि आर्थिक परिवर्तनासाठी प्रगत तंत्रज्ञान संप्रेरक ठरू शकते. भारत एक प्रगत एआय राष्ट्र म्हणून उदयास येत आहे. धाडसी निर्णय, प्रगत तंत्रज्ञान आणि नव उपक्रमांची आखणी यामुळे या प्रयत्नांना ठोस बैठक लाभत आहे. क्लाऊड तसेच पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी मायक्रोसॉफ्टची ही गुंतवणूक भारताला संजीवनी देणारी ठरणार आहे.

सत्या नडेलांची घोषणा

मायक्रोसॉफ्टचे अध्यक्ष सत्या नडेला यांनी पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांची भेट घेऊन या घोषणेचा आराखडा जाहीर केला आहे. त्यामध्ये मायक्रोसॉफ्टचा भारताविषयीचा उदार दृष्टिकोन दिसून येतो. भारताचा एआय रोड मॅप स्वच्छ आणि स्पष्ट आहे. येणारे दशक हे आव्हानांचे आहे तसेच सुवर्णसंधीचे सुद्धा. त्यामुळे या काळात मायक्रोसॉफ्ट आणि भारत एकत्रितपणे जगात नवीन बेंचमार्क म्हणजे नवा विक्रम प्रस्थापित करण्यासाठी संकल्पबद्ध झाले आहेत. देशाला डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा प्रदान करण्यापासून ते एआय सार्वजनिक सार्वभौम शक्ती केंद्राकडे नेण्यासाठी सज्ज झाले आहेत.

नव्या भविष्याची जडणघडण

मायक्रोसॉफ्टच्या पथदर्शक आराखड्यामुळे नव्या आशादाई तेजस्वी भविष्याची जडणघडण होत आहे असे भविष्य घडविताना अधिक न्याय, अधिक समतोल आणि अधिक सर्वसमावेशक विकास प्रक्रियांची आखणी करण्यासाठी ही योजना निश्चितच नवी संजीवनी देणारी असू शकेल. भारत ही जगातील चौथी अर्थव्यवस्था असून तिसऱ्या स्थानाकडे वाटचाल करत आहे. अशावेळी एआय तंत्रज्ञान डिजिटल अर्थव्यवस्थेला प्रेरक आणि संजीवक घटक म्हणून कार्य करणार आहे. नव्या आर्थिक महत्त्वाकांक्षा सिद्ध करण्यासाठी भारत आता विश्वास व सार्वभौम माहिती आणि डेटा नियोजनामुळे प्रगतीच्या नव्या दिशा धुंडाळण्यासाठी समर्थ झाला आहे. मायक्रोसॉफ्टची भारतामधील ही ऐतिहासिक गुंतवणूक प्रगतीला नवे वळण देणारी ठरू शकेल. भारताने आपल्या कल्याणकारी कार्यक्रमाच्या अंमलबजावणीमुळे सामाजिक न्याय संरक्षण क्षेत्रात एक नवा टप्पा गाठला आहे. कृत्रिम प्रज्ञा क्षेत्रातील कव्हरेज 2014 यावर्षी 19 टक्के होते ते आता 2025 मध्ये 64 टक्क्यावर पोहोचले आहे. भारताने मोठी मजल गाठली आहे, परंतु अजूनही लोकसंख्येच्या बऱ्याच मोठ्या भागाला या क्षेत्रात समाविष्ट करून घेण्यासाठी अधिक प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे. एआय तंत्राचा प्रसार सर्वदूर केल्यामुळे भारत सामाजिक सुरक्षा न्याय आर्थिक कल्याण या क्षेत्रात शंभर कोटी लोकांपर्यंत विविध योजना पोहोचवू शकेल. त्यामागे खरे रहस्य असेल ते एआय तंत्राच्या प्रभावी वापराचे. मायक्रोसॉफ्टच्या या गुंतवणुकीमुळे सुमारे 40 टक्के भारतीय वंचित लोक जे प्रगत तंत्रज्ञानापासून दूर होते त्यांना मध्यवर्ती प्रवाहात आणणे शक्य होईल. म्हणजे डिजिटल क्षेत्रातील आहे रे व नाही रे यातली दरी भरून काढणे त्यामुळे सोपे सहज आणि शक्य होऊ शकेल.

कृत्रिम प्रज्ञा प्रथम हेच भविष्य

पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी एआय फर्स्ट म्हणजे कृत्रिम प्रज्ञा प्रथम असे दूरगामी धोरण आखले आहे. या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी ते वचनबद्ध आहेत व त्यासाठी त्यांनी केलेला आराखडा हा तेवढाच महत्वाकांक्षी आणि तेवढाच फलदायी असा आहे. कृत्रिम प्रज्ञा क्षेत्रात राष्ट्रीय रणनीती ठरविण्यासाठी आणि यशस्वी करण्यासाठी हे एक दमदार पाऊल आहे. त्यामुळे एनसीए पोर्टलवर नोकरी प्रदान करणे तसेच भागधारक म्हणून सहभागी होण्यासाठी तरुण ग्राहकांना त्यांच्या परिसंस्थांना प्रोत्साहित करण्यासाठी मायक्रोसॉफ्ट पुढाकार घेऊन अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी आणि सामुदायिक भागीदारी अधिक सक्रिय करण्यासाठी त्यामुळे मदत होणार आहे.

मायक्रोसॉफ्ट गेल्या तीन दशकापासून भारताच्या राष्ट्रीय आर्थिक पुनर्रचनेचा एक भाग बनलेले आहे. भारत आपले एआय प्रथम हे धोरण यशस्वी करण्यासाठी आत्मविश्वासाने वाटचाल करत आहे आणि या वाटचालीत मायक्रोसॉफ्ट भारताचे बोट धरून आशिया खंडात नवे दमदार पाऊल टाकत आहे.

तीन टप्प्यावर परिवर्तन

लोकसंख्येच्या प्रमाणात कृत्रिम प्रज्ञाची उपलब्धी कौशल्य विकास आणि विस्तार तसेच सार्वभौम तंत्र निपूणतेची जडणघडण यामुळे राष्ट्रीय स्तरावर क्रांतिकारक बदल घडतील. नवोन्मेष आणि प्रयोगशील प्रतिभेला चालना देण्यासाठी एका व्यापक परिसंस्थेच्या विकासाला त्यामुळे नवी दृष्टी लाभेल. तंत्र सुसंगत कार्य संस्कृती विकसित होईल व नवीन विक्रम स्थापित करणे शक्य होईल.

मायक्रोसॉफ्टच्या या नवीन भागीदारीमुळे एआय क्षेत्रात भारतामध्ये तीन टप्प्यावर संभाव्य परिवर्तन शक्य होणार आहे. त्यापैकी पहिला टप्पा हा उच्च पातळीवरील पायाभूत सुविधांच्या विकासावर आधारलेला आहे, दुसरा विश्वास वृद्धीवर भर देणारा आहे, परस्पर विश्वास तसेच सार्वभौम निर्णय क्षमता सुनियोजित कौशल्य कार्यक्रम आणि एआय तंत्रज्ञान भारताच्या विकास सहभागाला बळकटी देणारे जसे आहे तसेच ते भविष्यात आत्मविश्वासाने वाटचाल करण्यासाठी संप्रेरक म्हणून नवे चैतन्यदायी सामर्थ्य देणारे ठरणार आहे. तिसरा टप्पा हा कौशल्य वृद्धीवर भर देणारा कार्यक्रम पुढे नेण्यासाठी उपयुक्त ठरेल. त्यामुळे भारत भविष्यकाळात सक्रिय शाश्वत विकास चक्रांना गती देऊ शकेल. व्यापक पायाभूत सुविधा सार्वजनिक पातळीवर विकसित होतील आणि अशा सुविधामुळे नवी झेप घेताना अद्वितीय कामगिरी करणे शक्य होईल.

मायक्रोसॉफ्टची ही गुंतवणूक मोहीम भारतामध्ये कृत्रिम प्रज्ञा क्षेत्रात एक नवा टप्पा गाठण्यासाठी हितकर ठरेल आणि एआय व्यासपीठावरून शेती, उद्योग,  शिक्षण, आरोग्य, सामाजिक सुरक्षा या क्षेत्रात नवी कामगिरी सक्रियपणे करणे शक्य होईल. त्यानुसार भारतातील प्रमुख आयटी नगरे बंगळूरू, भागानगर (हैदराबाद) पुणे, गुरुग्राम (गुडगाव) नोएडा (इंद्रप्रस्थ नगरी) आणि इतर शहरात 22000 हून अधिक कर्मचाऱ्यांचे सबलीकरण करण्यासाठी फलदायी ठरेल. त्यामुळे नमुनेदार विकासापासून ते पुढील काळात उत्पादन अभियांत्रिकी नवोपक्रमापर्यंत सर्व प्रक्रियांना गती देण्यासाठी हे प्रयत्न कारणी लागतील अशी अपेक्षा आहे.

मायक्रोसॉफ्टने भारतामध्ये एआयचा प्रसार समाजाच्या सर्व स्तरावर सर्व गटांमध्ये आणि सर्व प्रदेशांमध्ये करण्याचा संकल्प केला आहे. त्यासाठीच तर अतिरीक्त गुंतवणूक करण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे भारतात एआय अर्थात कृत्रिम प्रज्ञाचा अवलंब सक्षम करण्यासाठी प्रयत्न करणे शक्य होईल. भागानगर येथील साउथ सेंट्रल क्लाऊड रिजनमध्ये होत असलेली महत्त्वपूर्ण प्रगती अधिक गतिमान करण्याचा हा प्रयत्न आहे. त्या प्रयत्नामध्ये सुसूत्रता आणण्याचा हा संकल्प आहे. पुढे चालून मायक्रोसॉफ्ट आपल्या पुणे, भागानगर तसेच चेन्नई या ठिकाणी असलेल्या डेटा सेंटर केंद्रांचा विस्तार करण्यासाठी प्रयत्नशील आहे. या विस्तारामुळे भारतात काम करणाऱ्या या संस्थांना अधिकचे पर्याय उपलब्ध होतील तसेच उद्योग स्टार्टअप आणि सार्वजनिक क्षेत्रातील उत्पादक संस्था यांनाही लाभ होईल.

- डॉ. वि. ल. धारूरकर

Advertisement
Tags :

.