परवानगी मिळो अथवा न मिळो महामेळावा घेणारच
म. ए. समिती नेत्यांची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसमोर भूमिका
प्रतिनिधी/ बेळगाव
कर्नाटक विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला प्रत्युत्तर देण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने महामेळाव्याची घोषणा केली आहे. प्रशासनाला मेळाव्याच्या परवानगीसाठी अर्जही देण्यात आला आहे. बुधवारी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी म. ए. समिती नेत्यांशी चर्चा केली. खडेबाजार एसीपी कार्यालयात कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त नारायण बरमणी यांनी म. ए. समिती नेत्यांशी चर्चा केली. सोमवार दि. 8 डिसेंबर रोजी तुम्ही काय करणार आहे? अशी विचारणा केली. त्यावेळी म. ए. समितीच्या नेत्यांनी महामेळावा भरवणार असल्याचे अधिकाऱ्यांना सांगितले.
आपण परवानगीसाठी अर्जही दिला आहे. परवानगी दिलात न दिलात तरी मेळावा होणार आहे, अशी भूमिका मांडली. यावेळी प्रकाश मरगाळे, माजी आमदार मनोहर किणेकर, माजी महापौर मालोजी अष्टेकर, रणजित चव्हाण-पाटील, अॅड. एम. जी. पाटील, अंकुश केसरकर आदी उपस्थित होते. खडेबाजारचे एसीपी शेखरप्पा एच. व पोलीस निरीक्षक श्रीशैल गाभी हेही या चर्चेदरम्यान उपस्थित होते.