सूचना फलकांअभावी गतिरोधक बनताहेत वाहनचालकांसाठी मृत्यूचे सापळे
प्रवासी-नागरिकांतून संताप : अनेक वाहनधारक पडून जखमी झाल्याच्या घटना
वार्ताहर/उचगाव
उचगाव-कोवाड या मार्गावर उचगाव फाटा ते बसुर्ते क्रॉस या तीन किलोमीटर अंतराच्या रस्त्यावर वाहनांच्या वेगावर नियंत्रणासाठी घातलेले गतिरोधक व या ठिकाणी गतिरोधकचे कोणतेही फलक अथवा पांढरे पट्टे नसल्याने हेच गतिरोधक वाहनचालकांच्या मृत्यूचे सापळे बनल्याने प्रवासी व नागरिकांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे. या गतिरोधकबाबतची अधिक माहिती अशी की, उचगाव फाटा ते बसुर्ते क्रॉसपर्यंतच्या उचगाव-कोवाड या मार्गाचे डांबरीकरण करण्यात आलेले आहे. या रस्त्यावरून वाहने बेफाम धावत असल्याने अपघाताची मालिका सुरू झाली आहे. परिणामी सदर रस्त्यावर गतिरोधक घालण्यात यावे, अशी मागणी या भागातील व यामार्गे ये-जा करणाया हजारो प्रवाशांतून केली जात होती.
या मागणीनुसार उचगाव फाटा ते बसुर्ते क्रॉस या मार्गावर सार्वजनिक बांधकाम खात्याने तीन गतिरोधक घातले. गतिरोधक रस्त्यावर आल्याने रात्रीच्या वेळी भरधाव धावणाऱ्या अनेक दुचाकी व चारचाकी वाहने या गतिरोधकवरून पडून मोठे अपघात झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. या गतिरोधकवरून ये या करताना वाहने व वाहनावर बसलेल्या महिला पडून जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. अनेक जण पडून बेशुद्ध झाल्याच्याही घटना झाल्या आहेत. सदर ठिकाणी गतिरोधक नावाचे फलक याबरोबरच घातलेल्या गतिरोधकवर पांढरे पट्टे, चिन्हे वापरली नसल्याने मोठ्या प्रमाणात या गतिरोधकवर अपघात होत आहेत. तरी तातडीने सार्वजनिक बांधकाम खात्याने या गतिरोधकवर पांढरे पट्टे त्याचबरोबर अशाप्रकारचे फलक लावावेत, अशी मागणी करण्यात येत आहे.