ऊस तोडणी कामगार आणायचे कोठून?
कोल्हापूर :
विदर्भ मराठवाड्यात गेल्या दोन वर्षात चांगला पाऊस झाला आहे. कोल्हापुरातील यंदा गाळप हंगाम घेणाऱ्या 22 कारखान्यांसाठी किमान सव्वालाख ऊसतोडणी कामगारांची गरज आहे. ऊसतोडणी मशिनरीची संख्या, भौगोलिक परिस्थिती, कारखान्यातील तांत्रिक बदल आदी कारणांमुळे यांत्रिक तोडणीवर मर्यादा आहेत. यावर्षी ऊसतोडणी कामगार आणायचे कोठून? असा कारखान्यांपुढे तर शिवार रिकामे करण्याचा मोठा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे.
एफआरपीसह कारखान्याची देणी भागवण्यासाठीची आर्थिक जोडणी करताना कारखान्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. यातच साखरेच्या विक्री दरात सरासरी तीनशे रुपयांनी घट झाल्याने कारखान्यांपुढील अडचणींचा पाढा वाढतच आहे. कोल्हापुरात बैलगाडीने वाहतूक आणि माणसांकरवी ऊस तोडणीसाठी भौगोलिक परिस्थिती आहे. मशिनरीच्या सहाय्याने ऊस तोडणी करण्यासाठी मोठ्या शिवारांची गरज असते. जिह्याच्या पूर्व भागातील शेती मशिनरीने ऊस तोडीसाठी पुरक असली तरी पश्चिम भागात लहान तुकड्यांची शेती आहे. मशिनरीने ऊस तोड होईल, अशा शिवारांची संख्या खूपच कमी आहे. मशिनरी ऊस तोडणीसाठी लहान शेतकऱ्यांची मानसिकता नाही.
एका साखर कारखान्याला किमान 4 ते 7 हजार इतके ऊस तोडणी कामगार लागतात. जिह्यात सरासरी सव्वालाख ऊस तोडणी कामगार दर हंगामात येतात. कर्नाटक, विदर्भ आणि मराठवाड्यातून मोठ्या संख्येने ऊस तोडणी कामगार येत असतात. यंदाच्या वर्षी या परिसरात चांगला पाऊस झाला आहे. त्याचाही परिणाम ऊस तोडणी कामगार येण्यावर झाला आहे.
मशिन तोडची अडचण
कोल्हापूर जिह्यात शिरोळ तालुक्यात वगळता सलगपणे मोठ्या आकाराचे ऊस क्षेत्र इतर ठिकाणी कमी आहे. ऊस तोडणी यंत्राचा सर्रास वापर करण्यात मोठी अडचण येते. तोडणी मशिनचा ऊस कारखान्यात आणल्यानंतर काही तांत्रिक बदल करावे लागतात. भौगोलिक आणि तांत्रिक मर्यादा असल्याने ऊस तोडणी मशिन हा कोल्हापूर जिह्यासाठी संपूर्ण पर्याय होऊ शकत नाही.