For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

घाबरू नका...! फसलात तर... 1930 नंबरला फोन करा

10:52 AM Dec 18, 2024 IST | Radhika Patil
घाबरू नका     फसलात तर    1930 नंबरला फोन करा
Don't panic...! If you get stuck... call 1930.
Advertisement

कोल्हापूर / सुधाकर काशीद : 

Advertisement

तुम्हाला कोणी बॉस असणार नाही, आरामात घरात बसून काम करा, आणि घरात बसूनच कमाई करा, असा मेसेज विनायकरावांना आला. ते खुश झाले. आता रिटायर होऊन घरीच आहे तर, आणखी काहीतरी कमाई करायला काय हरकत आहे? असा विचार त्यांच्या मनात आला. हा विचार चुकीचाही नव्हता. मग त्यांनी त्या मोबाईलवरील नंबरशी संपर्क साधला. पलीकडचा माणूस अतिशय गोड बोलणारा. त्यांने ‘विनायक अंकल नमस्कार,’ असे म्हणत बोलायला सुरुवात केली. तो माणूस जसे सांगेल तसे विनायकराव मोबाईलवर माहिती पाठवू लागले. विनायकरावांच्या मनातही आलं नाही, की आपल्याला कोणीतरी फसवते आहे. पण तेथेच समजुतीचा घोटाळा झाला. मोबाईल ठेवल्यावर काही वेळातच त्यांना एक मेसेज आला. मेसेज वाचून त्यांचा घसाच कोरडा पडला. कारण त्यांच्या खात्यावरचे 36 हजार रुपये काही क्षणातच कमी झाले होते. विनायकराव गोंधळले. गडबडले. काय करायचे, त्यांना समजेना. घरात बायकोला, मुलाला सांगावे तर ते आपले अक्कल काढणार! पोलिसात जावे तर पोलीस म्हणणार ‘झक मारायला हा उद्योग केला काय? या विचाराने ते गप्प बसले. पैसे गेले तर जाऊ देत. गावभर चर्चा नको, असे त्यांनी मनाशी ठरवले.

हे झाले एका विनायकरावांचे उदाहरण. पण आपल्या आजूबाजूचे अनेक विनायक राव असे मोबाईल वरून येणाऱ्या आमिषाला रोज बळी पडत आहेत, कोठे कशाला तक्रार करायची म्हणून गप्प बसत आहेत. स्वत:लाच चापट मारून घेत आहेत. हे रोज कोठे ना कोठे घडत आहे, हे खरे आहे. साऱ्या जगालाही ते माहिती आहे. पण असे आपल्याबाबत झाल्यावर आपण काय करायचे, हे फार कमी जणांना माहिती आहे. तर अशावेळी आपण काय करायचे आहे? आपण लगेच फक्त मोबाईलवरून 1930 या सायबर शाखेच्या क्रमांकाला फोन करायचा आहे. ते विचारतील ती माहिती द्यायची आहे. त्यामुळे तुमची फसवणूक टळू शकणार आहे. लगेच ते पैसे तुम्हाला परत मिळणार नाहीत. पण निदान ज्याने तुम्हाला फसवले त्या भामट्याला ते पैसे उचलणे अशक्य होणार आहे. अर्थात झटपट हालचाली केल्या, 1930 ला तातडीने फसवणुकीचे स्वरूप कळवले तरच हे होणार आहे.

Advertisement

कोल्हापूर जिह्यात असे जवळजवळ एक कोटी रुपये भामट्यांच्या खात्यावर जाणे कोल्हापूर पोलिसांच्या सायबर शाखेमुळे टळले आहे. अर्थात ज्यांनी तातडीने तक्रार केली नाही, अशा असंख्यांचे कोटीच्या कोटी रुपये भामट्याने उचललेच आहेत. फसवणुकीचे प्रमाण खूप आहे. फसणारे विनायकराव तर घराघरात आहेत. पण तरीही पोलिसांची सायबर शाखा खूप अॅक्टिव्ह झाली आहे. ती आपल्या परीने हे रोखण्याचा प्रयत्न करत आहे. नुकतीच राज्यातील पोलिसांची कर्तव्य स्पर्धा झाली. या स्पर्धेत कोल्हापूर सायबर शाखेचे हवालदार अजय सावंत यांना सुवर्णपदक मिळाले. कॉम्प्युटर अवेअरनेस ऑफिस ऑटोमेशन या विभागात ते पहिले आले. त्यांची या विषयात चांगली जाण आहे.

दरम्यान भामट्याने आपले काम बरोबर केलेले असते आणि इतक्या सहजतेने त्यांच्यापर्यंत पोहोचणे आपल्याला शक्य नसते. त्यामुळे फसवणूक झाल्याचे ज्या क्षणी ध्यानात येईल, त्या क्षणी पहिला फोन 1930 नंबरला करावा. त्यानंतर ऑटोमायझेशन सिस्टीममुळे सेंट्रलाईज ट्रॅकिंग सुरू होते. ज्या खात्यावर पैसे गेलेले असतात. ते पैसे तरी भामट्याने उचलण्यापूर्वी रोखता येतात. पुढच्या काही प्रोसिजरने ते परतही मिळू शकतात.

अजय सावंत यांच्या निरीक्षणानुसार दुय्यम कमाईचे साधन या अमिषाला लोक सहज बळी पडतात. त्यात सुशिक्षितच अधिक असतात. त्यामध्ये चांगले निवृत्त अधिकारी, डॉक्टर, उद्योजकही असतात आणि ते दुय्यम उत्पन्नाच्या अमिषापोटी स्वत:ची आहे ती मोठी रक्कमही गमावतात. त्यामुळे अशा मेसेजची दखलच न घेणे ही फार मोठी गरज आहे. किंवा आम्ही वारंवार हेच आवाहन लोकांना करतो पण लोक ऐकत नाहीत. फसवणूक झाल्यावर तरी मग त्यांनी तातडीने सायबर सेलशी संपर्क साधणे आवश्यक आहे. पोलीस काहीच करत नाहीत, ही समजूत पहिल्यांदा काढणे आवश्यक आहे.

                                मोबाईल टू मोबाईल फसवणुकीपासून जपा 

तरुण भारत संवाद’शी बोलताना ते म्हणाले, सायबर गुन्हे करणाऱ्या टोळ्याच तयार झाल्या आहेत. चोरी, दरोडा घरफोडीची रिस्क न घेता या टोळ्या सहजपणे मोबाईल टू मोबाईल लोकांची फसवणूक करत आहेत. केवळ घर बसून कमाई करा, असले मेसेज नव्हे तर शेअर मार्केट, ट्रेडिंग, क्रेडिट पॉईंट, पेटीएम, खरेदी डिस्काऊंंट, व्हौचर व्हर्च्युअल फ्रेंडशिप अशा विविध आमिषाने ते कोणाला ना कोणाला फसवत आहेतच. झक मारली आणि फसलो, असे म्हणत अनेकजण गप्प बसत आहेत. अनेकांना आता पुढे काय करायचे, हे नीट माहीत नसते. त्यामुळे ते गप्प बसतात. किंवा खूप उशिरा सायबर शाखेकडे येतात.

                                                    घाबरू नका

एकटेपणात राहणाऱ्या अनेक व्यक्ती व्हर्च्युअल फ्रेंड या आमिषाला बळी पडतात. फोनवरून एखादी महिला चॅटिंग करते म्हटल्यावर ते त्यात अडकतात. परत व्हिडिओ कॉल करतात. पण फसवणूक करणाऱ्या टोळ्या त्या व्हिडिओचे मॉर्फिग करतात. त्या त्या व्यक्तीला नग्न दाखवतात आणि धमकी देऊन पैसे उकळतात. असला आपला व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आपल्याला जगात तोंड दाखवायला जागा राहणार नाही, या भीतीने लोक पैसे पाठवत राहतात. वास्तविक, जे झाले ते झाले. पण मॉर्फिंग व्हिडिओ सायबर शाखेला ओळखता येतो. त्यातून सत्य बाहेर येऊ शकते. अनेकवेळा एआय तंत्राने वाटेल ते मॉर्फिंग केलेले असते. किंवा पलीकडून बोलणारी महिला नसतेच. बनावट आवाजाने लोकांना फसवले जाते. त्यामुळे लोकांनी न घाबरता तक्रार करण्याची गरज आहे. धमकीला तर घाबरू नयेच आणि महत्त्वाचे म्हणजे असले व्हिडिओ कॉल टाळावेतच, असे सायबर सेलचे आवाहन आहे.

Advertisement
Tags :

.