शहरात 50 कोटींचे पाणी मुरतेय कुठे?
कोल्हापूर / संतोष पाटील :
शहर आणि उपनगरासाठी रोज तब्बल 180 ते 190 दशलक्ष लिटर (एम.एल.डी.) पाण्याचा उपसा होतो. बिलींग मात्र फक्त 60 ते 70 दशलक्ष पाण्याचेच होते. 20 टक्के पाणी गळती, बगीचे, मैदानासाठी वारेमाप वापर, मोफतचा पाणी, 35 टक्के जोडणीचा स्थिर आकार, शहरालगत ग्रामीण भागात सुमारे दीड हजारांहून अधिक घरात चोरुन पाणी आदी कारणांमुळे महापालिकेला अंदाजे 50 कोटींहून अधिकचा फटका बसत आहे. पाण्याची नेमकी गरज आणि पुरवठा यावर नियंत्रणासाठी पाण्याच्या टाक्यांवरच मीटर यंत्रणा बसवण्यात येणार आहे.
पाणी पुरवठ्याकडील नोंदीनुसार शहरात 1 लाख 4 हजार 862 नळजोडण्या आहेत. यातील शिंगणापूर, नागदेववाडी, पाडळी, बालिंगा, पाचगांव आणि कळंबा परिसरासह उपनगरात 6 हजार 582 नळ जोडण्या आहेत. याच परिसरात पाणी पुरवठ्यातील अधिकाऱ्यांनी तोडपाणी करत परस्पर सुमारे दीड हजार नळजोडण्या पाणी मीटर न जोडताच दिल्या असाव्यात, असा अंदाज जल अभियंता हर्षजीत घाटगे यांनी व्यक्त केला आहे. यासह महापालिकेच्या 50 उद्यानांना पाणी पुरवठा, मैदानांसह मनपा आस्थापनांसाठी वारेमाप पाण्याचा वापर, 20 ते 25 टक्के पाणी गळती, 35 टक्के नळ जोडण्यासाठी स्थिर आकाराने पुरवठा, व्यावसायिक आस्थापनाकडून घरगुती दराने पुरवठा, विना मीटर नळ जोडण्या आदी कारणांने तब्बल 100 एम.एल.डी. पाण्याचा हिशोबच महापालिकेकडे नाही. या पाण्याचा हिशोब घेण्यासाठी यंत्रणा आता ठोस उपाययोजनेच्या विचारात आहे. याचा सर्वात पहिला दणका पाणी पुरवठा विभागात पाण्यावरचे लोणी खाणारे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना बसणार आहे.
- पाण्याचा हिशोब होणार!
शहरात एकूण पाण्याच्या टाक्या 26 आणि नवीन वापरात येणाऱ्या अमृत योजनेतील 12 टाक्या. यातील बंद 6. पैकी पाच टाक्यातून (शिवाजी पार्कातील एक टाकी वगळता) महिन्याभरात पाणीपुरवठा सुरू होणार आहे. या सर्व टाक्यामध्ये येणाऱ्या पाण्यासाठी इनलेट मीटर आणि बाहेर पडणाऱ्या पाण्यासाठी आऊटलेट मीटर बसवण्यात येणार आहेत. टाकीच्या परिसरातील नळ जोडण्या आणि लोकसंख्येचा अभ्यास केला जाईल. प्रति माणसी 150 लिटर रोजचा पाण्याचा वापर याप्रमाणे हिशोब करुन नेमकी पाणी गळती आणि पाणी चोरीचा हिशोब पुढे येईल.
हर्षजीत घाटगे, जलअभियंता, कोल्हापूर महापालिका
- खाबूगिरीत अडकले अधिकारी
महापालिकेत कामचुकार अधिकाऱ्यांची पाणीपुरवठा विभागात बदली केली जाते. त्यामुळे टीपी, विभागीय कार्यालयातील मलईदार काम सोडून पाणी पुरवठ्याचे काम करावे लागल्याने अधिकारी नाखूष असतात. त्या जोमाने अधिकारी काम करत नसल्याचे वास्तव आहे. यातच पाणी मीटर तपासणारी यंत्रणाही खाबूगिरीत अखंड बुडालेली आहे. यातून फुकटचे पाणी देणे, व्यावसायिक आस्थापनांना घरगुती पाणी पुरवठा, बांधकामांवर पाणी वापराकडे दुर्लक्ष, पाणी मीटरमध्ये फेरफाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष आदी वरकमाईच्या कामात येथील यंत्रणा अडकली आहे. या विभागाची संपूर्ण झाडाझडती करुन विभागवार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करण्याची योजना आखली जात आहे. विभागवार अभियंत्यांना पाण्याचा हिशोब द्यावा लागणार असल्याने पाणी पुरवठा विभागातील झारीच्या शुक्राचार्यांच्या अंगातील पाणीच निघणार आहे.
- तीन कोटींचे फसवे वॉटर ऑडीट
अत्याधुनिक प्रणालीद्वारे अंतर्गत शहराचा नव्याने सॅटेलाईट नकाशा तयार करुन याद्वारे सार्वजनिक वीज़ (पथदिवे), पाणीपुरवठा लाईन्स, ड्रेनेज लाईन्स, रोड़ लेअर, तपासण्याची घोषणा 2018 च्या महापालिकेच्या बजेटमध्ये झाली. नदीतून उपसा होणारे अशुद्ध तसेच नागरिकांपर्यंत पोहचणारे शुद्ध पाणी यातील गळतीमुळे होणारी तफावत शोधण्यासाठी वॉटर ऑडिटचे पुन्हा ऑडीट केले जाईल. खराब पाईप्स बदलणे, पंपिंग स्टेशन अद्ययावत करणे, पाणीवापरातील असमतोल दूर करणे, आदींसाठी त्याचा उपयोग होईल. शहरातील रस्त्यांची सद्यस्थिती. रस्त्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी होणारा ख़र्च, नव्याने करावे लागणारे रस्ते याविषयी अचूक माहिती मिळावी, यासाठी जीआयएस तंत्रज्ञान व लिडार टेक्नॉलॉजीचा वापर रोड मॅनेजमेंट सिस्टीमची घोषणा फक्त बजेटच्या पानावरच राहिली. बजेटमध्ये तरतूद केल्यानंतर 3 कोटी रुपये खर्चून वॉटर ऑडीट झाले, मात्र तेही फसवे निघाले.
- शहरासाठी पाण्याचा उपसा (एम.एल.डी.मध्ये)
काळम्मावाडीत 165
शिंगणापूर (सध्या बंद) 100
बालींगा 60
नागदेववाडी 40