पुराभिलेखागार कार्यालय जपा...
कोल्हापूर / सुधाकर काशीद :
कुटुंबातल्या एका ज्येष्ठाने खूप कष्ट केलेले असते, अख्खे कुटुंब भक्कम पायावर उभे केलेले असते. हे करता-करता त्याला वार्धक्य आलेले असते. पूर्वीची त्याची जरबही हळूहळू कमी झालेली असते. अशावेळी त्याला घरातलाच एखादा म्हणतो, आबा, तुम्ही असे एका खोलीत पडून राहू नका. थ्री स्टार, फाईव्ह स्टार सुविधा असलेल्या विरंगुळा केंद्रात तुम्ही रहा. आम्ही आहोतच की तुमची सारी सोय करतो, या म्हणण्यात आबांबद्दल काळजी दाखवणारा सूर जरूर आहे. पण ‘आबा आता तुम्ही वृद्धाश्रमात जा,’ असे सांगणारा एक भेसूर असा चेहरा त्यामागे दडलेला आहे. नेमकी ही परिस्थिती कोल्हापुरातील पुराभिलेखागार वास्तूच्या वाट्याला आली आहे.
कोल्हापूर अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून ते 1947 पर्यंतचा कोल्हापूरचा कोल्हापूरशी संबंधित सारा इतिहास आपल्या उदरात या क्षणीही जपलेल्या या पुराभिलेखागार वास्तूलाच आता काहीजण जीर्ण समजू लागले आहेत. या वास्तुतला सारा दस्तऐवज अन्यत्र हलवण्याची चर्चा करू लागले आहेत किंवा असा मुद्दा उपस्थित केल्यानंतर काय प्रतिक्रिया उमटते, हे खडा टाकून पाहण्याचा एक प्रकार सुरू झाला आहे. कोल्हापुरातील पुराभिलेखागार कार्यालय टाऊन हॉल बागेसमोर तहसील कार्यालयाच्या पिछाडीस आहे. आता तहसील कार्यालयाची नवी इमारत बांधण्याचे काम सुरू आहे. त्यामागे दडलेली पुराभिलेखागाराची वास्तू आता बऱ्यापैकी खुली झाली आहे. आणि येथून हे कार्यालय हलवायचे, अशा चर्चेला टप्प्याटप्प्याने सुरुवात केली गेली आहे.
कोल्हापूर पुराभिलेखागार कार्यालय 1870 ते 1875 या काळात बांधले गेले. कागदांना वाळवी लागणार नाही, यासाठी भक्कम दगडी बांधकाम केले आहे. उंच कौलारू छप्पर, नैसर्गिक प्रकाशासाठी छपरावर काचा, हवेसाठी मोठ्या खिडक्या आहेत. कागदपत्रे ठेवण्यासाठी मोठमोठी कपाटे आहेत. काही कागदपत्रे कापडात गुंडाळून ठेवली आहेत. एक, नव्हे, दोन नव्हे तब्बल दीड कोटी दुर्मीळ अस्सल कागदपत्रे या ठिकाणी आहेत. या पुराभिलेखागारात छत्रपती शिवाजी महाराजांची 10 अस्सल पत्रे आहेत. याशिवाय राजाराम महाराज, महाराणी ताराराणी, करवीर संस्थांनचे सर्व राजे, त्यांच्या काळातील कागदपत्रे, पत्रव्यवहार आहे. स्वातंत्र्य चळवळीच्या काळातील असंख्य कागदपत्रे आहेत. इतिहास विश्वासार्ह आणि भक्कम बनवण्यात या पुराभिलेखागार कार्यालयाचा मोठा नव्हे अतिशय अमूल्य असा वाटा आहे. त्या काळातली कोणतीही व्यक्ती आता हयात नाही. त्यामुळे ही जुनी अस्सल कागदपत्रेच या नव्या पिढीशी संभाषण करत आहेत.
कोल्हापूर संस्थानात राजर्षी शाहू महाराज, छत्रपती राजाराम महाराजांचे सामाजिक शैक्षणिक व इतर क्षेत्रातील काम जगभरात अभ्यासाचा विषय झाले आहे. त्या संदर्भातील त्यांच्या राज्यकारभारातील 858 ठरावांची पुस्तके या पुराभिलेखागारात जपून ठेवली आहेत. त्यात संस्थानात सक्तीच्या शिक्षणाचा कायदा, आरक्षणाचा ठराव, अस्वच्छतेसाठी दंड, सार्वजनिक पाणवठे सर्वांसाठी खुले, अशा स्वरूपाचे अस्सल मूळ अध्यादेश आहेत. कोल्हापूरचे राजे किती दूरदर्शी होते, याचा हा अस्सल पुरावा आहे. अनेक अभ्यासकांच्या अभ्यासाचा तो फार मोठा आधार आहे.
पुराभिलेखागार विभाग सांस्कृतिक कार्य विभागाच्या अखत्यारित पुराभिलेखागार संचलनालयाकडून हाताळला जातो .कोल्हापूरच्या प्रमुख सहाय्यक संचालिका दीपा पाटील, अभिलेखाधिकारी गणेश खोडके, चार संशोधन सहाय्यक व इतर 12 कर्मचारी आहेत. अतिशय आस्थेने त्यांनी हा सर्व दस्तऐवज जपला आहे आणि कोणाच्या तरी डोक्यातून का आणि कशासाठी पुराभिलेखागार नव्याने चांगला करू अशा कल्पना पुढे येत आहेत. साऱ्या कोल्हापूरकरांनी त्यासाठी एकत्र येण्याची गरज आहे. कोणातरी चार-पाच जणांच्या मनात काहीतरी येत आहे आणि ते पद्धतशीरपणे लादण्याचा एक प्रयत्न कोल्हापुरात सुरू झाला आहे.