शिक्षणाचा ‘असर’ कुठवर?
ना धड गणित ना इंग्रजी, शैक्षणिक प्रगतीवर प्रश्नचिन्ह
अॅन्युअल स्टेटस ऑफ एज्युकेशन रिपोर्ट ‘असर’ 2023 नुसार ग्रामीण भागातील 14 ते 18 वयोगटातील युवा वर्गावर लक्ष केंद्रीत करून एक शैक्षणिक अहवाल तयार करण्यात आला आहे. घरोघरी जाऊन केलेल्या सर्वेक्षणात भारतातील मुलांचे शिक्षण आणि शिकण्याची स्थिती यावर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. मात्र, यातील नोंदीनुसार या वयोगटातील युवा वर्गाच्या क्षमतांवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
2005 मध्ये असर अहवाल देण्यास सुरूवात केली. 2014 पर्यंत दरवर्षी बेसिक अहवाल तयार करण्यात आला. तर 2016 नंतर दोन वर्षांनी अहवाल तयार केला गेला. बेसिक अहवाल 3 ते 16 वयोगटातील मुलांच्या पूर्व प्राथमिक शैक्षणिक स्थितीवर आधारित होता. तसेच 5 ते 16 वयोगटातील मुलांची शैक्षणिक स्थिती, गणित क्षमता यांचे मूल्यांकन करण्यासाठी केला गेला. भारतात युवा वर्ग सध्या काय करतोय? त्यांना पाढे येतात का? ते गणित करू शकतात का? तसेच या शिक्षणाचा ते दैनंदिन जीवनात वापर करू शकतात का? डिजिटल जागरूकता तसेच त्यांच्याकडे स्मार्टफोन आहे का? ते स्मार्टफोनचा उपयोग कशासाठी करतात, याचे सर्वेक्षण करण्यात आले.
26 राज्यांमध्ये सर्वेक्षण
26 राज्यातील 28 जिह्यांमध्ये ‘असर 2023’ बिआँड बेसिक सर्वेक्षण करण्यात आले. 14 ते 18 वयोगटातील एकूण 34 हजार 745 युवा वर्गापर्यंत ‘असर’चे
प्रतिनिधी पोहोचले. प्रत्येक राज्यात एका ग्रामीण जिह्याचे सर्वेक्षण करण्यात आले. तर उत्तरप्रदेश आणि मध्यप्रदेशमध्ये दोन ग्रामीण जिह्याचे सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणाचा अहवाल ‘असर’ने नुकताच जाहीर केला आहे. महाराष्ट्रातून नांदेड जिल्ह्याची या सर्वेक्षणासाठी निवड करण्यात आली होती.
या अहवालानुसार 14 ते 18 वयोगटातील 86.8 टक्के युवा वर्ग कोणत्या ना कोणत्या शैक्षणिक संस्थेशी जोडलेला आहे. या वयोगटातील अधिकाधिक युवक कला/मानव्यविद्या शाखेत दाखल आहेत. अकरावी अथवा त्यानंतरचे अर्ध्याहून अधिक युवा वर्ग कला/मानव्यविद्या शाखेशी जोडले गेले आहेत. ही एकूण टक्केवारी 55.7 एवढी आहे. युवतींच्या (28.1 टक्के) तुलनेत अधिक युवक (36.3 टक्के) सायन्स टेक्नॉलॉजी शाखेत शिकत आहेत. सर्वेक्षण करण्यात आलेल्या युवा वर्गापैकी फक्त 5.6 टक्के युवक व्यावसायिक प्रशिक्षण घेत आहेत किंवा त्यासंबंधी कोर्स करत आहेत. कॉलेजमध्ये दाखल युवा वर्गात ही टक्केवारी 16.2 एवढी आहे. अधिकतर युवक कमी कालावधीचे कोर्स करत आहेत. या सर्वेक्षणादरम्यान युवा वर्गाला विचारण्यात आले की याव्यतिरिक्त ते अन्य काही काम करत आहेत का? त्यावेळी युवतींच्या तुलनेत युवा वर्ग अन्य कामात गुंतल्याचे दिसून आले. अधिकतर युवा वर्ग कृषी संबंधित कार्यात व्यस्त असल्याचे आढळले.
भागाकारही नाही जमत
14 ते 18 वयोगटातील युवा वर्गात 25 टक्के संख्या अशी आहे की जे आपल्या क्षेत्रीय भाषेत दुसरीच्या स्तरावरील धडासुद्धा वाचू शकत नाहीत. अर्ध्याहून अधिक युवा तीन ते एक अंकाशी संबंधित भागाकारही करू शकत नाहीत. केवळ 43.3 टक्केच युवा वर्ग याचे उत्तर देऊ शकले. जी क्षमता तिसरी वा चौथीमध्ये अपेक्षित असते, तीदेखील या युवा वर्गात दिसून आली नाही. अर्ध्याहून अधिक युवावर्ग (57.3 टक्के) इंग्रजीत एखादे वाक्य वाचू शकतात. मात्र, यातील तीन चतुर्थांश जणच त्याचा अर्थ सांगू शकले. सर्वेक्षण करण्यात आलेल्या मुलांच्या (70.9 टक्के) तुलनेत मुली (76 टक्के) आपल्या भाषेत दुसरीच्या स्तरावरील धडा वाचू शकले. याउलट गणित आणि इंग्रजीमध्ये युवतींच्या तुलनेत युवक अधिक उजवे आढळले.
गणितही कच्चेच
सध्याच्या युगात सगळ्या लोकांकडून अपेक्षा व्यक्त होते की, दैनंदिन जीवनाशी निगडित गणित करण्याची क्षमता आवश्यक आहे. त्यामुळे युवा वर्गाच्या दैनंदिन जीवनाशी निगडित अशा कृतींचा ‘असर 2023’ च्या सर्वेक्षणात समावेश करण्यात आला होता. या सर्वेक्षणात आढळले की, सुमारे 85 टक्केहून अधिक युवा वर्ग पट्टीचा वापर करून लांबी मोजू शकता. पण त्यालाही मर्यादा आहेत. झिरो सेंटीमीटरने मोजणी सुरू केल्यावर ही शक्यता अधिक आढळली. मात्र, सुऊवातीचा बिंदू बदलल्यावर ही क्षमता घटून 39 टक्क्यांवर आली. सुमारे 50 टक्के युवा वर्ग दैनंदिन जीवनाशी निगडित गणित करू शकतात.
90 टक्के घरांमध्ये स्मार्टफोन
‘असर 2023’ च्या सर्वेक्षणात डिजिटल कनेक्टिव्हिटी आणि क्षमता समजून घेण्यासाठी काही प्रश्नावली ठेवण्यात आली होती. डिजिटल उपकरणांची उपलब्धता आणि उपयोग यासंबंधी माहिती घेण्यात आली. तसेच त्यांचे डिजिटल कौशल्य तपासण्यात आले. सुमारे 90 टक्के युवा वर्गाच्या घरात स्मार्टफोन आहेत आणि तेवढेच ते त्याचा उपयोग करू शकतात. यामध्ये जे स्मार्टफोनचा वापर करतात त्यापैकी युवतींच्या (19.8 टक्के) तुलनेत युवकांकडे (43.7 टक्के) स्वत:चा स्मार्टफोन असल्याचे आढळले. युवा वर्गाच्या तुलनेत युवती स्मार्टफोन किंवा कॉम्प्युटर चालविण्याची माहिती नसल्याचे सांगतात.
सोशल मीडियावर सक्रिय
या सर्वेक्षणादरम्यान जवळपास 90.5 टक्के युवा वर्गाने सर्वेक्षणाच्या मागच्या सप्ताहात सोशल मीडियाचा वापर केल्याचे सांगितले. यात युवतींची संख्या 87.8 टक्के तर युवकांची संख्या 93.4 टक्के एवढी होती. सोशल मीडियाचा वापर करणाऱ्या युवा वर्गापैकी सुमारे 50 टक्के लोकच सुरक्षा संबंधित सेटिंगबाबत माहिती जाणत असल्याचे आढळले. युवतींच्या तुलनेत युवा वर्गात ही क्षमता अधिक आढळली. जे स्मार्टफोनचा वापर करतात, त्यांच्या सर्वेक्षणात दोन तृतीयांश युवा वर्गाने सर्वेक्षणाच्या मागच्या आठवड्यात स्मार्टफोनचा वापर शिक्षणाशी संबंधित गोष्टींसाठी जसे ऑनलाईन व्हिडिओ, शंका समाधानासाठी नोट्स वापरणे याकरिता केला. एक चतुर्थांश वर्गाने स्मार्टफोनचा वापर शिक्षणासंबंधी गोष्टींसाठी केला. सर्वेक्षण करण्यात आलेल्या युवा वर्गापैकी एक चतुर्थांशपेक्षा अधिक युवकांनी सांगितले की, त्यांनी स्मार्टफोनचा वापर ऑनलाईन सुविधा, फॉर्म भरणे, बिल देणे, तिकीट बुक करणे यासाठी केला. सुमारे 80 टक्के युवा वर्गाने सांगितले की, त्यांनी सर्वेक्षणाच्या मागच्या सप्ताहात चित्रपट आणि गाणी ऐकण्यासाठी स्मार्ट फोनचा वापर केला.
डिजिटल प्रक्रियांमध्ये युवक आघाडीवर
सर्वेक्षणादरम्यान डिजिटल उपयोगासाठी त्यांना परिवारातील सदस्य किंवा शेजाऱ्यांचा कनेक्टिव्हिटी चांगली असणारा स्मार्टफोन उपलब्ध करण्यास सांगण्यात आले होते. या सर्वेक्षणादरम्यान दोन तृतीयांशपेक्षा अधिक युवावर्ग स्मार्टफोन उपलब्ध करू शकले. यात युवतींची संख्या 62 टक्के तर युवकांची संख्या 72.9 टक्के होती. जे स्मार्टफोन उपलब्ध करू शकले, त्यातील सुमारे 80 टक्के युवक यू ट्युबवर व्हिडिओ सर्च करू शकले. 70 टक्के युवक इंटरनेटचा वापर करून एखाद्या प्रश्नाचे उत्तर शोधू शकले. सुमारे दोन तृतीयांश युवावर्ग अलार्म सेट करू शकले. एक तृतीयांशपेक्षा अधिक युवावर्ग दोन स्थळांमधील यात्रेसाठी किती वेळ लागतो, हे माहीत करून घेण्यासाठी गुगल मॅपचा प्रयोग करू शकले या सगळ्या डिजिटल प्रक्रियांमध्ये युवतींच्या तुलनेत युवक उजवे असल्याचे आढळले. असेही आढळले की, शैक्षणिक स्तर वाढल्यावर डिजिटल कार्य करण्याची क्षमता वाढलेली आहे.
कोरोनानंतर स्मार्टफोन वाढले
गेल्या काही वर्षांत विविध वयोगटातील मुलांच्या नावनोंदणी, शिक्षण आणि शिक्षणाच्या इतर पैलूंबद्दल अहवाल देण्यात आला. सुऊवातीचा हेतू सरकारी कृतींचा प्रभाव पाहण्याचा होता. विशेषत: साथीच्या रोगानंतर एक म्हणजे शिकण्याची पातळी कमी होणे किंवा शिकणे कमी होणे आढळले. सर्वात प्रमुख बदल म्हणजे स्मार्टफोन असलेल्या कुटुंबांचे प्रमाण 2018 मध्ये 36 टक्के होते, ते 2022 मध्ये 74 टक्के झाले. असे दिसते की पुऊष आणि 14-18 वयोगटातील स्त्रिया व्यावहारिकदृष्ट्या समान आहेत. ते घरबसल्या स्मार्टफोन वापरू शकतात. सर्वेक्षण केलेल्या सुमारे 90 टक्के कुटुंबांकडे स्मार्टफोन आहेत. आणि सर्वेक्षण केलेल्या तऊणांपैकी 94.7 टक्के पुऊष आणि 89.8 टक्के महिला स्मार्टफोन वापरू शकतात. स्मार्टफोन कसे वापरायचे हे माहिती असलेल्या पुऊषांपैकी अर्ध्याहून थोडे कमी किंवा 43.7 टक्के जणांकडे स्मार्टफोन मालकीचा आहे. तर स्मार्टफोन कसे वापरायचे हे माहीत असल्यापैकी केवळ 19.8 टक्के महिलांकडे मालकीचा स्मार्टफोन आहे.
-संकलन : राजेश मोंडकर, सावंतवाडी