For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘कुठे नेवून ठेवले बेळगाव माझे?’

06:58 AM Jul 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
‘कुठे नेवून ठेवले बेळगाव माझे ’
Advertisement

मनीषा सुभेदार/ बेळगाव

Advertisement

बांबूच्या हिरवाईने नटलेले वेणुग्राम... वेळूग्राम... पुढे अपभ्रंश होत होत झालेले बेळगाव म्हणजे ‘गरिबांचे महाबळेश्वर’ व सर्वसामान्य जनतेला आरामात वास्तव्य करता येईल असे शहर ही बेळगावची ओळख होती. बेळगावची वैशिष्ट्यो कोणती हे आता बेळगावकरांना सांगण्याची गरज नाही. येथे येणारे सरकारी अधिकारी, लष्करी अधिकारी, विविध ठिकाणी नोकरी करून निवृत्त झालेली मंडळी आपले घर बेळगावमध्ये असावे, ही इच्छा मनात बाळगून असत आणि याठिकाणी एखादे घर विकतही घेत. बेळगावचा भाजीपाला, बेळगावची हवा, बेळगावचे खास असे वैशिष्ट्यापूर्ण पदार्थ यामुळे बेळगाव हे अनेकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू राहिले आहे.

शहराची दैना

Advertisement

पण... आता मात्र या शहराची झालेली दुरवस्था पहावत नाही. स्मार्ट सिटीमध्ये या शहराचा समावेश झाल्यानंतर तर या शहराची अक्षरश: दैना झाली आहे. स्मार्ट सिटीच्या यादीनंतर बेळगाव किती स्मार्ट झाले हा एक संशोधनाचा विषय आहे. परंतु आपण नागरिक मात्र बिलकुल स्मार्ट झालो नाही, याचा प्रत्यय बेळगावमध्ये झालेल्या पावसाने ठळकपणे दाखवून दिला आहे.

चर्चा अति शून्य कृती

सर्वत्र भरलेले नाले, उघड्या गटारीतून वाहणारे पाणी, रस्त्यावर आलेले दूषित पाणी, कचरा आणि मैलासुद्धा, रस्त्यांची झालेली चाळण, दूषित पाण्याचा पुरवठा या सर्व समस्यांनी या शहराला घेरले आहे आणि दुर्दैवाने ‘कुठे नेवून ठेवले आहे बेळगाव माझे’ असे म्हणण्याची वेळ आली आहे. पावसाळ्यापूर्वी प्रशासनाच्या बैठका होतात, पूर परिस्थिती हाताळण्याबाबत चर्चा झडतात, आपत्ती निवारणसंदर्भात हाती घेण्याच्या उपाययोजनांचा कृती आराखडा तयार होतो, परंतु जेंव्हा मुसळधार पाऊस अक्षरश: झोडपतो, तेव्हा या सर्व उपाययोजना किती तोकड्या ठरतात, याचे प्रत्यंतर येते.

बळीराजा नेहमीच बळी

तुंबलेले नाले पावसाळ्यापूर्वी स्वच्छ करण्याच्या मागणीनंतर नाल्यांची पाहणी होते. पण सफाई रखडते. त्यामुळेच बळ्ळारी नाल्यासह कोनवाळ गल्लीतील नाला व अन्य नाल्यांची जी दुर्दशा पावसानंतर समोर आली ती पाहता याची कारणे आपण कधी तरी शोधणार की नाही? हा प्रश्न आहे. प्रचंड पावसानंतर बळ्ळारी नाल्यानजीकची शेती पाण्याखाली जाते, हे नेहमीचेच. बातम्या येतात, चर्चा होतात. परंतु याचा बळी जाणाऱ्या बळीराजाची मनस्थिती समाज, प्रशासन व सरकार कधी समजून घेणार? हॉटेलमध्ये भरमसाट बिल देऊन पदार्थ ऑर्डर करणाऱ्या आपल्याला शेतकऱ्यांच्या शेती उत्पादनाबाबत किंवा भाजी विक्रीबाबत घासाघीस करण्याचा अधिकार तरी आहे का?

प्लास्टिकचाच नाला

शहरातील कचऱ्याचे व्यवस्थापन सुरळीत नाही, हे वास्तव आहेच. पण केवळ महानगरपालिका किंवा प्रशासनाला दोष दिल्याने आपली जबाबदारी संपत नाही. आपल्या घरातील किंवा माणूस वगळता आपल्याला नको असलेल्या सर्व गोष्टी (पीन टू पियानो) नाल्यात आणि कचऱ्यात फेकणारे आपणही तितकेच जबाबदार आहोत. कोनवाळ गल्लीतील नाल्यामध्ये तरंगत आलेले प्लास्टिक पाहणे भयावह होतेच. परंतु अशा पद्धतीने पाण्याचा प्रवाह किंवा स्रोत प्रदूषित करणाऱ्या नागरिकांवर कोणतीच कारवाई होत नसल्याने प्रत्येक जण दुसऱ्याकडे बोट दाखवून जबाबदारी झटकतो.

विकास? नव्हे भकास

हे शहर आता अक्राळ विक्राळ पद्धतीने वाढत चालले असताना त्याचा विकास होण्याऐवजी ते भकास होत चालले आहे. पावसाळ्यात या शहराला आलेले बकाल रूप आता पहावत नाही. कचरा गाडी येऊनही गटारीत कचरा टाकण्याची बेपर्वाई, बसथांब्यांवर पान आणि गुटखा यांच्या पिचकाऱ्या मारण्याची विकृती, सफाई कर्मचाऱ्यांच्या मानसिकतेचा कोणताही विचार न करता सॅनिटरी पॅडसह काच, पत्रा यासह सर्व गोष्टी कचऱ्यात टाकण्याचा बेमुर्वतपणा, साचलेल्या पाण्यातून भरधाव वेगाने वाहने चालविताना पाणी पादचाऱ्यांच्या अंगावर उडण्याबाबतची बेफिकिरी, चिखलाचे पाय घेऊन बस व टेम्पोमध्ये बिनदिकत्त मांडी घालून बसण्याचा हटवादीपणा, वीजपुरवठा खंडित झाला म्हणून कंठशोष करताना हेस्कॉमचे कर्मचारी वारा-वादळात, ऊन-पावसात जिवाची बाजी लावून काम करत असल्याच्या वास्तवाचा सोयीस्करपणे पडलेला विसर... ही यादी अशीच वाढविता येईल. परंतु या सर्व दुरवस्थेला आपणही तितकेच जबाबदार आहोत, हे आपण कधी लक्षात घेणार.

आपण स्मार्ट होणार?

सरकार आणि प्रशासनाकडे निधी आहे. सार्वजनिक सुविधा पुरविणे व आपत्ती निवारण करणे, हे त्यांचे कर्तव्य आहे. कर्तव्यात कसूर झाल्यास त्यांना जाब विचारण्याचा व धारेवर धरण्याचा अधिकार नागरिक म्हणून आपल्यालाही आहे. तथापि अधिकारांबरोबर जबाबदारीही येते. ती मात्र सोयीनुसार आपण टाळत राहिलो तर दिवसागणिक हे शहर समस्यांच्या गर्तेत रुतत जाईल आणि तेव्हा मात्र त्याला बाहेर काढणे आपल्या सर्वांच्याच आवाक्याबाहेर असेल. ती वेळ येण्यापूर्वी आपण सावध होऊन जबाबदार आणि स्मार्ट नागरिक होण्याचा प्रयत्न करूयात का?

Advertisement
Tags :

.