पूजाकडे कोट्यावधींचा बंगला, आलिशान गाड्या आल्या कुठून?
मगो पक्ष कार्यकर्त्यांचा थेट सवाल : पूजा प्रकरणी कटमगाळ दादांना साकडे
फोंडा : जॉब स्कॅम प्रकरणात मंत्री सुदिन ढवळीकर यांचे नाव घेणाऱ्या पूजा नाईक हिचा बोलाविता धनी वेगळाच आहे. सुनियोजितपणे रचलेले हे षडयंत्र असून त्यात मंत्री ढवळीकरांना अडकविण्याचे कटकारस्थान आहे. पूजा नाईक हिच्याकडे कोट्यावधीचा बंगला व आलिशान गाड्या आल्या कुठून याची आधी चौकशी झाली पाहिजे. तसेच तिला पुढे करुन मंत्री ढवळीकरांची जाहीर बदनामी करण्याऱ्यांचे चेहरे उघड झाले पाहिजेत, अशी मागणी मगो पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. मगो पक्षाचे असंख्य कार्यकर्ते, मडकई मतदारसंघ व अन्य भागातील मंत्री सुदिन ढवळीकर यांचे चाहते तसेच नागरिकांच्या उपस्थितीत काल रविवारी सायंकाळी फर्मागुडी येथील कटमगाळदादांच्या स्थानावर गाऱ्हाणे घालण्यात आले.
या प्रकरणात मंत्री सुदिन ढवळीकर यांना अडकवू पाहणाऱ्यांना पायाशी आणून योग्य न्याय करण्याचे साकडे घालण्यात आले. त्यानंतर मडकई येथील श्री आम्रेश्वर व ग्रामदेवी श्री नवदुर्गेच्या मंदिरातही गाऱ्हाणी घालून मंत्री सुदिन ढवळीकर यांची प्रतिमा मलीन करणाऱ्यांचे खरे चेहरे उघड करण्याची प्रार्थना करण्यात आली. बांदोडाचे सरपंच रामचंद्र नाईक, मडकईचे सरपंच विशांत नाईक, कवळेच्या सरपंच मनुजा नाईक, माजी सरपंच राजेश कवळेकर, मगो पक्षाचे पदाधिकारी अनंत नाईक, कुर्टी जिल्हा पंचायत सदस्य प्रिया च्यारी, नगरसेविका गिताली तळावलीकर, दुर्भाट आगापूरचे सरपंच चंदन नाईक यांच्यासह मडकई मतदारसंघातील विविध पंचायतींचे आजी माजी सरपंच, पंचसदस्य, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पूजा नाईक हिला पुढे करुन मंत्री सुदिन ढवळीकर यांची बदनामी करण्याचे शिस्तबद्धरित्या रचलेले हे नाट्या आहे. या कारस्थानामागील मास्टर माईंड वेगळा आहे, असे अनंत नाईक यांनी सांगितले. पूजा नाईक हिच्याकडे रु. 6 कोटींचा बंगला व काही अलिशान वाहने कोठून आली याची आधी चौकशी झाली पाहिजे. एका राजकीय पक्षामार्फत तिला प्रोमोट केले जात असून त्यामागे काही लोक गुंतलेले आहेत. तेच तिला बोलण्यास प्रवृत्त करीत आहेत. पूजा नाईक हिने यापूर्वी मुख्यमंत्र्यांच्या पत्नीचे नाव घेऊन तिची बदनामी करण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी तिच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला होता. मंत्री सुदिन ढवळीकर हे मागिल पंचवीस वर्षांहून अधिक काळ राजकारणात आहेत. जनतेला त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे.
त्यामुळेच अशा खोट्या आरोपामुळे कार्यकर्ते व त्यांच्या चाहत्यांना प्रचंड मनस्ताप झालेला आहे, असेही नाईक म्हणाले. सरपंच रामचंद्र नाईक म्हणाले, जॉब स्कॅम प्रकरण वर्षभरापूर्वी उजेडात आले व त्यावेळी पूजाला अटकही झाली. आज वर्षभरानंतर ती मंत्री ढवळीकरांचे नाव घेते यावऊन त्यात पूर्वनियोजित कारस्थान असल्याचे स्पष्ट होते. या प्रकरणी योग्य तपासकार्य झालेले नाही याबद्दल शंका घेण्यास वाव आहे. मंत्री ढवळीकरांची बदनामी कऊन खरे सूत्रधार जास्तकाळ लपू शकत नाहीत. त्यामागील खरे खोटे लवकरच उजेडात येईल. कटमगाळ दादाच्या स्थानावर योग्य न्याय होईल. सुदिन ढवळीकर हे जनतेच्या पाठबळावर उभे राहिलेले नेतृत्त्व असून जनतेच्या मनात त्यांना आदर व पूर्ण विश्वास आहे.
निवडणुकीच्या तोंडावर त्यांना बदनाम करण्यासाठी पूजा नाईक सारख्या ठकसेन व लबाड महिलेला पुढे केले जाते हा पूर्वनियोजित राजकीय कट असल्याचे स्पष्ट होते. मंत्री ढवळीकरांवर केलेल्या आरोपामध्ये काहीही तथ्य नसून सत्य काय हे कटमगाळ आजोबा उजेडात आणतील यावर तमाम कार्यकर्त्यांची अढळ श्रद्धा आहे, असे कवळेचे माजी सरपंच राजेश कवळेकर म्हणाले. कवळेच्या सरपंच मनुजा नाईक व कुर्टी जिल्हा पंचायत सदस्य प्रिया च्यारी यांनीही मंत्री ढवळीकर यांच्यावरील आरोप हे निराधार असून त्याचा न्याय कटमगाळ आजोब करणार असल्याची पूर्ण खात्री असल्याचे सांगितले.