‘तिलारी’चे पाणी मार्कंडेय नदीत केव्हा सोडणार?
पाच वर्षापूर्वी झालेल्या कर्नाटक-महाराष्ट्रातील मंत्री-आमदारांच्या बैठकीत प्रस्तावावर केवळ चर्चाच
वार्ताहर/उचगाव
तिलारी धरणातील पाणी मार्कंडेय नदीत सोडण्याचा प्रस्ताव कर्नाटक-महाराष्ट्रातील मंत्री व आमदारांच्या जुलै 2020 साली झालेल्या बैठकीत मांडून जवळपास पाच वर्षे होत आली. दोन्ही राज्यातील मंत्री, आमदार, खासदार यांनी मांडलेल्या बैठकीतील या प्रस्तावावर अद्याप पुन्हा चर्चा झालेली नाही. आता नवनिर्वाचित आमदार तसेच खासदार यांनी या धरणातील पाणी मार्कंडेय नदीत सोडण्यासाठी पुन्हा बैठक घेऊन यावर तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी बेळगावच्या पश्चिम भागातील तमाम जनतेने केली आहे. सध्या मार्कंडेय नदीच्या पात्रातील पाण्याची पातळी पूर्णत: खालावली असून पात्र कोरडे पडण्याच्या मार्गावर आहे. यामुळे या भागातील शेतकरी वर्गात चिंतेचे सावट पसरले आहे.
तिलारी धरणातील पाणी मार्कंडेय नदीत सोडण्याचा प्रस्ताव कर्नाटक-महाराष्ट्रातील मंत्री व आमदार यांच्या बैठकीत मांडला गेला होता. त्या प्रस्तावामुळे सीमाभागातील तमाम मराठी बांधवांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले होते. चंदगड व बेळगाव भागातील सर्व मंत्री, खासदार, आमदार यांची संयुक्त बैठक आयोजित करून या कामाला प्रारंभ करावा, अशी मागणीही यावेळी या भागातील तमाम शेतकरी वर्गाने केली होती. मार्कंडेय नदीच्या पात्रात पाणी सोडल्यास बेळगावच्या पश्चिम भागासह बेळगाव तालुक्यातील काही भागातील शेतकऱ्यांच्या पिकासाठी हे पाणी उपयुक्त ठरणार असल्याची प्रतिक्रिया त्यावेळी करण्यात आली होता.
चंदगड तालुक्यातील तिलारी धरणातील जादा पाणीसाठा कर्नाटकातून वाहणाऱ्या मार्कंडेय नदीमध्ये सोडण्याचा प्रस्ताव यापूर्वी अनेक नेतेमंडळींनी मांडला होता. मात्र यावर एकत्र चर्चा, बैठका घेण्यात आल्या नाहीत. चंदगड तालुक्याचे माजी आमदार राजेश पाटील यांनी शेतकरी वर्गाच्या दृष्टीने मांडलेला बैठकीतील मुद्दा अतिशय महत्त्वाचा होता. बेळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राकसकोप जलाशयातील या वाढीव पाणीपातळीमुळे तुडये-मळवी (ता. चंदगड) येथील शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबत मुंबईत कर्नाटक व महाराष्ट्र राज्याच्या मंत्र्यांची त्यावेळी चर्चा झाली होती. मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात महाराष्ट्राचे तत्कालीन जलसंपदा मंत्री जयंत पाटील व कर्नाटकाचे तत्कालीन जलसंपदा मंत्री रमेश जारकीहोळी यांच्या अध्यक्षतेखाली दोन्ही राज्यांचे सचिव व जलसंपदा खात्याच्या प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली होती.
तिलारी धरणाचे पाणी आल्यास सीमाभागाचा कायापालट
मार्कंडेय नदीच्या दुतर्फा हजारो एकर सुपीक जमीन आहे. या नदीच्या पात्रात बारा महिने पाणी राहिले तर वर्षभर जमिनीत वेगवेगळी पिके डोलू लागतील. ऐन मार्च, एप्रिल, मे महिन्यामध्ये पिके भरणी काढणीच्या काळात मार्कंडेय नदी कोरडी पडते. यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठे नुकसान होते. यासाठी तिलारी धरणातील पाणी या नदीमध्ये प्रवाहित झाले तर या भागाचा खऱ्या अर्थाने कायापालट होईल. मात्र ही सर्व मदार आता दोन राज्यांच्या नेतेमंडळींवर अवलंबून आहे. वर्षभर मार्कंडेय नदीच्या पात्रात पाणी पुरवठा टिकून राहिला तर शहराला पाणीपुरवठा कधीच कमी पडणार नाही. यासाठी तिलारी धरणाचे पाणी मार्कंडेय नदीच्या पात्रात सोडणे महत्त्वाचे आहे.
सीमाभागातील जमीन ओलिताखाली येईल
मागील बैठकीत चंदगडचे आमदार राजेश पाटील म्हणाले होते, तिलारी धरणांमध्ये पाणीसाठा मुबलक आहे. जादा पाणी जंगल भागात सोडले जाते. हेच पाणी मार्कंडेय नदीला सोडले तर सीमाभागातील लाखो शेतकऱ्यांच्या जमिनी ओलिताखाली येतील आणि शेतकऱ्यांचे उत्पादन वाढून शेतकरी वर्गाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी मदत होईल.
आमदारांनी इच्छाशक्ती दाखवावी
या बैठकीमध्ये तत्कालीन मंत्री रमेश जारकीहोळी यांनी याबाबत तातडीने बेळगावला बैठक घेऊ, असे जाहीर केले होते. कोल्हापूरचे तत्कालीन पालकमंत्री सतेज पाटील, बेळगावचे माजी आमदार अनिल बेनके, चंदगडचे माजी आमदार राजेश पाटील यांच्या मतानुसार तिलारी धरणातील पाणी मार्कंडेयमध्ये सोडण्यासाठी उपाययोजना, मार्ग, खर्च याबाबत चर्चा करून निर्णय घेण्याचे जाहीर केले होते. मात्र अनेक वर्षे उलटून गेली तरी याबाबत चर्चा नाही. सध्या कर्नाटकात काँग्रेसची सत्ता आहे. पालकमंत्री सतीश जारकीहोळी, चंदगडचे आमदार शिवाजी पाटील, मंत्री लक्ष्मीताई हेब्बाळकर यांना याबाबत बरीच माहिती असल्याने त्यांनी पुन्हा एकदा या प्रस्तावावर बैठक बोलावून दोन्ही राज्यातील हा पाण्याचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी होत आहे.
आतापासून चर्चा करणे गरजेचे
याबाबत आतापासूनच चर्चेला प्रारंभ केला तर नजीकच्या काळात उन्हाळ्यामध्ये पाण्यासाठी शेतकऱ्यांची होणारी वणवण, कुचंबणा थांबेल. यासाठी तातडीने चंदगडचे आमदार शिवाजी पाटील आणि बेळगाव, ग्रामीणच्या आमदार व कर्नाटक राज्याच्या महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मीताई हेब्बाळकर यांनी पुढाकार घेऊन दोन्ही राज्यांचे मंत्री खासदार, आमदार यांच्याशी एक संयुक्त बैठक बेळगाव अथवा चंदगड भागात बोलावून यावर तातडीने निर्णय घ्यावा आणि शेतकऱ्यांच्या दृष्टीने पावले उचलावीत, अशी मागणी या दोन्ही तालुक्यातील शेतकरी वर्गाने केली आहे.
बेळगावमध्ये दोन मंत्री : पुढाकार घेतल्यास प्रश्न कायमचा निकालात
सध्या परिस्थिती पाहता कर्नाटक राज्यामध्ये काँग्रेसची सत्ता असून बेळगाव जिह्याचे पालकमंत्री म्हणून सतीश जारकीहोळी तसेच उडपीच्या पालकमंत्री आणि कर्नाटक राज्याच्या महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मीताई हेब्बाळकर असे दोन मातब्बर मंत्री बेळगावमध्ये आहेत. यांनी याकामी पुढाकार घेतला तर बेळगाव शहराचाही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा निकालात निघू शकतो. यासाठी कर्नाटक-महाराष्ट्र या दोन राज्यातील मंत्री महोदयांनी संयुक्तरीत्या बैठक घेऊन यावर तातडीने विचारविनिमय करून तिलारी धरणातील पाणी मार्कंडेय नदीमध्ये कसे सोडता येईल, यावर चर्चा करून येत्या उन्हाळ्यात मार्कंडेय नदीमध्ये पाणी येईल, अशी व्यवस्था करण्याच्या दृष्टीने आतापासून हालचाल करणे गरजेचे आहे. आज बेळगाव शहरामध्ये पाहता पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आली आहे. ही परिस्थिती टाळण्यासाठी तिलारी धरणातील पाणी मार्कंडेय नदीत आले तर हिंडलगा पंपिंग स्टेशनवरून बेळगाव शहराला भरपूर पाणीपुरवठा कायमस्वरूपी होईल.