वयोवृद्ध पेन्शनधारकांची फरफट थांबणार कधी?
मासिक पेन्शन विस्कळीत : वयोवृद्ध-विधवा अन् दिव्यांगांची धावपळ
प्रतिनिधी / बेळगाव
वयोवृद्ध, विधवा आणि दिव्यांगांना आर्थिक पाठबळ मिळावे, यासाठी देण्यात येणारी मासिक पेन्शन विस्कळीत झाली आहे. त्यामुळे लाभार्थ्यांची फरफट होताना दिसत आहे. वयोवृद्ध, दिव्यांगांना मासिक पेन्शनसाठी धडपड करावी लागत आहे. तहसीलदार कार्यालय आणि बँकेच्या पायऱ्या झिजवाव्या लागत आहेत. त्यामुळे पेन्शनसाठी वयोवृद्धांची होणारी फरफट कधी थांबणार? असा प्रश्नही उपस्थित होऊ लागला आहे.
शासनाकडून दिव्यांग, वयोवृद्ध आणि विधवा महिलांना मासिक पेन्शन दिली जाते. मात्र, मागील दोन वर्षापासून ही पेन्शन विस्कळीत झाली आहे. लाभार्थ्यांच्या बँक खात्यात सुरळीतपणे पेन्शन जमा होत नसल्याने लाभार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. उदरनिवा?साठी दुसऱ्यावर अवलंबून राहण्याची वेळ येऊ लागली आहे. मध्यंतरी बेकायदेशीर व वय कमी असलेल्या अनेकांनी पेन्शनचा लाभ घेतला होता. दरम्यान, सरकारकडून अनेकांच्या मासिक पेन्शन बंद करण्यात आल्या. यामध्ये काही वयोवृद्धांची पेन्शनही ठप्प झाली होती. त्यामुळे त्यांना पेन्शनसाठी पळापळ करण्याची वेळ आली.
पेन्शन सुरळीत करण्यासाठी लाभार्थ्यांना तहसीलदार कार्यालय आणि बँकेत धावपळ करावी लागत आहे. कधी बँकेत खाते निष्क्रिय तर कधी तहसीलदार कार्यालयात अडचणी असल्याने पेन्शन ठप्प होऊ लागली आहे. त्यामुळे लाभार्थ्यांच्या फेऱ्या कायम सुरू असल्याचेही दिसत आहे.