पवित्र पोर्टलवरील 805 शिक्षकांची प्रलंबित नियुक्ती कधी
कोल्हापूर :
फेब्रुवारी 2024 मध्ये पवित्र पोर्टलमार्फत भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती.या भरती प्रक्रियेमध्ये रयत शिक्षण संस्थेचा पर्याय निवडलेल्या 805 शिक्षकांना रयत शिक्षण संस्थेमध्ये यापूर्वीच भरती प्रक्रियेवर उच्च न्यायालयाकडून स्थगिती असल्यामुळे गेले 11 महिने कुठेच नियुक्ती झालेली नाही. या शिक्षकांची नियुक्ती कधी करणार असा सवाल करीत लवकरात लवकर नियुक्ती करा अन्यथा आंदोलन करणार, असा इशारा शिक्षक कृती समितीने शिक्षणमंत्री दादा भुसे यांना दिला.मुंबई मंत्रालयात जावून पिडित पात्रताधारकांनी शिक्षणमंत्र्यांची भेट घेवून निवेदन दिले.
निवेदनात म्हंटले आहे, रयत शिक्षण संस्था सोडून इतर ठिकाणी नियुक्ती द्या, या मागणीसाठी राज्यभरातून आलेल्या शिक्षकांच्या प्रतिनिधींनी शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याशी सविस्तर चर्चा केली. या चर्चेअंती शिक्षणमंत्री भुसे यांनी या प्रलंबित शिक्षकांना लवकरात लवकर नियुक्ती देण्याचे आश्वासन दिले.
दीपक केसरकर यांनी सकारात्मक आदेश दिला असताना भुसे यांनी इतर आस्थापनेवर नियुक्तीच्या प्रस्तावावर सही अजून का केलेली नाही, याबद्दल राज्यभरातील शिक्षकांमध्ये असंतोष आहे. प्रस्तावावर आता प्रधान सचिवापर्यंत सर्व अधिकाऱ्यांनी ग्रीन सिग्नल दिला आहे. विधी व न्याय विभागाने देखील संमती दर्शवली आहे. तरी त्वरीत शिक्षकांची नियुक्ती करावी.
यावेळी शिक्षक कृती समितीचे निमंत्रक गिरीश फोंडे, संदीप पाटील, विनोद आंबी, अनिता शेलार, दशरथ जबडे, कृष्णकुमार देशमुख, एस के खांजोडे, प्रकाश वाघमारे, प्राजक्ता दशपुते, मोहिनी केदार आदी उपस्थित होते.