स्मार्ट सिटीच्या कामांची देखभाल कधी?
महापालिकेकडून दुर्लक्ष झाल्याने अनेक कामे नामशेष होण्याच्या मार्गावर
बेळगाव : महानगरपालिकेच्या व्याप्तीत स्मार्ट सिटी योजनेंतर्गत कोट्यावधी रुपये खर्च करून करण्यात आलेली कामे देखभाल आणि हस्तांतराविना नामशेष होण्याच्या मार्गावर पोहोचली आहेत. स्मार्ट सिटी योजनेंतर्गत रस्ते, उद्याने, बसस्टॅण्ड, कणबर्गी तलाव, सायकल ट्रॅक, वंटमुरीतील प्राथमिक आरोग्य केंद्र, आरओ प्लांट, हायटेक बसथांबे 1,800 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आले आहेत. मात्र देखभालीअभावी यापैकी बहुतांश प्रकल्प जीर्ण झाले आहेत. महानगरपालिकेने स्मार्ट सिटीच्या कामांच्या देखभालीकडे दुर्लक्ष केले असल्याने बहुतांश ठिकाणची कामे जीर्ण झाली असून ती नागरिकांना वापरण्यास योग्यतेची राहिलेली नाहीत. पूर्ण झालेली कामे यापूर्वीच स्मार्ट सिटीकडून महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात आली आहेत. असे स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांकडून सांगितले जाते तर महापालिकेकडून नाही असे उत्तर दिले जाते.
स्मार्ट सिटी योजनेंतर्गत करण्यात आलेले काँक्रिटचे रस्ते एलअॅण्डटी, हेस्कॉमकडून या ना त्या कामानिमित्त वारंवार खोदले जात आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणच्या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. स्मार्ट बस शेल्टर, आरओ प्लांट, ई-स्वच्छतागृह हे असून नसल्यासारखे आहेत. कणबर्गी तलाव विकास, सायकल ट्रॅक, रेनवॉटर हार्वेस्टिंग युनिट, कुत्र्यांचे व जनावरांचे पुनर्वसन केंद्र, हेरिटेज पार्क, होर्डिंग स्मार्ट सिटीकडून हस्तांतरित करण्यात आले आहेत. मात्र तिच्या देखभालीसाठी महापालिकेकडून निधीची तरतूद करण्यात आली नाही. देखभालीसाठी येणारा खर्च करण्यासाठी स्मार्ट सिटीकडून महापालिकेला पैसे देण्यात आले आहेत. देखभालीसाठी दरवर्षी 50 लाख रुपये खर्च येतो. एकंदरीत परिस्थिती पाहता स्मार्ट सिटीच्या कामांची व्यवस्थितरित्या देखभाल होत नसल्याने कोट्यावधी रुपये खर्च करून करण्यात आलेली कामे नागरिकांच्या फायद्याची नसून ती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.