बेळगाव तहसीलदार कार्यालयाची गळती थांबणार कधी?
कार्यालयात गलिच्छ वातावरण, अधिकाऱ्यांसह सर्वसामान्यांना त्रास
बेळगाव : रिसालदार गल्ली येथील तहसीलदार कार्यालयाच्या इमारतीला सर्वत्र गळती लागली आहे. त्यामुळे प्रथम आणि द्वितीय दर्जा तहसीलदारांच्या कक्षाबाहेर पाणी तुंबून वाहत असल्याने त्यातूनच अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांना ये-जा करावी लागत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून इमारतीला गळती लागली असली तरी याकडे जिल्हा प्रशासनाने दुर्लक्ष केले असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. कचेरी रोडवर असलेल्या जुन्या तहसीलदार कार्यालयाची इमारत जीर्ण झाल्याने रिसालदार गल्ली येथील महापालिकेच्या जुन्या इमारतीत तहसीलदार कार्यालयाचे स्थलांतर करण्यात आले आहे. कचेरी रोडवरील जुन्या तहसीलदार कार्यालयात सध्या केवळ रेकॉर्ड रुम कार्यरत आहे. तर तहसीलदार कार्यालयात भूमी, अन्न व नागरी पुरवठा, विविध पेन्शन योजनांचा विभाग, बेळगाव वन ही कार्यालये आहेत. त्यामुळे विविध कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी असते. मात्र पावसामुळे तहसीलदार कार्यालयात पाणी झिरपून सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. दोन्ही तहसीलदारांच्या कक्षाबाहेर तुंबलेल्या पाण्यातूनच सर्वांना ये-जा करावी लागत आहे. ज्या ठिकाणी पाण्याची गळती लागली आहे. त्याठिकाणी बादली व इतर साहित्य ठेवण्यात आले आहे. दरवर्षी ही परिस्थिती निर्माण होत असली तरी कायमस्वरुपी तोडगा काढण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. तहसीलदार तथा अतिरिक्त न्यायदंडाधिकाऱ्यांच्या कार्यालयाचीच ही परिस्थिती असेल तर सर्वसामान्याचे काय असा सवाल उपस्थित केला जात आहे.