महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

इंधन गळतीचा जीवांशी खेळ कधी थांबणार?

06:58 AM Dec 21, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

औद्योगिक क्षेत्रात औद्योगिक दुर्घटना कधी ना कधी अपघाताने, मानवी चुकीमुळे किंवा घातपातानेही घडू शकतात. सुरक्षेची खबरदारी ही त्या त्या उद्योगाची, प्रशासनाची आणि राज्यकर्त्यांचीही जबाबदारी असते. खरेतर ज्यांना आपली जबाबदारी आणि खबरदारीचे भान नसते, अशांनी औद्योगिकरणापासून दूरच राहिलेले बरे. धाकतळे आणि माटवे दाबोळीतील घटना केवळ वास्कोचा किंवा मुरगाव तालुक्याचाच धगधगता प्रसंग नव्हे, हा प्रश्न गोव्यातील जनतेच्या सुरक्षेचा प्रश्न म्हणून गणला जावा मात्र गांभीर्य कुठल्याच पातळीवर दिसले नाही. पर्यावरणाला तर किंमतच राहिलेली नाही. माणसे भाजली, होरपळून मृत्यू पावली तरच धावाधाव करायची असते अन्यथा शांतताच पाळायची, असाच संदेश माटवे दाबोळीतील इंधन गळतीने दिला आहे. ही वृत्ती धोकादायक आणि धक्कादायकच आहे.

Advertisement

वास्कोतील एका शांत आणि निसर्गरम्य गावात नुकतीच इंधन गळती पसरली. माटवे दाबोळी गावात अशा प्रकारचे संकट उद्भवेल असे कुणाच्याच ध्यानी मनी नसेल परंतु तसे घडले आणि जी गावे या वाहिनीखाली जगतात, त्या गावांमध्येही इंंधन गळती पसरण्याचे प्रसंग उद्भवू शकतात, असे गृहीत धरणेच भाग पाडलेले आहे. त्या गावाच्या डोंगर माथ्यावरून आजही पाण्याबरोबर इंधन वाहत आहे. विहिरी, जमीन आणि शेत जमीन इंधनापासून कधी मुक्त होईल, हे जाहीर करण्याचे धाडस कुणी केलेले नाही. हा प्रश्न गळती सापडण्यापुरता मर्यादित नाही, प्रश्न जनतेच्या जीवाचा आणि पर्यावरणाच्या सुरक्षेचा आहे. इंधन गळतीचा प्रकार प्रथमच घडलेला नाही. मागच्या वीस वर्षांत असे अनेक प्रसंग वास्कोवासियांवर उद्भवले आहेत. काही इंधन चोरीच्या प्रयत्नाने तर काही अपघाताने घडलेले आहेत. जीर्ण वाहिनी गंजून फुटण्याच्या घटना घडलेल्या आहेत. काही घटनांवर नियंत्रण मिळविता आले मात्र जवळपास बारा वर्षांपूर्वी फुटलेल्या इंधन वाहिनीने धाकतळे गावात अग्नीकांड घडविले.  एकूण पाच माणसांचे बळी त्या घटनेत गेले होते. अनेक कुटुंबांची घरे त्या अग्नीकांडांत जळून गेली. 2011 सालची ती दुर्घटना कुणी गांभिर्याने घेतली असती तर माटवे दाबोळी गावातील जमिनीत इंधन पसरण्याचे प्रकरण घडलेच नसते. पुन्हा जमिनीत इंधन गळती झाली, याचा अर्थ धोक्याबाबत अद्यापही बेफिकीरीच आहे.

Advertisement

औद्योगिक दुर्घटना घडणे यात नवल नाही मात्र वारंवार अशा घटना घडणे, हे नवल आहे. बेजबाबदार वृत्तीतूनच वारंवार चुका घडत असतात. जबाबदारी आणि खबरदारी याचे भान नसणाऱ्यांचे उद्योग कधी ना कधी लोकांच्या जीवावर उठू शकतात. वास्को परिसरात हे यापूर्वीही घडलेले आहे आणि आजही घडत आहे. वास्कोतील इंधन वाहिनी सुरक्षित नव्हती म्हणूनच माटवे दाबोळीत इंधन गळती पसरली. ज्वालाग्रही पदार्थ वाहून नेणारी वाहिनी इतकी असुरक्षित असू शकते काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. लोखंडी भूमिगत वाहिनी कधी तरी गंजणारच, हे उघड आहे. वाहिनी घालणारे अन्य सुरक्षित पर्यायांचा विचार का करीत नाहीत? बंदराला जेव्हा एखादे इंधनाचे जहाज लागते त्याचवेळी इंधन वाहिनीचा वापर होतो. एक थेंब जरी कुठे इंधन गळती होत असेल तर या वाहिनीवर लक्ष ठेवणाऱ्यांना जाग यायला हवी. गळती लक्षातच येत नसेल तर धोकादायक पदार्थांची वाहतूक करणाऱ्या कंपनीची सारी यंत्रणाच पोकळ आहे, असेच म्हणावे लागेल. स्वस्तात कारोबार करण्याचा प्रयत्न असेल तर वाईट परिणाम निष्पाप जनतेला भोगावे लागतात, याची उदाहरणे किती द्यायची!

मुरगाव बंदरातून बायणा किनारामार्गे ही इंधन वाहिनी गांधीनगर, वरूणापुरी, दाबोळी ते झुआरीनगरपर्यंत जाते. ती भूमिगत असली तरी काहीवेळा पावसाळ्यात बायणा किनाऱ्यावर ही वाहिनी उघडी पडलेली असते. या वाहिनीवरील रेती वाहून जाते. थेट झुआरीनगरपर्यंत ही वाहिनी लोकवस्तीच्या जवळूनच जाते. त्यामुळे लोकांच्या जीवांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होतोच. अधिक धोका दिसून आलेला आहे, तो या वाहिनीखाली राहणाऱ्या गावांना. माटवे दाबोळी हे सुध्दा अशाच छोट्या गावांपैकी एक गाव. त्यांचा कोणताही दोष नसताना पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील गावे प्रदुषणाच्या खाईत लोटली जात आहेत. तेथील लोकवस्त्या धोक्यात येत आहेत. गळतीचे ठिकाण सापडले म्हणून प्रश्न सुटत नाही. नवीन इंधन वाहिनी घातली तरीही धोका दूर होणार नाही कारण बेपर्वाई धोका देते. इंधन वाहिनी किती सुरक्षित आहे, याची खडान्खडा माहिती जनतेला उपलब्ध होण्याची गरज आहे. आपल्या इंधन वाहिनीतून गळती होत आहे, हे जर कंपनीच्या अधिकाऱ्यांना ऑफिसमध्ये बसल्या ठिकाणी कळून येत नाही तर ती वाहिनी जनतेसाठी सुरक्षित नाहीच.

इंधन गळतीमुळे जीवित आणि वित्तहानी होत आलेली आहे. पर्यावरणावर आघात झालेला आहे. अशा घटना घडल्यानंतर एखाद्यांवर किरकोळ गुन्हे दाखल होतात किंवा होतही नाहीत. कालांतराने घटनाही विस्मृतीत जातात. माटवे दाबोळी प्रकरणात अद्याप तरी कुणीच आरोपी नाही. धाकतळेतील दुर्घटनेत पाच बळी गेले आणि लाखोंची हानी झाली मात्र या घटनेला जबाबदार लोकांचे काहीही बिघडलेले नाही. अशा घटनांची पुनरावृत्ती होत असतानाही लोकांमध्ये शांतताच आहे. समाजसेवकही शांत आहेत. राजकारणी नेत्यांनाही इंधन गळती गांभिर्याने घ्यावी, असे वाटत नाही. इंधन गळती हा प्रश्न केवळ एका गावचा नाही. मुरगाव बंदरापासून झुआरीनगरपर्यंतच्या सर्वच लोकवस्त्यांचा आहे. पर्यायाने हा प्रश्न गोव्यातील जनतेचा आहे. माणसांच्या सुरक्षेपुढे कुठलीही तडजोड होता कामा नये. रस्त्यांवरील अपघातांमुळे गोवा देशात असुरक्षित ठरण्याचा धोका आाहे. त्यात मुरगाव तालुक्याच्या वाट्याला रस्ता अपघातांबरोबरच औद्योगिक दुर्घटनाही आलेल्या आहेत. कधी इंधन गळतीची भीती तर कधी अमोनिया गळतीची, कधी विमान कोसळण्याची भीती तर कधी तेल टाक्यांना कुणी तरी लक्ष्य करण्याची भीती. तरीही आपली यंत्रणा गाफील आहे. माटवे दाबोळीची इंधन गळती राजकीय, शासकीय आणि सामाजिक स्तरावरही क्षुल्लक ठरलेली. घरे-दारे जळायला हवीत. माणसे होरपळून मरायला हवी. तोपर्यंत शांतच राहायचे, ही वृत्ती धोकादायक आणि धक्कादायकच आहे.

अनिलकुमार शिंदे

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article