For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

महापालिकेच्या सफाई कामगारांना गृहभाग्य केव्हा?

10:49 AM Nov 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
महापालिकेच्या सफाई कामगारांना गृहभाग्य केव्हा
Advertisement

2018 ची सफाई कामगार निवासी योजना : अधिकाऱ्यांची मात्र अनास्था

Advertisement

बेळगाव : महापालिकेतील कायमस्वरुपी सफाई कामगारांसाठी गृहभाग्य योजनेतून शहरात उभारण्यात आलेली घरे हस्तांतरण करण्यासाठी अधिकारी अनास्था दाखवित असल्याने सफाई कामगारांत तीव्र असंतोष आहे. 2018 मध्ये गृहभाग्य योजनेंतर्गत शहरातील एसपीएम रोडवरील नेहरुनगर तिसरा क्रॉस येथे महापालिकेतर्फे जी+3 प्रकारची घरे बांधण्यात आली आहेत. आतापर्यंत न झालेली लहानसहान कामेही पूर्ण झालेली असल्याने तेथे वास्तव्य करण्यास घरे अनुकूल झाली आहेत. मात्र पात्र सफाई कामगारांना घरांचे हस्तांतरण झालेले नाही. अधिकाऱ्यांच्या इच्छाशक्तीअभावी व नगरसेवकही अधिकाऱ्यांकडे चौकशी करत नसल्यामुळे सफाई कामगारांना अद्यापही कायमस्वरुपी आश्रय मिळालेला नाही. महापालिकेच्या कायमस्वरुपी सफाई कामगारांसाठी पहिल्या टप्प्यात 48 घरे बांधण्यात आली. घरांच्या अंतिम टप्प्याचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. या इमारतीच्या शेजारीच दुसऱ्या टप्प्यात 104 घरे उभारण्यात आली आहेत. या घरांना नळजोडणीचे (प्लंबिंग) काम तेवढचे बाकी आहे. घरांचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी 18 महिन्यांची मुदत देण्यात आली होती.

सफाई कामगारांकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष का?

Advertisement

सफाई कामगारांना गृहभाग्य योजनेचा लाभ अद्याप मिळालेला नसल्याने त्यांना नाईलाजास्तव झोपड्या, राहुट्या बांधून राहणे किंवा झोपडपट्टी परिसरात तात्पुरते शेड उभारून संसार चालवावा लागत आहे. सफाई कामगारांची ही परिस्थिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांना माहीत असूनही गृहभाग्य योजनेचा लाभ त्वरित मिळवून द्यावा, असे अधिकाऱ्यांना वाटत नाही, असे सफाई कामगार वैतागून म्हणत आहेत. गृहभाग्य योजनेतून उभारलेले घर प्रत्येकी 9 लाखांचे असून यात राज्य सरकारचे 80 टक्के व केंद्र सरकारचे 20 टक्के अनुदान आहे. या अनुदानातून सफाई कामगारांना गृहभाग्य योजनेचा लाभ मोफत देण्यात येणार आहे. प्रत्येक घर 550 चौरस फुटांचे आहे. यामध्ये हॉल, बेडरुम, स्वयंपाक घर, स्नानघर, स्वच्छतागृह यासाठी प्रत्येकी एक खोली आहे. अर्थात पाच खोल्यांचे हे घर आहे. घरांना भुयारी गटारींची व पार्किंगची व्यवस्था आहे.

किरकोळ कामे पूर्ण झाल्यानंतरच घरांचे वितरण

महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने महापालिकेच्या कायमस्वरुपी स्वच्छता कामगारांसाठी सध्या 48 घरे बांधून आरोग्य शाखेकडे हस्तांतर केली आहेत. 104 घरांचे काम अंतिम टप्प्यात आहे. या घरांची लहानसहान कामे पूर्ण करून आरोग्य खात्याकडे हस्तांतर करण्याचे बाकी आहे. त्यानंतर महापालिकेकडून पात्र सफाई कामगारांना घरांचे वितरण होणार आहे.

Advertisement
Tags :

.