कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कला अकादमीत ‘बिघाडाची नाटके’ थांबणार तरी कधी?

12:59 PM Apr 21, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

‘पुरुष’ वेळच्या घोळाची ‘पंत’ च्या वेळी पुनरावृत्ती : प्रेक्षकांमधून संतप्त नाराजीच्या प्रतिक्रिया

Advertisement

पणजी : दुरुस्ती, फेरनूतनीकरणाच्या नावाखाली जवळजवळ 75 कोटी रुपये खर्च केल्यानंतरही कला अकादमीला अपेक्षित साज देण्यात सरकार पूर्णत: अपयशी ठरले आहे. त्यामुळे आता तेथे व्यावसायिक नाटकेही पाहणे प्रेक्षकांसाठी मुश्कील बनू लागले आहे. अकादमीला लागलेले ‘ग्रहण’ सुटता सुटेना अशी परिस्थिती निर्माण झाली असून गत रविवारी आयोजित ‘पुरुष’ नाटकाच्या प्रयोगादरम्यान घडलेल्या प्रकाराची पुनरावृत्ती काल रविवारी ‘श्रीमंत दामोदर पंत’ या नाटकादरम्यान प्रेक्षकांना अनुभवावी लागली. गत रविवारी 13 एप्रिल रोजी ‘पुरुष’ नाटकाचा प्रयोग ऐन रंगात आलेला असताना प्रकाश योजनेत बिघाड झाल्यामुळे रसिकांचा हिरमोड झाला होता. त्यातून अभिनेते शरद पोंक्षे यांनी प्रेक्षकांची माफी मागितली होती. तसेच मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घालावे, असे आवाहनही केले होते. त्याला प्रत्युत्तर म्हणून कला संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी श्री. पोंक्षे यांच्यावरच पलटवार करताना ‘पोंक्षे तुम्ही गैर बोललात’, अशा शब्दात शेरेबाजी केली होती.

Advertisement

तेवढ्यावरच न थांबता, ‘कुणीतरी सुपारी देऊन आपल्याविरोधात हे षडयंत्र रचल्याचा आरोपही केला होता. मात्र या गोष्टीला आठवडाही उलटला नाही तोच काल रविवारी आयोजित ‘श्रीमंत दामोदर पंत’ या व्यावसायिक नाटकाच्या वेळीही अशाच प्रकाराची पुनरावृत्ती घडली. नाटक सुरू होण्यापूर्वीच अकादमीच्या सभागृहातील एसी नादुऊस्त झाला. त्यामुळे दुपारी 3.30 वाजता सुरू होणारे नाटक तब्बल पाऊण तासाने म्हणजेच सायं. 4.15 वाजता सुरू करावे लागले. असे असले तरीही ‘पुरुष’ च्या पोंक्षे प्रमाणे ‘पंत’ च्या भरत जाधव यांनी मात्र त्यासंदर्भात कोणतीही किंवा कुणाशीही तक्रार किंवा प्रतिक्रिया दिल्याचे जाहीर झालेले नाही. परंतु तिकीटी खरेदी करून नाटक पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांचा मात्र नक्कीच हिरमोड झाला. काहींनी यावर संताप व्यक्त केला. अनेकांनी प्रसारमाध्यमांकडे नाराजीही बोलून दाखविली तर बऱ्याच जणांनी पूर्ण नाटक पाहण्यापूर्वीच निघून जाणे पसंत केले. खरे तर कला अकादमीत प्रकाश योजना, ध्वनी यंत्रणा, एसी यात प्रारंभापासूनच बिघाड, अडचणी असल्याच्या तक्रारी करण्यात येत होत्या. परंतु दोन वर्षे उलटली तरीही त्याकडे दुर्लक्षच करण्यात आले आहे. त्याचा दणका आता व्यावसायिक नाटकांनाही बसू लागला असून हे असेच चालू राहिल्यास कला अकादमीची देशभरात नाचक्की होण्यास वेळ लागणार नाही, अशा प्रतिक्रिया कालच्या प्रयोगावेळी काही प्रेक्षकांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केल्या.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article