कर्ले-बेळवट्टी-कावळेवाडी रस्त्यांचे डांबरीकरण कधी?
पश्चिम भागातील अनेक संपर्क रस्ते हरवले खड्ड्यात : वाहनधारकांतून नाराजी
वार्ताहर/किणये
तालुक्याच्या पश्चिम भागातील अनेक संपर्क रस्ते खड्ड्यात हरवले आहेत. यामध्ये कर्ले ते बेळवट्टी व कर्ले ते कावळेवाडी, बिजगर्णी रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. या रस्त्यावरून वाहतूक करणे धोकादायक बनले आहे. खड्डेमय रस्त्यांमुळे अपघाताच्या अनेक घटना घडू लागल्या आहेत. या रस्त्याच्या डांबरीकरणाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले असल्याच्या तक्रारी वाहनधारक व नागरिकांतून होत आहेत. या रस्त्याचे डांबरीकरण कधी होणार? असा सवाल सर्वसामान्य जनता उपस्थित करू लागली आहे.
कर्ले ते बेळवट्टी या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यांचा बहुतांश भाग उखडून गेला आहे. सध्या या रस्त्यावरून बैलगाडी घेऊन जाणेसुद्धा मुश्कील बनले आहे. वाहनधारकांनी या रस्त्यावरून वाहतूक कशी करावी, असा प्रश्न उपस्थित होत आहे. कर्ले-बेळवट्टी रस्त्यावर 2019 मध्ये अतिवृष्टी झाली, त्यावेळी पाणी आले होते. यामध्ये रस्त्याचा बराच भाग वाहून गेला. त्यामुळे काही ठिकाणी रस्त्याच्या बाजुला मोठमोठे भगदाड पडलेले आहेत. तेव्हापासून रस्त्याची परिस्थिती तशीच आहे. याकडे कोणीही लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी अद्याप लक्ष दिले नाही.
बेळवट्टी, इनाम बडस, राकसकोप या भागातील या संपर्क रस्त्यावरून रोज मोठ्या प्रमाणात वर्दळ सुरू असते. या भागातील बराचसा कामगार वर्ग दुचाकीवरून उद्यमबाग व मच्छे या औद्योगिक वसाहतीमध्ये कामाला येतो. रात्रीच्यावेळी या रस्त्यावरून ये-जा करताना त्यांना जीव मुठीत घेऊनच वाहतूक करावी लागते. बेळवट्टी-कर्ले हा सुमारे साडेपाच किलोमीटरचा रस्ता असून गेल्या दहा ते बारा वर्षांपासून या रस्त्याच्या दुरुस्तीकडे व डांबरीकरणाकडे दुर्लक्ष झाले आहे, असे येथील नागरिक सांगतात. या रस्त्याच्या आजूबाजुला कर्ले व बेळवट्टी भागातील शेतकऱ्यांच्या शेतजमिनी आहेत. त्यामुळे रोज शेताकडे जावे लागते. खड्डेमय रस्त्यामुळे शेतकरी वर्ग अक्षरश: वैतागून गेला आहे.
कर्ले ते कावळेवाडी व बिजगर्णी या रस्त्यावरही मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत. काही ठिकाणी तर एक फुटापर्यंत खोल खड्डे आहेत. अनेक दुचाकीस्वार या खड्ड्यांमध्ये पडून किरकोळ जखमी झाल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. कावळेवाडी गावच्या पुलानजीकही रस्ता अधिक प्रमाणात खचला आहे. कर्ले, कावळेवाडी, बिजगर्णी, बेळवट्टी, राकसकोप, इनाम बडस, बेळगुंदी व शिनोळी भागात जाणाऱ्या वाहनधारकांसाठी हे दोन्ही रस्ते महत्त्वाचे संपर्क रस्ते आहेत. मात्र वाहनधारकांना खड्डेमय रस्त्यातूनच प्रवास करावा लागत आहे.
रस्त्याची दयनीय अवस्था
कर्ले ते बेळवट्टी रस्ता अतिशय खराब झाला आहे. गेल्या दहा-बारा वर्षांपासून रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. याकडे कोणीही लक्ष देत नाहीत. तसेच कावळेवाडी रस्त्यावरही मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी केवळ कार्यालयात बसून न राहता पश्चिम भागातील दुर्लक्षित रस्त्यांची पाहणी करावी. गेल्या आठवड्यात माजी महापौर शिवाजी सुंठकर यांच्या नेतृत्वाखाली खासदार जगदीश शेट्टर यांची गावकऱ्यांनी भेट घेतली व रस्त्याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. या रस्त्याचे डांबरीकरण त्वरित करण्यात यावे, अशी आमची मागणी आहे.
-नवनाथ खामकर, कर्ले