For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

इअर टॅगिंगसाठी प्रशासन कधी जागे होणार?

11:25 AM Apr 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
इअर टॅगिंगसाठी प्रशासन कधी जागे होणार
Advertisement

जनावरांच्या बेकायदेशीर वाहतुकीत वाढ : पशुप्रेमींतून नाराजी : जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज

Advertisement

बेळगाव : जनावरांच्या कानांना टॅग लावणे बंधनकारक असून देखील पशुपालकांचे याकडे दुर्लक्ष होऊ लागले आहे. जनावरे टॅगपासून वंचित राहात असल्याने त्याची बेकायदेशीर वाहतूक वाढली आहे. याला आळा घालण्यासाठी आणि इतर सुविधा जनावरांपर्यंत पोहोचविण्यासाठी टॅगबाबत जिल्हा प्रशासनाने कठोर निर्णय घ्यावा, अशी मागणी होत आहे. जनावरांची बेकायदा होणारी वाहतूक रोखण्यासाठी महाराष्ट्रातील काही जिल्ह्यामध्ये महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. इअर टॅगिंगशिवाय महाराष्ट्र राज्यातील जनावरे इतर राज्यात येण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच टॅग नसलेली जनावरे बाजारात खरेदी-विक्री करण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. यामुळे बेकायदा कत्तलींना आळा बसला आहे. बेळगाव जिल्ह्यात देखील बेकायदा जनावरांची वाहतूक वाढली आहे. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी महाराष्ट्राप्रमाणे जनावरांच्या टॅगिंगसाठी कठोर पावले उचलावीत, अशी मागणी प्राणी मित्र संघटनांनी केली आहे.

जिल्ह्यातील सर्व पशुवैद्यकीय दवाखान्यात टॅग लावण्याची सोय

Advertisement

केंद्र सरकारच्या पशुसंवर्धन विभागाने नॅशनल डिजिटल लाइव्ह स्टाक मिशन भारत पशुधन प्रणाली कार्यान्वित केली आहे. या प्रणालीत इअर टॅगिंग (12 अंकी बार कोड) च्या नोंदी घेण्यात येत आहेत. या जन्म-मृत्यू नोंदणी, प्रतिबंधक लसीकरण व औषधोपचार, वंध्यत्व, उपचार, मालकी हक्क हस्तांतरण यांचा समावेश आहे. बेळगाव जिल्ह्यातील सर्व पशुवैद्यकीय दवाखान्यांतून जनावरांच्या कानात टॅग (बिल्ला) लावून त्याची भारत पशुधन प्रणालीवर नोंदणी प्रक्रिया सुरू आहे. यामुळे सर्व पशुधनाची सर्वंकष माहिती एका ठिकाणी उपलब्ध होणार आहे. जिल्ह्यात 13 लाख मोठ्या जनावरांची संख्या आहे. यापैकी गाय, म्हैस, बैल आणि शेळ्या-मेंढ्याना हा टॅग लावला जात आहे. ही मोफत सुविधा असून पशुपालकांनी आपल्या जनावरांच्या कानांना टॅग लावून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

हरविलेले जनावर शोधण्यास मदत

एखादे जनावर हरविल्यास त्यांच्या कानावर लावलेल्या टॅगवरून शोधण्यास मदत होणार आहे. शिवाय बाजारात नवीन जनावर खरेदी-विक्रीस आणल्यास त्याची ओळख पटण्यास टॅग महत्त्वाचा ठरणार आहे.

Advertisement
Tags :

.