काकती गाव कधी तंटामुक्त होणार?
न्यायदान मागण्यासाठी पोलीस ठाण्याचे ठोठावे लागतेय दार : योग्य न्याय निवाडा करण्यात कमी
वार्ताहर/काकती
ग्रामपंचायतीकडून तंटे मिटविले जात नाहीत, अशा तक्रारी ऐकावयास मिळतात. त्यामुळे काकती गाव कधी तंटामुक्त होणार? असा सवाल उपस्थित होत आहे. गेली 28 वर्षे भांडण-तंट्यांचे विवाद वेशीला टांगलेले आहेत. न्याय मिळत नसल्याने गावात गोंधळाचे वातावरण आहे. गावची अस्मिता आणि स्वाभिमानाला धक्का पोहचला आहे. परिणामी ग्रामस्थांना न्यायदानासाठी पोलीस ठाण्याचे दार ठोठावे लागत आहे. ग्राम पंचायत न्याय बाजूचा निवाडा देते का, हा सवाल एकाचवेळी ग्रामस्थांतून उपस्थित होत आहे.
सामाजिक न्याय व ग्राम पंचायत समितीच्या वतीने गावातील नागरिक व महिलांचे भांडण-तंटे गावातच मिटविणे, पोलीस ठाणे व न्यायालयात न जाता, गावातच वाद मिटविल्याने ग्रामस्थांचा वेळ आणि पैसा वाचतो. आपुलकी आणि जिव्हाळ्याचे संबंध घरा शेजाऱ्यांत वृद्धींगत व्हावेत, या उद्देशाने आपल्या (कर्नाटक राज्य) शासनाने पंचायत राज 1993 कायद्याच्या तरतुदीनुसार ग्राम पंचायतीना तंटे मिटविण्याचे अधिकार दिले आहेत. पंचायतीपुढे आलेल्या भांडणात वादी, प्रतिवादी दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकून योग्य निवाडा देता येतो. नि:स्पृह न्यायबाजूने निवाडा देण्यास ग्र्रा. पं. समितीला पुरेशी मुभा आहे.
जनमाणसात निवाड्याचा आदर कायम
स्वातंत्र्यप्राप्तीच्या पहिल्या दोन दशकात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ग्रा. पं. माजी अध्यक्ष वसंतराव करगुप्पीकर, सदस्य आप्पासाहेब देसाई व त्यानंतरच्या 1978 च्या काळापासून देवस्थान पंचमंडळांच्या वतीने ठकाप्पण्णा कागणेकर, शटूप्पा देसाई यांच्या नेतृत्वाने न्यायदानाची चांगली सेवा बजावली होती. 1996-97 साली काकती संयुक्त ग्रा.पं. असताना यल्लोजीराव पिंगट व ग्रा. पं. अध्यक्ष शंकरराव कदम (निवृत पोलीस हवालदार) यांनी आपल्या कार्यकाळात तंट्यांच्या वास्तविकता समजावून, अफाट निरिक्षणाद्वारे न्याय देऊन, निवाड्याचा निकाल लेखी देत हेते. त्यामुळे अन्याय करणाऱ्यांना न्यायदानाचा धाक होता. समाजात अन्याय करण्याऱ्यांना धडकी भरत होती. गेली 20 वर्षे झाली आजही जनमाणसांच्या त्या निवाड्यांचा आदर कायम आहे. शिवारातून जाणारा कालवी रस्ता सांडपाण्यामुळे बंद झाला आहे. सरकारी जागेत अतिक्रमणे वाढली आहेत. असे विवादाचे अनेक प्रश्न ऐरणीवर आहेत. समस्या सोडवायचे झाल्यास सहजपणे सोडविता येतात. परंतू सोडविण्याची इच्छाशक्ती आणि जागरूकता पंचायत समितीला हवी.
वॉर्डातील सदस्य तंटे मिटवण्यात अपयशी
गटबाजीच्या राजकारणामुळे दीड वर्ष झाले तरी न्याय मिळत नाही. ग्रा.पं. न्यायसमितीचे सदस्य आपले अधिकार आणि कर्तव्याबद्दल पुरेसे जागरूक नाहीत. पारिणामी बहुतांश तंट्यांच्या तक्रारी पोलीस ठाण्याला जात आहेत. वॉर्डातील सदस्य तंटे मिटवत नाहीत. दुसऱ्या वॉर्डातील सदस्यांना न्याय सोडवू देत नाहीत. परशराम नार्वेकरसारख्या न्यायप्रिय सदस्याला न्याय पंचायतीचा पुरेसा पाठिंबा मिळत नाही.
- सुरेश शिवाजी गवी, ग्रामस्थ.