महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

काँग्रेस दरबारी राजकारणातून कधी बाहेर येणार?

06:00 AM Nov 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

गांधी-नेहरू घराण्याशिवाय काँग्रेसला राजकारण करता येत नाही हे खरे. पण खरा प्रश्न हा ‘दरबारी राजकारणातून ती कधी बाहेर येणार?’ हा आहे. ‘श्वानपुच्छ नलिकेत घातले तरी ते होईना सरळ’ असाच काहीसा हा प्रकार झालेला आहे. सारा मामलाच अवघड आणि अशुद्ध. विरोधी बाकावर दहा वर्षे राहण्याचा उफराटा विक्रम करून देखील देशातील या सगळ्यात जुन्या पक्षाला शहाणपण आलेले नाही काय? असा प्रश्न कोणी विचारला तर तो गैरलागू होणार नाही. पक्ष सत्तेत असताना अशा प्रकारचे राजकारण खपून जात होते पण आपल्या वागण्यात अजिबात सुधारणा न केल्याने हा प्रकार दिवसेंदिवस पक्षाच्या अंगलट येत आहे.

Advertisement

हरयाणातील निवडणुकीतील पक्षाचा अचानक झालेला पराभव म्हणजे पक्षात किती बजबजपुरी माजलेली आहे याचा ताजा नमुना. ही निवडणूकच अशा प्रकारे हाताळली गेली की विजय मिळत असताना पक्षाने पराभव खेचून आणला अशी अजब स्थिती दिसून आली. दरबारी राजकारणात असेच होते. भल्या  मार्गाने  जात असलेल्या पक्षाला खड्ड्यात घालण्याचे काम खुशमस्करे अशा बेमालूमपणे करतात की ‘आपला गेम झालेला आहे’ हे नेत्याला कळत नाही. इंदिरा गांधींच्या काळात दरबारी राजकारणाला बळ मिळाले हे खरे असले तरी देशभर कोठे काय चालले आहे याकडे इंदिराजींचे बारीक लक्ष असल्याने खुशमस्कऱ्यांचे त्यांनी फारसे फावून दिले नव्हते. आता त्यांची दूरदृष्टी अथवा त्यांची झेप कोणतीच नसल्याने देशात नरेंद्र मोदी युग 2014 साली अवतरले असे म्हटले तर वावगे होणार नाही. आजच्या काँग्रेसची अवस्था ‘नाव सोनुबाई, हाती कथिलाचा वाळा’ अशी झाली असल्याने जेव्हढ्या लवकर दरबारी राजकारणाला मूठमाती दिली जाईल तेव्हढे लवकर पक्षाला बाळसे येईल हे सांगायला कोणा राजकीय पंडिताची गरज नाही. हरियाणामधील पराभव हा भाजपने काही काँग्रेस नेतेच गुपचूपपणे खरेदी केले होते त्यामुळे झाला अशी माहिती आता पुढे येत आहे. दरबारी राजकारणाने पक्षाचे कसे नुकसान होते याचे हे ताजे उदाहरण आहे. श्रेष्ठी अंधारात राहतात आणि रातोरात वेगळाच खेळ होतो. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रा आणि भारत जोडो  न्याय यात्रेला मिळालेला प्रचंड प्रतिसाद हा पक्षाला संजीवनी देणारा ठरला खरा पण त्याचा खुबीने वापर पक्षबांधणीकरता करण्यात आलेले अपयश पक्षाला परत झोंबू लागले आहे.

Advertisement

गेल्या दहा अकरा वर्षात काँग्रेसचा सुवर्णक्षण कोणता तर गेल्या लोकसभा निवडणुकीत पक्षाला मिळालेल्या 99 जागा. आता आपले हात गगनाला भिडले अशीच काँग्रेसची समज झाल्याने परत तिची घसरण सुरु झाली आहे. पक्षाच्या वागण्यात अजिबात सुधारणाच झाली नसल्याने आता परत ‘पहिले पाढे पंचावन्न’ अशी स्थिती होणार काय अशी भीती निर्माण झाली आहे. दरबारी राजकारणामुळे पक्षाला कीड लागली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यासारखे खमके विरोधक लाभल्याने काँग्रेस-मुक्त भारताची मोहीम आखण्यापर्यंत भाजपची मजल गेलेली आहे. अशा वेळेला ‘आले अंगावर, घेतले शिंगावर’ असे करायची गरज असताना काँग्रेसची अवस्था ‘शेंबडात अडकलेल्या माशी’ सारखी झालेली आहे. खरेतर आलेल्या संकटाचा सामना करण्यासाठी काँग्रेसने किती तयारीने राहायला पाहिजे. पण एका दुष्टचक्रात पक्ष अडकलेला दिसत आहे. गांधी घराण्याशिवाय त्याला सत नाही आणि गत नाही अशी वस्तुस्थिती असल्याने त्याच्याभोवतीच पक्ष घुटमळताना दिसत आहे. पुढे सरकतच नाही आहे. कितीही ठेचा लागल्या तरी ‘हम नही सुधरेंगे’ असाच त्याचा बाणा दिसतोय.

राहुल गांधींना पक्षात नवीन जान आणणे शक्य आहे पण तेदेखील या दरबारी राजकारणाचा शिकार झालेले दिसत आहेत. त्यांच्या अवतीभोवती फिरणारी माणसे किती कामाची अथवा बिनकामाची याबाबत राजकीय वर्तुळात बरेच बोलले जाते. के सी वेणुगोपाल यांचेच बघा. ते राहुल यांच्या अतिजवळचे समजले जातात. त्यांनी एकप्रकारे राहुल यांचीच नाकाबंदी केलेली आहे. ते कार्यकर्त्यांना राहुल यांना भेटूनच देत नाहीत अशा तक्रारी असल्या तरी त्यांचे स्थान अबाधितच आहे. काँग्रेसमध्ये जागोजागी असे झारीतील शुक्राचार्य असल्याने पक्षाचे भले करण्याची मनीषा बाळगलेला कार्यकर्ता हा निराश होऊन जातो. सोनिया गांधी तसेच प्रियंका यांच्या जवळचे देखील काही नेते आहेत आणि या सर्वांच्या संमतीने नवीन राजकारण आकार घेत असते. हे घराणे कधीकधी किती बिनबुडाच्या नेत्यांना मोठे करते ते गुलाम नबी आझाद यांच्या उदाहरणावरून दिसून येते. काँग्रेसला जम्मू आणि काश्मीरमध्ये कमकुवत करण्यासाठी आझाद यांना भाजपने फितूर बनवले. पण आझाद यांच्यात काहीच दम नाही हे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूकात प्रकर्षाने दिसून आले. काँग्रेसने पाळलेल्या अशा ‘गुलामांची’ संख्या कमी नाही आणि तेच पक्षाच्या वाढीच्या आड येत आहेत.

मोदी-शहा यांच्यासारखे विरोधक असताना काँग्रेसला प्रत्येक पाऊल खूप विचारांती उचलणे जरुरीचे आहे. पण घराण्याच्या भक्तीत लिन होण्याची सवय झालेल्या पक्षाला आणि नेतृत्वाला ‘जुने जाऊ द्या मरणा लागूनी’ चा जप करत भाजपला चारी खाने चीत करण्याच्या इच्छेने झपाटले पाहिजे. एकटे राहुल काही करू शकणार नाहीत. प्रत्येक कार्यकर्त्याने झेंडा गाडून काम केले तरच क्रांती घडणार आहे. दरबारी राजकारणाला मूठमाती मिळणार आहे.

पक्षाला दरबारी राजकारण कितपत हितकारक आहे? गेल्या दहा वर्षात पक्षाने पुढील मार्गक्रमणा कशी केली पाहिजे, पक्षाचे दोष काय, बलस्थाने काय याबाबत वरिष्ठ पातळीवर कोणतेच गंभीर विचारमंथन झालेले आहे असे दिसून आलेले नाही. 20-25 वर्षांपूर्वी पक्षावर वाईट दिवस आलेले असताना सोनिया गांधींनी पंचमढी येथे एक शिबीर आयोजित करून पक्षात नवीन विचार आणले होते. समविचारी पक्षांबरोबर आवळ्या-भोपळ्याची मोट बांधण्याचा कार्यक्रम त्यात ठरला आणि ‘यूपीए’च्या स्थापनेची ती नांदी ठरली.

इंडिया या विरोधी पक्षांच्या नवीन आघाडीची स्थापना झाल्यापासून काँग्रेसने हा प्रयोग यशस्वी करण्यासाठी फार विचारमंथन केले असे सध्यातरी दिसून येत नाही. या सर्व मित्रपक्षांच्या मागे मोदींचा ससेमिरा लागलेला आहे. काँग्रेसच्या तर ते पाचवीलाच पुजलेले आहेत. अशावेळी मोदीविरोधाचे सूत्र पुढे करून राज्ये आणि केंद्रात एक प्रभावी आघाडी कशी उभारावयाची याबाबत गहन चिंतनच झालेले नाही. राहुल यांना इंडिया आघाडीचे महत्त्व कळलेले आहे पण इतर मित्र पक्षांना काँग्रेसचे महत्त्व कळलेले नाही असे विचित्र चित्र दिसून येत आहे. त्यामुळे जमेल तसे, फारसा गाजावाजा न करता आपले वजन वाढवण्याशिवाय काँग्रेसपुढे दुसरा पर्याय नाही. आघाड्यांच्या बाबतीत हे बघायला मिळते की भाजप असो की काँग्रेस त्यांना वरचढ बघणे प्रादेशिक पक्षांना आवडत नाही. सध्या इंडिया आघाडीत तृणमूल काँग्रेस आणि आम आदमी पक्ष निक्रिय झालेले आहेत. अशा पक्षांना केवळ आपले हितसंबंध जपण्यासाठी अशी विरोधी पक्षांची आघाडी लागते. त्यामुळे स्वबळाची भाषा न करता आपले बळ वाढवणे हेच एकमेव काँग्रेसच्या हातात आहे. 2027च्या उत्तरप्रदेशमधील निवडणुकांनंतर पुढील लोकसभेचा सारीपाट मांडला जाईल. काँग्रेसने आतापासून कंबर कसली तर पक्षाला परत सोनेरी दिवस आल्याशिवाय राहणार नाहीत. भाजपला चकवा देणारी रणनीती, पक्षाला वाढवण्यातील सातत्य आणि लोकांचे प्रश्न घेण्याची चिकाटी ही त्रिसूत्री जादूच्या कांडीप्रमाणे वातावरण बदलल्याशिवाय राहणार नाही. पंतप्रधान कोण चांगले आहेत व चांगले बनतील असा एक सर्वे उत्तर प्रदेशात घेण्यात आला. त्यात राहुल गांधी यांना मोदी यांच्यापेक्षा जास्त पाठिंबा मिळाला हे बदलत्या काळाचे संकेत आहेत. मोदी हे काय प्रकरण आहे हे जेव्हा काँग्रेसला खरोखरच कळायला लागेल तेव्हा भाजपला कसा बरोबर शह द्यायचा हे तिला समजणार आहे.

राज्यकारभाराबाबत मोदी सरकार म्हणजे तीन आण्याची कोंबडी आणि 13 आण्याचा मसाला असाच प्रकार असल्याने कोण खुश होणार? हे तिला हळूहळू कळू लागले आहे. जोपर्यंत काँग्रेसला पूरा खेळच कळत नाही तोवर ‘शाही परिवार’ आणि ‘शहजादा’ अशा शेलक्या शिव्या ऐकाव्या लागणार आहेत. दरबारी राजकारणाला जेव्हढ्या लवकर सोडचिट्ठी मिळेल तेव्हढे लवकर हे कोडे सुटणार आहे.

सुनील गाताडे

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article