भेटीलागी जीवा
पूर्वीच्या काळी विस्तवाची ने-आण करीत. म्हणजे चुलीमधला विस्तव शेगडीसाठी, बंब तापवण्यासाठी लागत असे. दोन व्यक्तींच्या मधून विस्तव न्यायचा नाही हा अलिखित नियम कटाक्षाने पाळला जात असे. जर दोघांच्या मधून विस्तव नेला तर अंतकाळी एकमेकांची भेट होत नाही हा समज रूढ होता. तेव्हा प्रवास खडतर होता आणि संपर्कसाधने नव्हती. त्यामुळे अंतकाळी आजारी व्यक्तीला भेटायला लवकर जाता येत नसे. डोळ्यांत प्राण आणून माणसे आपल्या जिवलगांची वाट बघत. भेट झाली की प्राणपाखरू अनंताच्या प्रवासाला निघून जायचे. भेटीसाठी कुडीमध्ये प्राण धरून ठेवणारे आप्त अनेकांच्या स्मरणात असतील.
गावाला जाताना, एकमेकांचा निरोप घेताना एक प्रश्न हमखास असतो- ‘आता कधी भेट?’ खरे म्हणजे जग खूप जवळ आले आहे. इतके की घरामधल्या लहानसहान गोष्टीदेखील परदेशात चित्रणाच्या माध्यमातून सहज पोहोचतात. रोजच्या भोजनाच्या ताटाचे चित्रसुद्धा क्षणात दूर पोहोचते. तरीही प्रत्यक्ष भेट होणे खूपच कठीण होत चालले आहे. माणसे स्वमग्न आणि व्यस्त आहेत. भावनांचा कल्लोळ, प्रेम, जिव्हाळा, ओढ या भेटीचा अट्टाहास करणाऱ्या साऱ्या गोष्टी हळूहळू काळाच्या पोटात गुप्त होत आहेत. भेटी दुर्मिळ होत चालल्या.
भेटीमधली आस अनुभवण्यासाठी मनाची उच्च अवस्था असावी लागते. तिचे दर्शन संतसाहित्यात घडते. संत तुकाराम महाराजांचा अभंग आहे- ‘भेटीलागी जीवा लागलीसे आस..’ त्यात एकाहून एक चढते दृष्टांत आहेत. पौर्णिमेचा चंद्र चकोराचे जीवन असल्यामुळे ते जसे त्याची प्रतीक्षा करतात. त्याप्रमाणे माझे मन, हे पांडुरंगा, तुझी वाट बघते आहे. सासुरवाशीण जशी दिवाळीची वाट बघते, तिला माहेरी न्यायला मुराळी येईल म्हणून तिला आस लागते, तसेच भुकेले बाळ टाहो फोडून रडते, त्याप्रमाणे मला तुझ्या भेटीची भूक लागली आहे. तू धाव घे आणि तुझे श्रीमुख दाखव. यालाच समांतर असा तुकाराम महाराजांचा अभंग आहे. ‘कन्या सासुऱ्यासी जाये’. यात पांडुरंगाच्या भेटीची अर्थात आत्मसाक्षात्काराची ओढ तीव्र आहे. कन्या, बाळ आणि मासळी अशा तीन प्रतिमा वापरून दृष्टांतमाला सादर केली आहे. सासरी जाणारी कन्या जशी मागे वळून वळून बघते त्याप्रमाणे तू कधी भेटशील असे माझ्या जिवाला झाले आहे. एखाद्या लहान बाळाचे बोट गर्दीमध्ये आईच्या हातातून सुटून गेल्यावर त्याची जशी अवस्था होते तसे तुझ्यावाचून पांडुरंगा माझे झाले आहे. शेवटच्या चरणात मात्र विठोबाच्या वियोगाचा तीव्रतम भाव प्रकट होतो. ‘जीवनावेगळी मासोळी। तैसा तुका तळमळी’. मासा हा प्राणी पाण्याशी अनन्य आहे. त्याचा श्वास जळावाचून थांबतो तशी अवस्था महाराजांची झाली आहे.
संत नामदेवमहाराजांचे विठोबाच्या भेटीसाठी व्याकुळलेले मन अभंगातून वाचताना सामान्य माणसांचे मन अंतर्मुख होते. एकदा ज्ञानोबा माऊली संत नामदेवांना म्हणाले, ‘जीवन्मुक्त ज्ञानी जरी झाले पावन, तरी देवतीर्थभजन न संडिती.’ नामदेवा, तुझ्या संगतीचे सुख अनुभवावे असे वाटते म्हणून तू माझ्याबरोबर भूतळीची तीर्थे पहायला चल. हे ऐकून संत नामदेव घोर चिंतेत पडले. त्यांना वाटले की पंढरीनाथाच्या पायांचा वियोग सहन होणारा नाही. आता काय करावे? तेव्हा विठुराया म्हणाला, ‘नवल केवढे भाग्य तुझे। प्रत्यक्ष परब्रह्ममूर्ती ज्ञानेश्वर। करीतसे आदर संगतीचा.’ विठोबाची आज्ञा शिरसावंद्य मानून नामदेव तीर्थयात्रेला निघाले. ‘परि चित्त पांडुरंगी नामयाचे.’ तीर्थयात्रा करून नामदेव आले आणि धावतच विठोबाच्या चरणापाशी गेले. जिवलग विठोबा भेटला तेव्हा ‘सद्गदित कंठ वोसंडला नयनी। घातली लोळणी चरणाशी?’ संत नामदेवांची भेटीची आस विठोबावाचून कोण जाणणार? विठोबाने काय केले? तर ‘धरुनी हनुवटी दिधले आलिंगन। कुरवाळोनी वदन नेत्र पुशी?’ त्यानंतर आपल्या कंठातली सुमनतुळशीमाळ काढून ती नामदेवांच्या गळ्यात घातली. या देव-भक्तांच्या जोडीला रखुमाईने प्रेमभराने ओवाळले.
श्री दत्त संप्रदायात पादुकांचे दर्शन हेच श्री दत्तप्रभूंचे रूप आहे. श्री दत्तप्रभुंना विशिष्ट असे रूप नाही. ते कधीही, कुठेही, कोणत्याही रूपात भक्तांसाठी धावून जात प्रकट होतात. त्यांना जात-पात, धर्मलिंग, पशुपक्षी, कीटक, माणूस.. कुणाचेही वावडे नाही. पादुकांना विशेष अर्थ आहे. सद्गुरूंचे भ्रमण हे अतिशय कष्टदायी असले तरी त्यात भक्तवात्सल्य अपार आहे. त्याला सीमा नाही. सद्गुरूंचे पाय हे भ्रमण करीत वंचितांचे, उपेक्षितांचे, दीनदुबळ्यांचे दु:ख दूर करीत असतात. म्हणून भक्तांना सद्गुरूंच्या पायांची ओढ लागते. प. प. वासुदेवानंद सरस्वती यांचे गोड पद आहे ‘भेटीलागी माझे मन उतावीळ। कधी मी पाऊले पाहीन डोळा?’ श्रीक्षेत्र औदुंबराचे यात वर्णन आहे.
स्वामी म्हणतात, कृष्णातिरी असणाऱ्या औदुंबर वृक्षाजवळ वास करणारा ऐसा जगदोद्धार देव कोठे? इथे नित्य वास्तव्य करणारे भावार्थी सज्जन धन्य आहेत. त्यांना प्रत्यक्ष वैकुंठात राहण्याचे सौभाग्य प्राप्त झाले आहे. श्रीदत्तप्रभूंचे ‘चरणयुग्म’ पाहण्यासाठी स्वर्गीचे सुरवर येथे जन्म घेऊ इच्छितात. इथे प्रत्यक्ष दत्तप्रभू नांदतात आणि नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यतिरूपाने येतात. जेव्हा या पादुका प. प. स्वामींच्या दृष्टीस पडतात तेव्हा ‘पाहूनिया वासु श्री दत्त पादुका अल्हादन देखा नाचतसे’ अशी भावविभोर अवस्था होते.
समर्थ रामदास स्वामी हे लोकशिक्षक. समाजाच्या उद्धाराची तळमळ असणाऱ्या समर्थांची करुणाष्टके वाचून डोळ्यात अश्रू आले नाहीत तरच नवल! समर्थांचा श्रीरामभेटीचा ध्यास भक्तांना व्याकुळ करतो. समर्थ म्हणतात, माझ्या अंत:करणातील तळमळ कुणी जाणू शकत नाही. तुझ्या दर्शनाशिवाय माझे मन कुठेच लागत नाही. ‘बळे लावता चित्त कोठे जडेना। समाधान ते काही केल्या घडेना.’ समर्थ तळमळीने आणि व्याकुळतेने रामाला साद घालतात... ‘कृपाळूपणे भेट रे रामराया। वियोगे तुझ्या सर्व व्याकुळ काया?’ समर्थांचे सर्वस्व राम आहे. ‘तनु-मनु धनु माझे, राघवा रूप तुझे’, असे म्हणून ‘तुजविण रामा मज कंठवेना’ ही आर्त हाक रामाला घालणाऱ्या समर्थांची मनोभूमिका केवढी उच्च पातळीची असेल?
लौकिकातल्या साऱ्या भेटी सागरातल्या ओंडक्यासारख्या असतात. ‘एक लाट तोडी दोघा, पुन्हा नाही भेट’ असे ग. दि. माडगूळकर यांनी म्हटलेच आहे. जिवाशिवाची भेट अक्षय आहे. तिचीच आस धरावी. दुसरे काय?
- स्नेहा शिनखेडे