बेळगाव-भद्राचलम एक्स्प्रेसला गती केव्हा मिळणार?
दीड-दोन महिन्यांपासून रेल्वेसेवा बंद : पुन्हा एक्स्प्रेस सुरू करण्याची प्रवाशांची मागणी
बेळगाव : प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद मिळत असतानाही बेळगाव-भद्राचलम एक्स्प्रेस मागील दीड ते दोन महिन्यांपासून विविध कारणांनी बंद ठेवण्यात आली आहे. यामुळे बेळगावहून हैदराबाद, सिकंदराबाद, मंत्रालय येथे ये-जा करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होत आहे. प्रवासी संख्या उत्तम असतानाही एक्स्प्रेस अचानक बंद करण्यात आल्याने बेळगावच्या कोट्यातील आणखी एक एक्स्प्रेस बंद झाल्याबद्दल नाराजीचा सूर उमटत आहे. कोरोनापूर्वी कोल्हापूर-हैदराबाद मार्गावर दररोज एक्स्प्रेस धावत होती. त्यामुळे कोल्हापूर, मिरज, बेळगाव येथील प्रवाशांना हैदराबाद शहराला प्रवास करणे सोयीचे होत होते. परंतु, कोरोनात बंद झालेली एक्स्प्रेस पुढील अनेक महिने बंद ठेवण्यात आली. नागरिकांची मागणी वाढत असल्याने अखेर 17 जानेवारी 2023 ला बेळगाव-सिकंदराबाद या मार्गावर रेल्वे सुरू करण्यात आली.
दैनंदिन रेल्वे असल्यामुळे हैदराबाद-सिकंदराबाद येथे जाणाऱ्या प्रवाशांना हुबळी, धारवाडऐवजी बेळगावमधून प्रवास करता येऊ लागला. बेळगावमधील अनेकजण नोकरी, व्यवसायानिमित्त हैदराबादला असल्यामुळे त्यांना ये-जा करणे सहजशक्य होत होते. मे 2024 मध्ये तांत्रिक कारण देत बेळगाव-भद्राचलम एक्स्प्रेस काही दिवसांसाठी रद्द करण्यात येईल, असे रेल्वेने स्पष्ट केले होते. परंतु, त्यानंतरही एक्स्प्रेस सुरू करण्याकडे दुर्लक्षच होत आहे. उत्तम प्रवासी संख्या असतानाही नैर्त्रुत्य रेल्वेने एक्स्प्रेस का रद्द केली? याचे उत्तर राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी यांनाही देता आलेले नाही. कोरोनानंतर हातावर मोजण्याइतक्या एक्स्प्रेस बेळगावमधून धावत आहेत. असे असताना बेळगावच्या कोट्यातील पुन्हा एक एक्स्प्रेस रद्द केल्याने प्रवाशांची नाराजी रेल्वेने ओढवून घेतली आहे.
हैदराबादला थेट रेल्वेच नाही
बेळगावमधून हैदराबादला जाण्यासाठी थेट रेल्वेसेवा उपलब्ध नाही. यासाठी बेळगावहून हुबळी गाठून तेथून हैदराबादला रेल्वेप्रवास करता येऊ शकतो. अथवा बेळगाव-हैदराबाद मार्गावर खासगी आराम बस उपलब्ध आहेत. परंतु, आराम बसचे तिकीट दर सर्वसामान्यांना परवडणारे नसल्याने बेळगाव-सिकंदराबाद एक्स्प्रेस पुन्हा सुरू करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.