तवंदी घाटात 5 वाहनांचा अपघात
एक जागीच ठार, 14 जखमी : मृत जांबोटीचा रहिवासी : जोतिबाला जाताना काळाचा घाला
वार्ताहर/तवंदी
तवंदी घाटात गुरुवारी सकाळी 10 च्या सुमारास 5 वाहनांचा अपघात झाला. यामध्ये एक जण जागीच ठार तर अन्य 14 जण जखमी झाले. या अपघातात सर्व वाहनांचे सुमारे 10 लाख रुपयापेक्षा अधिक नुकसान झाले आहे. या अपघातामध्ये नारायण भागू पारवाडकर (वय 65, रा. जांबोटी, ता. खानापूर) असे मृताचे नाव आहे. जोतिबाच्या दर्शनाला जाताना क्रूझरला अपघात झाला. तवंदी घाटात गुरुवारी सकाळी दहा वाजता पाच वाहनांचा भीषण अपघात झाला. ट्रकचा ब्रेक निकामी झाल्याने 2 कार, 1 क्रुझर व दुचाकी यांना जोराची धडक दिली. त्यात क्रुझरमधील नारायण भागू पारवाडकर हे जागीच ठार झाले. तर क्रूजरमधील प्रमोद पारवाडकर (वय 24), वैष्णवी घाडी (वय 25), विद्या पारवाडकर (वय 46), रेशमा कुडतुरकर (वय 40), शंकर पारवाडकर (वय 28), संग्राम पारवाडकर (वय 12), सुहास पारवाडकर (वय 49), प्रियांका पारवाडकर (वय 25), प्रतीक्षा पारवाडकर (वय 22), मोहन पारवाडकर (वय 57), स्वाती पारवाडकर (वय 35), आयेशा देवळी (वय 5) तसेच दुचाकीवरील संतोष विटेकरी (वय 40) व त्यांची पत्नी अंजना वेटेकरी (वय 35, रा. गडहिंग्लज) अशी जखमींची नावे आहेत.
सर्व जखमींना रुग्णवाहिकेतून महात्मा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातातील क्रुझरमधील रेश्मा कुडतुरकर (वय 40) व शंकर पारवाडकर (वय 28, रा. जांबोटी) या दोघांना गंभीर जखमी असल्यामुळे रुग्णवाहिकेतून सिव्हिल हॉस्पिटल बेळगाव येथे पाठविण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच अवताडे कंपनीचे उच्च अधिकारी विजय दाईंगडे तसेच सुपरवायझर संतराम माळगी, सीपीआय बी. एस. तळवार, निपाणी शहर पोलीस स्थानकाच्या उपनिरीक्षक उमादेवी तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या अपघातामध्ये सर्वच वाहनांचे सुमारे 10 लाख रुपयापेक्षा अधिक नुकसान झाले आहे. या घटनेची नोंद निपाणी शहर पोलीस स्थानकात झाली आहे. तवंदी घाटात सुमारे तासभर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अपघातामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. सुमारे तासाभरानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली.