अनगोळ बस शेवटच्या थांब्यापर्यंत येणार का?
मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असल्याने प्रवाशांचा प्रश्न : विद्यार्थी, नागरिक, महिलांना होतोय नाहक त्रास : संबंधितांनी लक्ष देण्याची आवश्यकता
बेळगाव : गेल्या एक वर्षांहून अधिक काळापासून अनगोळची बससेवा कोलमडली आहे. गेल्या वषी अनगोळ भागातील अनेक भागात नवीन डेनेज पाईपलाईन घालण्याचे काम सुरू आहे. ते पूर्ण झाल्यानंतर शेवटच्या टप्प्यात गणेशोत्सवाच्या आधी रघुनाथ पेठ येथील बसमार्गावरील रस्ता खोदाई करून त्या ठिकाणी नवीन डेनेज लाईन घालण्याचे काम सुरू केले. तेव्हापासून आजपर्यंत जवळपास एक वर्षाहून आधिक काळ लोटला तरीही अनगोळची बस लक्ष्मी मंदिर येथील शेवटच्या बसथांब्यापर्यंत येत नाही. अनगोळ परिसरातील अनेक वसाहती दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत.
पूर्वी अनगोळचा शेवटचा भाग म्हणून मारुती गल्ली, काळा तलाव, लोहार गल्ली व झेरे गल्ली नाथ पै नगरपर्यंत मर्यादित होता. पण आता नवीन वसाहती निर्माण झाल्या आहेत. या भागातील महिला, विद्यार्थी व नागरिकांना बेळगाव, शहापूर व शहराच्या इतर भागात कामकाजासाठी जाण्यास बससेवा महत्त्वाची आहे. अनगोळ भागातील बहुतांश विद्यार्थी टिळकवाडी, बेळगाव शहरातील महाविद्यालय-शाळांमध्ये शिकण्यास येत असतात. अनेक नागरिक, महिला बेळगाव व आसपासच्या परिसरात कामानिमित्त रोज बसने प्रवास करत असतात. त्यामुळे अनगोळच्या नागरिकांना बसप्रवास महत्त्वाचा भाग आहे. पण गेल्या वर्षभरापासून अनगोळची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी बस ही अनगोळच्या प्रवेशद्वारातच थांबत आहे.
गेल्या वर्षभरापासून नागरिकांचे हाल
मागच्या वषी दिवाळीनंतर या रस्त्यावरील डेनेज लाईनचे काम संपल्यावर चरी बुजविण्यात आल्या होत्या. पण त्यातील माती खचून त्यामध्ये मोठ्या प्रमाणात चरी निर्माण झाल्या होत्या. नागरिकांनी व वृत्तपत्रातून आवाज उठविल्यानंतर त्या बुजविण्यात आल्या. तरीही केएसआरटीसीतर्फे बस सुरू केली नाही. तेव्हापासून आतापर्यंत या ना त्या कारणाने गावात बस फिरताना दिसत नाही. उत्सवकाळात मंडप उभारणीमुळे बससेवा शेवटच्या स्थानकापर्यंत बंद असायची आणि मंडप काढल्यानंतर पुन्हा सुरू व्हायची. पण आता गेल्या वर्षांहून अधिक काळापासून अनगोळची बससेवा कोलमडली आहे. त्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.
मोफत बस प्रवास ठरला डोकेदुखी
सरकारने सुरू केलेला महिलांसाठी मोफत बसप्रवास अनगोळच्या महिलांसाठी मोठी डोकेदुखी ठरली आहे. कारण या प्रवासासाठी महिलांना दीड एक किलोमीटर धावत बस धरावी लागत आहे. इतकेच अंतर घरी चालत जाताना लागत आहे. जरी बस प्रवास मोफत असला तरी अनगोळच्या महिलांना याचा लाभ घेण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. नाहीतर रिक्षाचालकांना नाहक पैसे देऊन प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे या योजनेच्या फायद्यापेक्षा अनगोळच्या महिलांसाठी तोटाच सहन करावा लागत आहे.
अधिकारी म्हणतात खराब रस्ता अन् बेशिस्त पार्किंग कारणीभूत
गणेशोत्सोवानंतर अनगोळ येथे असलेल्या कंट्रोलर अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता ते म्हणाले, अनगोळ रघुनाथ पेठ येथील रस्ता हा फारच खराब झाला आहे. ठिकठिकाणी डेनेजचे खड्डे फुटाफुटावर आहेत. तसेच महालक्ष्मी मंदिर शेवटच्या स्थानकापर्यंतच्या बस मार्गावर दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात दुचाकी, रिक्षा, चारचाकी वाहने उभी करून अडथळा निर्माण करतात. तसेच दररोज सायंकाळी धर्मवीर संभाजी चौक ते मराठी शाळा नंबर 34 पर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूला भाजीविव्रेते रस्त्यावर बसलेले असतात. त्यामुळे ग्राहकही गर्दी करतात. त्यामुळे बसचालकांना येथून बस चालवताना अडथळा येत आहे. एखादा अपघात घडल्यास बसचालकांना जबाबदार धरले जाते. त्यामुळे अनगोळची बससेवा पूर्ववत होणार कधी आणि नागरिकांचे हाल संपणार कधी? असे प्रŽ नागरिक, महिलांतून उपस्थित होत आहेत.
रस्त्याची डागडुजी करूनही पुन्हा खड्डे
गणेशोत्सवापूर्वी या रस्त्याचे डांबरीकरण करावे यासाठी अनगोळ येथील माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांनी युवक व नागरिकांतर्फे अंदोलन छेडले होते. त्यावेळी मनपा अधिकारी व स्थानिक नगरसेविकेने आंदोलनस्थळी भेट देऊन गणपती आगमनानंतर खड्डे बुजविण्यात येतील व पाऊस कमी झाल्यावर डांबरीकरण करण्यात येईल असे आश्वासन दिले होते. त्यानुसार गणपतीपूर्वी रघुनाथ पेठ येथील खड्डे बुजविण्यात आले. पण सध्या रस्त्यावर पुन्हा खड्डे पडले आहेत.