मन प्रसन्न असले की सर्व दु:खे झडून जातात
अध्याय दुसरा
भगवंत अर्जुनाला स्थितप्रज्ञ लक्षणे समजावून सांगत आहेत. ते म्हणाले, माणसाने आपणहून विषयांबद्दल वाटणारी ओढ किंवा आसक्ती सोडली की, त्या विषयांच्या उपभोगांची इच्छा कमी होते पण एव्हढ्याने भागत नाही कारण विषयसुखाचा विचार जरी त्याच्या मनात आला तरी तो त्याचा घात करतो. थोडक्यात आपल्या मूळ स्वरूपाचा विसर पडायला अगदी किरकोळ कारणसुद्धा पुरेसे असते म्हणून माणसाने विषयापासून सुख मिळते ही कल्पना खोटी आहे हे कायम लक्षात ठेवावे. मन स्वस्थ असणे म्हणजे स्वमध्ये स्थिर असणे. तसं ते असलं की, माणसाला आत्मस्वरूपाचा विसर पडत नाही. तेच जर अस्वस्थ असेल तर मात्र विषयांबद्दल वाटणारे प्रेम आणि द्वेष ह्या दोन गोष्टींची ते शिकार होते.
पुढील श्लोकात भगवंत असं सांगतायत की, विषयांची आवड नसल्याने त्याला त्यांच्याबद्दल प्रेम वाटत नाही, त्यामुळे ते ज्यांना मिळाले आहेत त्यांचा तो द्वेष करत नाही. त्याची इंद्रिये त्याच्या स्वाधीन असल्याने त्याने प्रारब्धानुसार वाट्याला आलेल्या विषयांचा उपभोग घेतला तरी त्याच्या मनाची प्रसन्नता अखंड राहते. त्यासाठी इंद्रियांवर प्रभुत्व असणे आवश्यक आहे, ते म्हणतात,
राग-द्वेष परी जाता आली हातात इंद्रिये । स्वामित्वे विषयी वर्ते त्यास लाभे प्रसन्नता ।।64 ।।
ह्या श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, साधकाने विषय मनातून काढून टाकावेत. म्हणजे त्याबद्दलचे प्रेम आणि द्वेष हे आपोआपच नाहीसे होतील. राग आणि द्वेष नाहिसे झाल्यावर, जरी इंद्रियांनी माणसाला त्या विषयांची माहिती पुरवली तरी त्या माहितीमुळे साधकाचे चित्त विचलित होत नाही. ते विषय साधकाला बाधक होत नाहीत. ज्याप्रमाणे सूर्य त्याच्या किरणरूपी हातांनी साऱ्या जगाला स्पर्श करतो, परंतु त्याला जगातले लोक त्या प्रकाशात काय व्यवहार करत आहेत ह्यामध्ये त्याला काडीचाही रस नसतो. त्यामुळे त्यांच्या बऱ्यावाईट वागण्याचा त्याच्यावर परिणाम होत नाही, त्याप्रमाणे ज्ञानी विषयांचे ठिकाणी उदासीन, अनासक्त असतो, त्यामुळे तो कामक्रोधापासून अलिप्त असतो. ह्या अलिप्तपणामुळे तो सहजी आत्मानंदात रंगून जातो, त्याला सर्व विषयामध्ये आपल्या आत्मस्वरूपाहून भिन्न असे दुसरे काही दिसत नाही. त्यामुळे त्याला विषय बाधत नाहीत.
आत्मज्ञानाने परिपूर्ण अवस्थेला पावलेला पुरूष विषयांचे संगतीने लिप्त होत नाही. जो विश्वचैतन्याशी एकरूप होऊन राहतो, त्याची बुद्धी स्थिर झाली आहे, असे समजावे. पुढील श्लोकात भगवंत म्हणतात, ज्याला विषयांबद्दल प्रेम वाटत नाही तसेच ते ज्यांना मिळाले आहेत त्यांचा जो द्वेष करत नाही त्यांचे चित्त कायम प्रसन्न असल्याने त्याच्या सर्व दु:खांचा नाश होतो. चित्त प्रसन्न असणाऱ्या साधकाची बुद्धी परमात्मास्वरूपी लवकर स्थिर होते.
प्रसन्नतेपुढे सर्व दु:खे जाती झडूनिया । प्रसन्नतेने बुद्धीची स्थिरता शीघ्र होतसे ।।65।।
श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, ज्याचे चित्त अखंड प्रसन्न असते त्याला कोणत्याही प्रकारच्या संसारातील सुखदु:खांपासून त्रास होत नाही. ज्याच्या उदरात अमृताचा झरा उत्पन्न झाला आहे, त्याला कधीही तहान-भुकेची भीती नसते. त्याप्रमाणे ज्याचे अंत:करण संपूर्ण प्रसन्न झाले आहे, त्याची बुद्धी आपोआपच परमात्मस्वरूपी स्थिर झालेली असल्याने त्याला दु:ख कसे ते माहितच नसते.
क्रमश: