मुखवटाच चेहरा बनतो तेव्हा...
मॅडम मी स्वाती. माझ्या मैत्रिणीला तुमच्या मदतीची गरज आहे. प्लीज काहीतरी करा. नाहीतर सारंच अवघड होईल. तुम्ही शांत व्हा. बसा बरं. हं, आता सांगा काय झालं आहे नेमकं? मॅडम, सुलभाची आणि माझी 20 वर्षांची मैत्री आहे. अतिशय चांगली, सगळयांच्या मदतीला तत्पर असणारी ही माझी मैत्रीण! पण गेले काही दिवस ती खूप अस्वस्थ आहे. मी तिला विचारण्याचा प्रयत्न केला पण एकच वाक्य ‘खूप कंटाळा आलाय सगळ्याचा’. मी म्हटलं असेल काहीतरी, सांग सांग म्हणत मागेही लागले नाही. पण काल सकाळी जे पाहिलं ते भयंकर होतं.
काय पाहिलं तुम्ही? काल सकाळी मी तिच्याकडे गेले होते. अगदी सहजच. तिच्याकडे काम करणारी मुलगी लादी पुसत होती. त्यामुळे दार उघडंच होतं. घरात बाकी कुणीच नव्हतं. तिला मी सुलभा कुठे आहे? हे विचारल्यावर काहीही न बोलताच तिने बेडरूमकडे हात दाखवला. दार नुसतं ढकललेलंच होतं. मी आत डोकावून पाहिलं, तिला हाक मारणार इतक्यात पाहते तर काय, सुलभा तिथे कोपऱ्यात दात विचकत धबाधब उशीवर ठोसे मारत होती. तिचा तो अवतार एवढा विचित्र होता की मी घाबरले. बाहेर कोचवर येऊन बसले.
ती मीराजवळ येऊन म्हणाली, ‘ताई, घाबरलात ना? मी ही पहिल्यांदा पाहिलं तेव्हा असंच झालं’ मी म्हटलं, म्हणजे? किती दिवस सुरू आहे हे? आठवडा झाला. सांगणार कुणाला आणि कसं? मी आज तुम्हालाच भेटायला येणार होते म्हणत तिने विषय थांबवला.
तुम्ही सुलभाला हाक नाही मारली? नाही हो मॅडम, माझं धाडसच झालं नाही. रोजच्याप्रमाणे संध्याकाळी फिरायला गेलो तेव्हा तिचं नको झालंय सारं, हे सुरूच होतं. मी तिला म्हटलं तुला खूप अस्वस्थ वाटत असेल तर आपण त्या मॅडमना भेटूया का? काहीतरी मार्ग निघेल गं. तीही आढेवेढे न घेता तयार झाली. आधीच किती वेळ गेलाय ठाऊक नाही आणि वेळ नको म्हणून आजच आले. बरं.. त्यांना आत पाठवा पाहू नेमकं काय झालेय ते
सुलभाताई आत आल्या. या. बसा ना.. खुर्चीच्या पुढच्या टोकावर कसंबसं बसणं, उदास चेहरा, खांदे पाडून बसणं या गोष्टी त्यांच्यावरचा ताण स्पष्टपणे दर्शवित होत्या. समोरून काही बोलण्याचं चिन्ह दिसेना.. मी म्हटलं.. काय झालं? सुलभाताईंनी एकदम माझा हात घट्ट धरला.. म.. म... मला मदतीची गरज आहे. कराल ना?.. हो.. आवश्य... नक्की करेन.. काही कौटुंबिक समस्या आहे का? त्या एकदम ओक्साबोक्शी रडू लागल्या. दहा मिनिटं तशीच गेली. पाण्याचा ग्लास पुढे करत म्हटलं हे घ्या,. सुलभाताई शांत व्हा. प्रत्येक गोष्टीतून मार्ग काढता येतो पण त्यासाठी नेमकी अडचण तर कळायला हवी ना.. अं.. हो.. हो.. चुकलंच तसं.. मॅडम... मी सांगते.. पण कसं सांगू.. काय सांगू... आधी फ्रेश होऊन या बरं. मग बोलू आपण... हं... बसा.. अगदी मोकळेपणानं काहीही मनात न ठेवता, दडपण न घेता बोला.
मॅडम... मला काय होतंय तेच कळत नाही. स्वत:चा खूप खूप राग येतो. कंटाळा आलाय.. कशाचा? ढोंगाचा.. हा हा ढोंगीपणा नको वाटतोय... कसलं ढोंग?
मनाविरुद्ध झालं तरी हसत रहायचं.. किती राग आला, कंटाळा आला तरी नातेवाईकांचं, सासू-सासऱ्यांचं.. काहीच त्रास होत नाही असा आव आणत सारं करायचं.. पोरांच्या दिमतीत रहायचं... किचनचं तोंड पाहू नये असं वाटत असतानाही सगळं बाजूला ठेवत परत सज्ज व्हायचं, कुटुंबात एखादं... कितीही नावडतं माणूस असलं तरी कार्यक्रमप्रसंगी छान छान करत वेळ साजरी करायची.. एखादा दिवस खूप दमणूक झालेली असावी आणि त्याचदिवशी पतीदेवांना फिरायला जायचा मूड यावा... इच्छा नसतानाही उसनं अवसान आणत बाहेर जायचं... हा सगळा दिखावा म्हणजे ढोंगच ना हो... मी मीच कारणीभूत आहे याला. चांगुलपणाच्या वेडापायी हे ओढवून घेतलंय मी.. मला स्वत:चाच राग येतो. आता असह्य होतं. कुणाल सांगू... कुणाला इजा नको... त्रास नको. मग मारायचे बुक्के उशांवर... लोडावर.. थोडं गप्प बसायचं.. परत सगळ्यांच्या सेवेसाठी सज्ज व्हायचं...
सुलभाताई बोलण्याच्या ओघात घडाघडा बराच वेळ बोलत होत्या. मध्येच रडत होत्या. सगळा प्रकार लक्षात आला. सगळ्यांच्याच गुड बुकमध्ये राहण्याचा अट्टहास, नकार न देता येणं या सगळ्यातून होणारी दमछाक, कामाचा वाढीव ताण, त्यातच मेनोपॉझचा सुरू असलेला कालखंड या आणि यासारख्या अनेक गोष्टी अस्वस्थतेच्या मुळाशी होत्या. केवळ समुपदेशनाने प्रश्न सुटणार नव्हता. योग्य औषधोपचारांचीही गरज होती. सुलभाताईंच्या पतीला या गोष्टीची कल्पना देणं आणि त्यांचं सहकार्य घेणं आवश्यक होतं. डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार सुरू झाले. या सगळ्यांमध्ये कुटुंबीय, मैत्रीण स्वाती यांनी मोलाची साथ दिली. सुलभाताईंनीही पूर्ण विश्वास टाकत न कंटाळता सांगितलेल्या सर्व गोष्टी आत्मसात केल्या. त्यामुळेच काही महिन्यानंतर त्या यातून पूर्णपणे बाहेर पडल्या.
खरंतर मनातली खळबळ, कंटाळा, निराशा लपवून प्रसंग साजरे करण्याची वेळ कधी ना कधी सर्वांवरच येत असते. काही वेळा कुटुंबात, कामाच्या ठिकाणी सूर न जुळणारी माणसंही असतात. परंतु त्यावर फुली न मारता ‘ओके... ठीक आहे’ चा मुखवटा धारण करत वाटचाल करावी लागते. मान्य केलं वा नाही केलं तरी कधी ना कधीतरी आपण सारेच असे मुखवटे धारण करून ती वेळ निभावून नेत असतो. परंतु क्वचित धारण करावा लागणारा हा मुखवटा जर चेहराच बनला तर मात्र सारंच अवघड होतं. सुलभाताईंच्या बाबतीत नेमका हाच घोळ झाला होता.
एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपण सदासर्वकाळ सगळ्यांना खुश ठेवू शकत नाही. आपण सगळ्यांच्याच गुड बुकमध्ये असायला हवं, सगळ्यांनीच आपल्याला चांगलं म्हटलं पाहिजे हा अट्टहास कशासाठी? आपल्यालाही एखादी व्यक्ती खूप जवळची वाटते, कुणी साधारण.. अशी विभागणी असतेच ना? आणि ती प्रसंगानुरूप, व्यक्तीपरत्वे, नवीन संपर्कातून बदलूही शकते, कुणीच आपल्याला नावं ठेवू नयेत म्हणून सर्वांची कामं ऐकत, हो ला हो म्हणत बसलो तर प्रचंड धावपळ करत सगळ्यांच्या जबाबदाऱ्या स्वीकारताना शारीरिक दमणूक आणि मानसिक ताणापलीकडे हाती काहीच लागणार नाही. याचा अर्थ कुणाला मदत करूच नये असा नाही, तर समोरच्याची ती खरी गरज आहे का हे लक्षात घ्यायला हवं. उगीचच जाता येता तिकडेच जाणार ना? मग माझी ही कागदपत्रं पोहचव, अमुक वस्तू घेऊन ये, पासबुकमध्ये एंट्री करून घेऊन ये हं जरा. अशी सतत कुणी कामं सांगू लागलं तर योग्य शब्दात, शांतपणे नकार देणं गरजेचं. उत्साहाच्या भरात वा चांगुलपणा जपला जावा म्हणून हो ला हो म्हणणं त्रासदायक ठरू शकतं. योग्य शब्दात नकार देण्याचं आणि नकार पचवण्याचंही कौशल्य आत्मसात करणं गरजेचं आहे. स्वत:मधील गुण, उणीवा याची जाणीव आणि त्यामध्ये प्रयत्नपूर्वक बदल या गोष्टी आवश्यक आहेत. जीवनाची वाटचाल करत असताना आपली मूल्यं ठरवणं आणि त्या दिशेनं प्रयत्न करणं महत्त्वाचं आहे. काही वेळा एखादा प्रसंग निभावून नेण्यासाठी मुखवटा धारण करावा लागतो हे जरी खरं असलं तरी यात सातत्य येऊन हाच मुखवटा आपला चेहरा बनणार नाही ना, याची काळजी घ्यायला हवी हे मात्र खरे!
-अॅड. सुमेधा संजिव देसाई