For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

एक इच्छा तृप्त झाली की त्यातून दुसऱ्या इच्छेचा जन्म होतो

06:46 AM Jun 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
एक इच्छा तृप्त झाली की त्यातून दुसऱ्या इच्छेचा जन्म होतो
Advertisement

अध्याय पहिला

Advertisement

बाप्पा राजाला म्हणाले, विषयांचा त्याग करण्यासाठी साधक ईश्वरस्मरणात मन स्थिर करण्याचा प्रयत्न करत असतो. त्यासाठी तो तोंडाने नामस्मरण करून कानांनी तो ते ऐकत असतो. ह्यातून काही काळ मनुष्य विषयत्याग करण्यात यशस्वी होतो पण विषयांचे विचार त्याच्या मनातून जाता जात नसल्याने विषयाचे सेवन केल्याशिवाय तो गप्प बसू शकत नाही.

विषयांपासून माणसाची सुटका होण्याच्या दृष्टीने बाप्पा त्यावर सविस्तर मार्गदर्शन करत आहेत. त्यांना माहिती आहे की, काहीतरी करून माणसाचे विषयांचे आकर्षण कमी झाले तरच त्याच्याहातून पुढे साधना घडेल. ब्रह्मप्राप्ती झाली तर विषयांपासून सुटका होईल हे खरे पण ती मिळवण्यात अनेक अडथळे येतात आणि स्वबळावर मनुष्य त्याना सहजी पार करू शकत नाही. म्हणून सध्या आपण अभ्यासत असलेल्या

Advertisement

युक्तस्तानि वशे कृत्वा सर्वदा मत्परो भवेत् ।

संयतानीन्द्रियाणीह यस्यासौ कृतधीर्मत ।।58।।

श्लोकात बाप्पा म्हणतात, तुझ्या स्वत:च्याने विषयांवर नियंत्रण साधणार नाही. कितीही प्रयत्न केलास तरी तुला विषयोपभोगांचे आकर्षण वाटणार आणि ते तुला मोहात पाडणार. हे टाळण्यासाठी सदैव माझं स्मरण करून मला चित्तात साठवून ठेव. असं केलंस की, त्यात काय आनंद आहे ते तुला कळेल. विषयोपभोगांपासून मिळणाऱ्या क्षणिक आनंदापेक्षा हा चिरकाल टिकणारा आनंद लाखमोलाचा आहे. ह्या पद्धतीने इंद्रियनियंत्रण साधलेल्या साधकाला कृतबुद्धि किंवा स्थिरबुद्धि असे म्हणतात.

कृतबुद्धि शब्दाचा अर्थ समजावून घेऊ. माणसाची बुद्धी त्याला योग्य काय अयोग्य काय हे नेहमीच सांगत असते पण मनुष्य ते ऐकतोच असं नाही. बाप्पानी सांगितलेलं ऐकून, त्याप्रमाणे त्यांच्याठिकाणी मन गुंतवायचा सल्ला बुद्धी देत असते. जो बुद्धीने सांगितल्याप्रमाणे करतो अशा मनुष्याला कृतबुद्धि म्हणतात. जो कृतबुद्धि असतो त्याची बुध्दी स्थिर असते. म्हणून बाप्पा त्याला स्थिरबुद्धि असंही म्हणतायत.

जो सांगितलेल्या उपदेशाबरहुकूम वागत नाही त्याची बुद्धी आणि पर्यायाने मन अस्थिर असते. अस्थिर मनुष्य सदैव असमाधानी असतो. कारण त्याच्या इच्छा, वासना त्याच्यावर राज्य करत असतात. त्यामुळे त्याला राग चटकन येतो आणि त्याचं अध:पतन व्हायला सुरुवात होते. सदैव विषयांचं चिंतन करण्याचे दुष्परिणाम बाप्पा पुढील दोन श्लोकातून समजावून सांगतायत,

चिन्तयानस्य विषयान्संगस्तेषूपजायते ।

काम संजायते तस्मात्तत क्रोधो भिवर्तते ।। 59 ।।

अर्थ- विषयांचे चिंतन करणाऱ्याला विषयात आसक्ति उत्पन्न होते. तीपासून काम उत्पन्न होतो. त्यापासून क्रोध वृद्धि पावतो.

विवरण-माणसाची ज्ञानेंद्रिये म्हणजे कान, नाक, डोळे, त्वचा आणि जीभ ही सदैव त्याच्या आवडत्या गोष्टीकडे त्याचे लक्ष वेधत असतात. माणसाचे तिकडे लक्ष गेले की, त्या गोष्टी मिळाव्यात अशी अपेक्षा तो बाळगतो. ते विषय आपल्याला उपभोगायला कसे मिळतील याचे त्याच्या मनात कायम चिंतन चालू असते. बरं, एखादी गोष्ट मिळाली की, विषय संपला असं कधीच होत नाही. कारण हवी असलेली एक गोष्ट मिळाली की, त्यातून पुढील इच्छेचा जन्म होतो. सामान्यत: मनुष्याला स्वत:च्या खऱ्या ओळखीचा म्हणजे आत्मस्वरूपाचा विसर पडलेला असल्याने आपला देह हीच त्याला स्वत:ची ओळख आहे असे वाटत असते. आपला देह कायम सुखात असावा असे त्याला वाटत असते आणि ते सुख विषयांच्या उपभोगातून मिळेल असे तो समजत असतो. त्यातूनच एक इच्छा तृप्त झाली की त्यातून दुसऱ्या इच्छेचा जन्म होतो. घर बांधून झालं की, गाडी हवीशी वाटू लागते. गाडी घेतली की, आणखीन मोठी गाडी घेण्याचे स्वप्न पडू लागते. ह्या इच्छा करण्याला अंत म्हणून नसतो.

क्रमश:

Advertisement
Tags :

.