For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘एनजीओ’ जेव्हा मर्यादा ओलांडतात...

06:42 AM May 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
‘एनजीओ’ जेव्हा मर्यादा ओलांडतात
Advertisement

एनजीओ’ या स्वयंसेवी संस्था असून शासकीय नियंत्रणाच्या बाहेर असल्या कारणाने त्यांना बिगरसरकारी संस्था देखील म्हटले जाते. या बिगरसरकारी संस्थांची वेगवेगळी उदाहरणे तसेच वेगवेगळ्या व्याख्या आपणास अभ्यासता येतात. त्यातील एक महत्त्वाची व्याख्या ही जागतिक बँकेने केली असून, त्या अंतर्गत ‘गरिबांच्या हितसंबंधांना प्रोत्साहन देणे तसेच त्यांच्या अडचणी कमी करण्यासाठी मदत करणे, पर्यावरणाचे संरक्षण करून सामाजिक सेवा किंवा समुदाय विकासाचे कार्य हाती घेणे इत्यादी कामे बिगरसरकारी संस्थांतर्गत येतात. एनजीओ या लोकशाही आणि सर्वांसाठी खुल्या असणाऱ्या संस्थांच्या तत्त्वांवर काम करीत असतात. यामध्ये बहुतांशवेळा सर्वांना प्रवेश खुला असतो. सैद्धांतिकदृष्ट्या या संस्था शासकीय मदतीविरहित कार्य करतात तसेच त्यांची तत्त्वे आणि कृती कार्यक्रम हा स्वयं निर्धारित असतो.

Advertisement

गोव्यात काहीजणांनी वैयक्तिक पातळीवर एनजीओ सुरू केलेले आहेत व त्यांनी ‘एनजीओ’ची व्याख्या आपल्याला पाहिजे तशी करून घेतलेली आहे. समाजासाठी कार्य करण्याचे सोडून स्वत:चे हित जपण्याचे काम त्यांच्याकडून होत असल्याचे आढळून येते. गोव्यात ज्या ताजा घटना घडलेल्या आहेत, त्यातून त्याला पुष्टी मिळत आहे.

Advertisement

फातर्पा येथील श्री शांतादुर्गा कुंकळ्ळीकरीण संस्थान समितीची बदनामी केल्याने कथित एनजीओचा पर्दाफाश झाला आहे. श्रेया धारगळकर ही महिला स्वत:ला एनजीओ म्हणते मात्र गेल्या काही दिवसांपासून तिने फेसबुकच्या माध्यमांतून जे व्हिडीओ व्हायरल केले आहेत, त्यातून ती स्वत: अडचणीत आली आहे. फातर्पा येथील श्री शांतादुर्गा कुंकळ्ळीकरीण संस्थान समितीची बदनामी तसेच शिरगांव येथील श्री लईराई देवीच्या धोंडगणांबद्दल अपशब्द वापरल्याने सध्या कथित एनजीओ श्रेया धारगळकरच्या अडचणी वाढलेल्या आहेत.

स्वत: एनजीओ स्थापन करणे आणि सामाजिक प्रश्न बाजूला ठेवून धार्मिक भावना दुखावल्यास काय होऊ शकते, हे वरील दोन घटनांतून स्पष्ट झाले आहे. जेव्हा धार्मिकतेचा प्रश्न येतो, तेव्हा तो सहसा कुणीच सहन करत नाही. त्याला सडेतोड उत्तर दिले जाते, हे फातर्पा येथील श्री शांतादुर्गा कुंकळ्ळीकरीण देवस्थान व शिरगांव येथील श्री लईराई देवीच्या धोंड प्रकरणातून स्पष्ट झाले आहे.

फातर्पा येथील घटनेच्या काही दिवस अगोदर श्रेया धारगळकर हिने उत्तर गोव्यात बेकायदेशीर घरे पाडली जात असताना, त्या ठिकाणी जाऊन कारवाईस आक्षेप घेतला होता. त्यावेळी पोलिसांनी तिला ताब्यात घेतले होते. नंतर उत्तर गोव्यातील एका पोलीस स्थानकावर भेट देऊन तेथील पोलिसांना अपशब्द वापरले होते. त्यावेळी पोलिसांनी आपला संयम राखला होता मात्र फातर्पा व शिरगांव प्रकरणाने तिच्या कथित एनजीओचा पर्दाफाश झाला.

गोव्यात वैयक्तिक पातळीवर कथित एनजीओ स्थापन करण्यात पुरुषांच्या तुलनेत महिलाच आघाडीवर असल्याचे आढळते. या कथित एनजीओचे सामाजिक कार्य हे नगण्य तर खासगी विषय जास्त असल्याचे अनेकदा स्पष्ट झाले आहे. या महिला सर्रासपणे सोशल मीडियाचा वापर करून वैयक्तिक पातळीवर इतरांची बदनामी करताना आढळून येतात.

समाजात जर एखादी वाईट घटना घडत असेल तर त्यावर निर्णय घेण्यासाठी पोलीस यंत्रणा तसेच न्यायव्यवस्था आहे. जर पोलीस यंत्रणा योग्य कारवाई करीत नसेल तर न्यायव्यवस्था त्यावर निर्णय घेऊ शकते. असे असतानाही बऱ्याचवेळा एनजीओ स्वत: नाक खुपसून इतरांची बदनामी करताना आढळतात. मुळात त्यांना तसा कोणताच अधिकार नाही.

गेल्या काही दिवसांमागे पणजीत आझाद मैदानावर एका कथित महिला एनजीओची ‘तृतीयपंथी’ने बरीच धुलाई केली होती. हा व्हिडीओदेखील प्रचंड व्हायरल झाला होता. तृतीय पंथीयांची सोशल मीडियावर बदनामी केली जाते तसेच पोलिसांत खोट्या तक्रारी नोंद केल्या जात असल्याचा दावा, मारहाण प्रकरणात गुंतलेल्या तृतीयपंथीने त्यावेळी केला होता.

गोव्यात काम करणाऱ्या एनजीओ कशा असायला हव्यात?, काम करण्याच्या अटी व नियम काय असावेत याबाबत सांगून एनजीओ समाजाची छळवणूक करून दमदाटी करून समाजाचे शोषण करीत असल्याने आपण विधानसभेत आवाज उठवणार असल्याचे भाजपचे मये मतदारसंघांचे आमदार प्रेमेंद्र शेट यांनी सांगत संभाव्य परिस्थितीची कल्पना आणून दिलेली आहे.

दक्षिण गोव्यातील काही एनजीओ सामाजिक प्रश्न हाताळतात. खास करून पर्यावरण प्रश्नावर ते जागरुक आहेत. जर एखादा प्रकल्प हानीकारक ठरत असेल तर त्यावर आवाज उठवितानाच, त्या प्रकल्पाची सखोल माहिती लोकांपर्यंत नेतात. त्याचबरोबर न्याय मिळविण्यासाठी न्यायव्यवस्थेचा आधार घेतात. अशा एनजीओंना सरकारची नाराजी पत्करावी लागते. अशा एनजीओंना विदेशातून फंडिंग होत असल्याचा आरोपही यापूर्वी झालेलाआहे.

मडगाव शहरातील ‘बायलांचो एकवोट’ हा आवदा व्हियेगस यांनी स्थापन केलेला एनजीओ खास महिला वर्गासाठी काम करतो. महिलांवरील अत्याचार, गुन्हेगारी यावर त्यांनी सातत्याने पोटतिडकीने आवाज उठविला आहे. सरकारला अनेकदा चांगल्या सूचना केलेल्या आहेत. एनजीओंचे कार्य कसे असावे, हे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे.

गोव्यातील कथित एनजीओ यापुढे लोकांच्या रडारवर राहणार आहेत. जर कथित एनजीओंनी सोशल मीडियावरून बदनामी केली तर त्यांना जबर किंमत मोजावी लागणार, हे जवळपास स्पष्ट झालेले आहे. सोशल मीडियावरून बदनामी होत असताना अनेकांनी आपला तोल व संयम ढासळू दिला नव्हता पण यापुढे एनजीओंनी आपल्या मर्यादा ओलांडल्या तर त्यांना माफ केले जाणार नाही, हे या घटनांतून स्पष्ट झालेले आहे. लोक आक्रमक भूमिका घेतील, हे ताज्या घटनांवरून स्पष्ट झालेले आहे.

महेश कोनेकर

Advertisement
Tags :

.