For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ब्रह्मपदाची प्राप्ती

06:30 AM Jul 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
ब्रह्मपदाची प्राप्ती
Advertisement

अध्याय दुसरा

Advertisement

बाप्पा म्हणाले, माणसाने कर्तव्यपालन करून स्वस्थ रहावं. म्हणजे तो परमपदी पोहोचतो. जे ज्ञानी आहेत त्यांनी संसाराच्या महाचक्रावर आक्रमण करून ते भेदून टाकावं. ह्यात मुख्य अडथळा मनुष्य घेत असलेल्या उपभोगांचा असतो. जो, विषयोपभोगातून मिळणाऱ्या आनंदात रममाण होईल त्याला आत्मोद्धाराची फिकीर नसल्याने तो अधम म्हणजे तिरस्कार करण्यायोग्य समजावा. माणसाने आत्मोद्धार होण्यासाठी कर्म केल्यावर फळाची अपेक्षा न करण्यातच शांती व समाधान दडलेलं आहे हे ओळखावं. हे ज्याला पटलंय तो कधीही बाह्य वस्तूत सुखसमाधान शोधत नाही. कारण त्याला माहित असतं की बाह्य वस्तूतून मिळालेला आनंद तात्पुरता असतो. वस्तूतील नाविन्य ओसरलं की त्यातून मिळणारा आनंदही ओसरतो. अशा पद्धतीने मिळणाऱ्या तात्पुरत्या आनंदाची ज्ञानी माणसाला अपूर्वाई वाटत नसते. त्यामुळे त्याला बाह्य वस्तुंचं आकर्षण नसतं. त्या वस्तू असतील तर ठीक आणि नसल्या तरी चालतील अशी त्याची मनोवृत्ती असते. कसलाही मोह वाटत नसल्याने त्याला त्याच्या आत्मस्वरुपाची आठवण कायम असते आणि तो त्यात रममाण होऊन राहतो. अशा माणसाला जीवनात आणखीन काही मिळवायचं असं राहिलेलंच नसतं, असं बाप्पा पुढील श्लोकात सांगत आहेत.

कार्याकार्यकृतीनां स नैवाप्नोति शुभाशुभे ।

Advertisement

किंचिदस्य न साध्यं स्यात्सर्वजन्तुषु सर्वदा ।। 18।।

अर्थ-कर्तव्य अथवा अकर्तव्य अशा कर्मांचे त्याला शुभ अथवा अशुभ फल मिळत नाही. त्याला साधावयाची अशी कोणतीही गोष्ट राहिलेली नसते. विवरण-आपल्या वाट्याला आलेलं कर्म हे ईश्वराचं आहे आणि त्यानं ते आपल्यावर सोपवलंय. ते करून त्याला अर्पण करण्यातच आपलं भलं आहे हे ज्यानं जाणलंय व त्यानुसार जो वागतोय, त्याला ते कर्म करण्यापासून कोणतंच शुभ वा अशुभ फळ मिळत नाही. अशुभ फळ मिळत नाही हे ठीक पण शुभ फळ पण मिळत नाही मग कर्म करून काय उपयोग असं वाटलं तर हे लक्षात घ्यायला पाहिजे की, कर्माचं फळ स्वीकारलं मग ते भले शुभ का असेना, त्याचा उपभोग घेण्यासाठी पुन्हा जन्म घ्यावाच लागतो. हे टाळण्यासाठी केलेलं कर्म ईश्वराला अर्पण करून फळाच्या बंधनातून सुटका करून घेण्यातच माणसाचं भलं आहे. ईश्वराने दिलेलं कर्म करून ते त्याला अर्पण करण्यात धन्यता मानणाऱ्या मनुष्याला स्वत:साठी काही मिळवावे असे वाटत नाही. त्याला येथील सर्व वस्तू मिथ्या वाटत असतात. मिथ्या म्हणजे जरी त्या समोर दिसत असल्या तरी त्या कायम टिकणाऱ्या नसल्याने त्याला त्या निरर्थक वाटत असतात. तसेच त्याला ह्याचीही खात्री असते की बाप्पांनी सांगितल्याप्रमाणे कर्मयोगाचे आचरण करून त्याला शाश्वत अशा ब्रह्मपदाची प्राप्ती होणार आहे मग निरर्थक असलेल्या गोष्टी त्याला रस न वाटणे साहजिकच आहे. जो सर्वोच्च पद मिळवणार आहे त्याला लौकिक गोष्टी मिळवण्यात काय आनंद मिळणार? बाप्पाही असंच कार्य करत असतात. त्यांनाही स्वत:साठी काहीही मिळवायचे नसते तरीही ते धर्माच्या पुनर्स्थापनेसाठी आणि साधूंच्या रक्षणासाठी अवतार घेऊन ते कार्य करत असतात. तेव्हा अशा पद्धतीने कार्य करत करत तो मनुष्य केलेलं कर्म तर ईश्वराला अर्पण करतोच आणि त्याचबरोबर त्या कर्माच्या फळाचाही त्याग करतो. संन्यास संन्यास म्हणायचा तो हाच. थोडक्यात कर्मयोगाचे आचरण करत करत मनुष्य संन्यासी कधी होतो हे त्याचे त्यालासुद्धा कळत नाही. बाप्पांनी सांगितलेला हा कर्मयोगाचा मार्ग साधकाला फार आवडतो. कोणत्याही फळाची अपेक्षा नसल्याने त्याला कर्म करायला सुरवात केल्यापासूनच आनंद मिळायला सुरवात होते. कर्म करत असतानाही तो आनंदात असतो.

Advertisement
Tags :

.