सीबीटी बसस्थानक उद्घाटनाचा मुहूर्त कधी?
काम पूर्णत्वाकडे : हस्तांतर आवश्यक, सेवेत दाखल करण्याची मागणी, तब्बल 31 कोटींच्या निधीतून दोन्ही बसस्थानकांचा विकास
बेळगाव : स्मार्ट सिटी अंतर्गत उभारण्यात येत असलेल्या सीबीटी बसस्थानकाचे काम पूर्णत्वाकडे आले आहे. त्यामुळे बसस्थानकाच्या उद्घाटनाला मुहूर्त कधी मिळणार, असा प्रश्नही प्रवाशांना पडला आहे. तब्बल सहा वर्षे चाललेल्या बसस्थानकाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे बसस्थानक प्रवाशांच्या सेवेत दाखल करावे, अशी मागणी होत आहे. मध्यवर्ती आणि सीबीटी बसस्थानक हटवून त्या ठिकाणी नवीन सुसज्ज बसस्थानक उभारण्यात आले आहे. मागील भाजप सरकारच्या काळात मध्यवर्ती बसस्थानकाचे उद्घाटन झाले आणि प्रवाशांच्या सेवेत दाखल झाले. मात्र सीबीटी बसस्थानकाचे काम रेंगाळले होते. आता हे काम पूर्णत्वाकडे गेले आहे. त्यामुळे हे बसस्थानकही प्रवाशांच्या सेवेत दाखल व्हावे, अशी मागणी होत आहे. तब्बल 31 कोटींच्या निधीतून या दोन्ही बसस्थानकांचा विकास साधण्यात आला आहे. सीबीटी बसस्थानक सेवेत दाखल झाल्यानंतर मध्यवर्ती बसस्थानकावरील प्रवाशांचा काहीचा ताण कमी होणार आहे.
विशेषत: शहरी भागातील बसेससाठी या ठिकाणी फलाट उभारले जाणार आहेत. 2018 मध्ये जुने बसस्थानक हटवून या ठिकाणी नवीन बसस्थानकाच्या कामाला प्रारंभ झाला होता. याबाबत अपूर्वा कन्स्ट्रक्शनला कामाचा ठेका देण्यात आला होता. मात्र मध्यंतरी कोरोना आणि इतर कारणांमुळे काम बराच काळ रखडले होते. मात्र त्यानंतर काम पूर्ववत करून पूर्णत्वाकडे आणण्यात आले आहे. सीबीटी बसस्थानकासाठी बहुमजली इमारत उभारण्यात आली आहे. विशेषत: यातील तळघरामध्ये पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याबरोबर पहिल्या मजल्यावर कार्यालयीन व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच फरशी, सजावट, इलेक्ट्रॉनिक इतर कामेही हाती घेण्यात आली आहेत. त्यामुळे लवकरच बसस्थानक प्रवाशांसाठी सज्ज होईल, अशी माहितीही स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
बसस्थानक परिसरातील 32 गुंठे जागाही कॅन्टोन्मेंट हद्दीत येते. दरम्यान, सुरुवातीच्या काळात कॅन्टोन्मेंटने याबाबत आक्षेप घेतला होता. त्यामुळे काही काळ कामात अडथळा निर्माण झाला होता. मात्र त्यानंतर तोडगा काढून कामाला पूर्ववत चालना देण्यात आली होती. बेळगाव बसस्थानकाला कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्याची हद्द लागून असल्याने आंतरराज्य प्रवाशांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे बसस्थानक दररोज हजारो प्रवाशांनी गजबजलेले असते. विशेषत: राज्यात सर्वाधिक महसूल हा बेळगाव विभागातून उपलब्ध होतो. त्यामुळे बेळगावचे बसस्थानक हे सुसज्ज असणे आवश्यक आहे. शहर बसेससाठी उभारण्यात आलेल्या सीबीटी बसस्थानकात कार्यालये, यात्री निवास, शौचालय, पाणी, फलाट, तिकीट काऊंटर, बसपास काऊंटर आदी सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. शहरातील बसेसवर नियंत्रण ठेवण्यासाठी शहर बस नियंत्रण कक्षही उभारण्यात आला आहे. त्यामुळे या सुसज्ज बसस्थानकाची प्रवाशांना प्रतीक्षा लागली आहे. सीबीटी बसस्थानकाचे उद्घाटन करून प्रवाशांच्या सेवेत उपलब्ध करून द्यावे. त्यामुळे मध्यवर्ती बसस्थानकातील प्रवाशांचा ताण कमी होणार आहे. शिवाय शहर बस वाहतुकीलाही शिस्त लागण्यास मदत होणार आहे. सध्या एकाच ठिकाणी शहर, ग्रामीण व लांब पल्ल्याच्या बसेस थांबविल्या जात आहेत. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. यासाठी सीबीटी बसस्थानक तातडीने प्रवाशांच्या सेवेत दाखल करावे, अशी मागणीही शहर प्रवाशांनी केली आहे.
लवकरच बसस्थानक परिवहनकडे हस्तांतरित
सीबीटी बसस्थानकाचे काम पूर्णत्वाकडे आले आहे.लवकरच बसस्थानक परिवहनकडे हस्तांतरित केले जाणार आहे. त्यानंतर उद्घाटन करून प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल. सध्या शेवटच्या टप्प्यातील किरकोळ कामे हाती घेण्यात आली आहेत.
- सईदाबानू बळ्ळारी (स्मार्ट सिटी एमडी)