विवाहितेची अरगन तलावात मुलासह आत्महत्या
कलखांबमधील महिलेने सासरच्या जाचाला कंटाळून उचलले पाऊल : सासरच्यांविरुद्ध तक्रार दाखल
बेळगाव : कलखांब, ता. बेळगाव येथील एक विवाहिता व तिच्या 12 वर्षीय मुलाचा मृतदेह अरगन तलावात आढळून आला आहे. सासरच्या जाचाला कंटाळून तिने आपले जीवन संपविले आहे. ऐन दिवाळीत शनिवारी 2 नोव्हेंबर रोजी ही घटना घडली असून मायलेकाच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी कॅम्प पोलीस स्थानकात तिघा जणांवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. कॅम्पचे प्रभारी पोलीस निरीक्षक परशुराम पुजेरी, उपनिरीक्षक ए. रुक्मिणी आदी अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. अरगन तलावात मृतदेह आढळून आलेले मायलेक तीन दिवसांपासून बेपत्ता होते.
कविता बसवंत जुनेबेळगावकर (वय 36), तिचा मुलगा समर्थ (वय 12) दोघेही रा. कलखांब अशी त्यांची नावे आहेत. कविताचे वडील मनोहर धाकलू डुकरे (वय 75) रा. सरस्वती गल्ली, किणये यांनी कॅम्प पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. पती बसवंत निंगाप्पा जुनेबेळगावकर, सासरे निंगाप्पा जुनेबेळगावकर, सासू जनाबाई निंगाप्पा जुनेबेळगावकर यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 2015 पासून बसवंतला दारुचे व्यसन जडले होते. तुला शेण काढता येत नाही, दूध काढता येत नाही, स्वयंपाक करता येत नाही, शेतातील कामे येत नाहीत, असे सांगत पतीसह सासरच्या मंडळींकडून रोज मानसिक व शारीरिक जाच देण्यात येत होता. कामे जमत नाहीत तर कोठे तरी जाऊन जीवन संपवा, अशी शिवी दिल्याने 30 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7.15 पासून कविता व समर्थ दोघे बेपत्ता झाले होते. शनिवार दि. 2 नोव्हेंबर रोजी सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास हिंडलगा गणेश मंदिराजवळील अरगन तलावात मायलेकरांचा मृतदेह आढळून आला. पोलीस व लष्करी अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. एचईआरएफचे बसवराज हिरेमठ, सामाजिक कार्यकर्ते संतोष दरेकर, अवधूत तुडवेकर आदींनीही आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले. उत्तरीय तपासणीनंतर ते नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.