For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नाते मुरते तेव्हा...

06:28 AM Jul 16, 2025 IST | Tarun Bharat Portal
नाते मुरते तेव्हा
Advertisement

एका विवाह सोहळ्याला अगदी आग्रहाचे आमंत्रण होते. हा सोहळा ज्या ठिकाणी होणार होता ते ठिकाण फारच दूर असल्याने आदल्या दिवशी तिथे जाणे अपरिहार्य होते. अतिशय सुंदर सजावट, अलिशान हॉल, येणाऱ्या प्रत्येकाचे फुलांनी स्वागत असा काहीसा शाही थाट होता. वधू-वरांकडील मंडळींची लगबग सुरू होती.

Advertisement

हॉलमधील वातावरण अगदी सुरेख होते. मोगऱ्याच्या फुलांचे डेकोरेशन, जाई जुईच्या गजऱ्यांचा सुगंध मन प्रफुल्लित करत होता. वेगवेगळी माणसे, त्यांच्या देहबोली, पेहेराव, संवाद साधायच्या पद्धती यातील वेगळेपण अनुभवायला मिळत होते. परंतु त्यातही माझे लक्ष एका पंचाहत्तरी ओलांडलेल्या दांपत्याकडे जात होतं. त्यांचा केवळ देहबोलीतून चाललेला संवाद परिपक्व मुरलेल्या नात्याची साक्ष देत होता. जेवणापूर्वी आजींनी आजोबांच्या हातात गोळ्या आणून ठेवल्या. काहीही न बोलता त्या गोळ्या घेत केवळ भुवया उंचावून तुझ्या गोळ्या घेतल्या का? असे आजोबांनी नजरेतूनच विचारले. आजीनेही काहीही न बोलता होकारार्थी मान हलवत नजरेतूनच हो घेतल्या. किती काळजी कराल? असे देहबोलीतूनच उत्तर दिले. आजोबाही अगदी मायेने हसले. त्यांची ही केमिस्ट्री विलक्षण होती. मुरलेल्या लोणच्यासारखी नात्याची चव लज्जतदार करणारी होती. परस्परांमधल्या खऱ्या अर्थाने सहजतेने मिसळून जाणाऱ्या जोडीदारांचे सूर आतून जुळून येणे हे काय असते ते अनुभवायला मिळत होते. संध्याकाळी सगळ्यांच्या गप्पाटप्पा सुरु होत्या. आजोबा एकदम शाल घेऊन आले आणि आजी पुढे धरत म्हणाले, ‘ही घे शाल. आता हा एसी सोसायचा नाही तुला! नंतर सर्दी, कफ होण्यापेक्षा अगोदरच काळजी घेतलेली बरी नाही का?’ नातवंडांनी लगेच संवादाचा हा धागा पकडत आजी आजोबांची थट्टाही केली. अरे बाबांनो, तुमच्या या थ्रील सीकींगच्या जमान्यात हे नातं तुम्हाला समजणं कठीणच.. असं म्हणत आजोबा मिश्किल हसले.

रात्री गाण्याच्या मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते. मध्यंतरामध्ये साऱ्या नातवंडांनी मिळून लग्नाला पन्नास वर्षे झालेल्या या दाम्पत्यांचा ‘आयडियल कपल’ म्हणून सत्कार केला. आजोबांनी आभार मानण्यासाठी माईक हातात घेतला आणि साऱ्यांचे ऋण व्यक्त करत आजच्या काळातील मानसिकता, नाते टिकवण्यासाठी घ्यावे लागणारे परिश्रम, नात्याचे महत्त्व या साऱ्यावर भाष्य करत शुगरकोट टॅब्लेट नातवंडांना आणि उपस्थितांनाही दिल्या. खरोखरच आजी-आजोबांचा सहजीवनाचा प्रवास खूप काही शिकवणारा होता. आताच्या काळातील विवाह संस्थेचे बदलते रूप, काही ठराविक केसेस वगळता क्षुल्लक कारणावरून जोडप्यांमध्ये होणारे मतभेद आणि वैवाहिक नाते तुटेपर्यंत त्याचा होणारा प्रवास हे चित्र सर्रास पाहायला मिळते. तर काही केसेसमध्ये केवळ एकाच्या त्यागावर टिकलेले नातेही पाहायला मिळते. खरंतर विवाहाच्या बाबतीत प्रसिद्ध ब्रिटिश नाटककार जॉर्ज बर्नार्ड शॉ यांचे उद्गार आठवतात  "Like fingerprients,all marriages are different"

Advertisement

जसे प्रत्येकाच्या बोटाचे ठसे निराळे तसेच प्रत्येक वैवाहिक नाते पूर्णपणे वेगळे असते. हे खरेही आहे.

वैवाहिक नाते वेगळेच असते. तू आणि मी चे आपण कधी होणार? अथवा हे जोडलेले नाते नेमका कसा रंग धारण करणार? ते सुदृढ असणार का? हे सारे त्या जोडप्यावर अवलंबून असते. अरेंज मॅरेज असो वा लव मॅरेज वैवाहिक नात्यांमध्ये हमखास यश मिळेल याचे कोणतेच रेडिमेड फॉर्म्युले उपलब्ध नाहीत. हे नाते जोपासायची इच्छा, नात्यातील कमिटमेंट, समजूतदारपणा, नात्यातील भावनिक इन्व्हेस्टमेंट आणि यासाठी आवश्यक ते बदल करण्याची तयारी या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. अगदी व्यवहारिक भाषेत सांगायचे झाले तर आपण विचारपूर्वक थोडी थोडी गुंतवणूक करत अॅसेट निर्माण करतो.

तसेच भक्कम भावनात्मक आधारासाठी नात्यातील आनंद-समाधान यांची अॅसेट निर्माण करण्यासाठी नात्यातील भावनिक इन्व्हेस्टमेंट आणि या अनुषंगाने येणाऱ्या इतर गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. त्यातूनच ‘गिव्ह आणि टेक’चे गणित आकार घेते. ‘पेराल तेच उगवते’ हा नियम इथेही लागू होतो. वैवाहिक नात्यासंदर्भात बोलायचे झाले तर हे नाते रक्ताचे नसतेच परंतु तरीही या जोडलेल्या नात्याचे रंग गहिरे होत जातात. एका ठराविक टप्प्यानंतर एकमेकांशिवाय जगण्याची कल्पनाही असह्य होते. पण या साऱ्या प्रवासासाठी संयम, समजून घेणे, एकमेकांना बदलासाठी पुरेसा वेळ देणे या गोष्टीही आवश्यक आहेत.

खरे तर विवाहाची सुरुवातीची काही वर्षे एकमेकांना समजून घेण्यात, एकमेकांच्या स्वभावाची पुरेसा परिचय होण्यास जातात. नंतरच्या टप्प्यात खऱ्या अर्थाने संसाराचा अर्थ समजायला लागतो. एकमेकांना गुणदोषासकट स्वीकारण्याचे तंत्र गवसू लागते. मुरलेल्या लोणच्यासारखी परिपक्व नात्याची ही आंबटगोड चव जीवनात लज्जत आणते. सहजीवनाचा प्रवास खऱ्या अर्थी आनंदयात्रा बनण्यासाठी ऊग्स, Time, Share,Care,Love,Understanding या साऱ्यांचा सुवर्णमध्य साधण्याचा प्रयत्न दोन्ही बाजूने केला जायला हवा. ‘इगो नावाच्या विषाणूची बाधा’ नातं पोखरून टाकते. त्याला प्रयत्नपूर्वक दूर कसे ठेवता येईल याचा विचार पती-पत्नी दोघांनीही करणे गरजेचे आहे. दोन व्यक्ती वेगळ्या आहेत म्हटल्यानंतर मतमतांतरे असणारच, असावीतही परंतु यातून निर्माण होणारे मतभेद, भांडणे, रुसवे फुगवे हे सगळे फार काळ नसावेत. एकमेकांना समजून घेत पुढे जाता यायला हवे. जोडीदाराला महत्त्व देणारी आणि एक व्यक्ती म्हणून त्याच्यात असलेल्या इच्छा, आवडीनिवडी, वैयक्तिक गरजा समजून घेऊन वाटचाल करणारी जोडपी ‘सुदृढ नात्याच्या’ दिशेने सहजीवनाचा प्रवास करतात. आजच्या काळामध्ये जोडप्यांनी नात्याच्या जोपासनेचा मन:पूर्वक प्रयत्न केला तर सुरुवातीच्या त्या दांपत्यासारखा सहजीवनाचा प्रवास कधी हलकाफुलका, कधी गंभीर, कधी काळजी घेणारा, कधी हक्क गाजवणारा, हक्क गाजवण्याची मुभा देणारा, न बोलताच बरेच काही उलगडून सप्तरंगांची उधळण करणारा, जीवनाची चव लज्जतदार करणारा होऊ शकतो हे मात्र खरे!!

अॅड. सुमेधा संजीव देसाई

Advertisement
Tags :

.