व्हॉट्सअॅपमध्ये 19 भाषांमध्ये चॅटची सुविधा
रिअल-टाइम मेसेज ट्रान्सलेट फिचर लाँच
नवी दिल्ली : मेटाने इन्स्टंट मेसेजिंग अॅपमध्ये रिअल-टाइम मेसेज ट्रान्सलेशन फीचर आणल्यामुळे आता तुम्ही व्हॉटसअॅपवर वेगवेगळ्या भाषांमधील लोकांशी चॅट करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. या फीचरसह, वैयक्तिक चॅट, ग्रुप किंवा चॅनेल अपडेटमधील मेसेज तुमच्या स्वत:च्या भाषेत त्वरित भाषांतरित करण्याची सोय होणार आहे. कंपनीने ब्लॉग पोस्टमध्ये ही माहिती दिली आहे. सुरुवातीला ही सुविधा अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी इंग्रजी, हिंदी, स्पॅनिश, पोर्तुगीज, रशियन आणि अरबी अशा 6 भाषांमध्ये उपलब्ध आहे. त्याच वेळी, आयओएस वापरकर्ते 19 भाषांमध्ये भाषांतर करू शकतील. अँड्रॉइड वापरकर्ते संपूर्ण चॅट थ्रेडसाठी ऑटोमॅटिक ट्रान्सलेशन चालू करू शकतात. हे त्या चॅटमध्ये येणारे सर्व मेसेज आपोआप ट्रान्सलेट करेल. हे फीचर भारतासारख्या बहुभाषिक देशात गेम-चेंजर ठरू शकते, जिथे हिंदी, तमिळ, तेलुगू सारख्या प्रादेशिक भाषा लोकप्रिय आहेत.