For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सतेज पाटील यांचे पुढे काय ?

11:16 AM Jan 14, 2025 IST | Radhika Patil
सतेज पाटील यांचे पुढे काय
Advertisement

कोल्हापूर / संतोष पाटील : 

Advertisement

गेल्या दहा-बारा वर्षात जिह्याच्या राजकारणात विधानसभा, लोकसभा, गोकुळ, जिल्हा परिषद, जिल्हा बँक आदी सलग विजयामुळे ‘आमचं ठरलंय’ तेच करुन दाखवणाऱ्या आमदार सतेज पाटील यांच्या राजकारणाचा बॅड-पॅच विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सुरू झाला. विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पर्यायाने महाविकास आघाडीचे पानिपत झाल्याने प्रत्येक तालुक्यातील सतेज पाटील यांचा तगडा विरोधक तयार झाला आहे. या पार्श्वभूमीवर सतेज पाटील राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होणार? भाजप किंवा राष्ट्रवादी अजित पवार गटात जाणार? काही नसेल तर सतेज पाटील यांचे पुढे काय? असा प्रश्न राजकीय उत्सुकतेचा बनला आहे.

2014 चा अनुभव पाहता ते जोरदार कमबॅक करतील, अशी आशा त्यांच्या समर्थकांना आहे. आगामी महापालिका-जिल्हा परिषद आणि त्यांनतरची गोकुळ-जिल्हा बँकेची निवडणूक सतेज पाटील यांची राजकीय दिशा ठरवणारी असेल. तूर्तास दोन पावले मागे आलेले सतेज पाटील पुन्हा झेप घेणार की नवी राजकीय सोयरीक करणार, हे पाहणे उत्सुकतेचं ठरणार आहे.

Advertisement

अतिसुक्ष्म नियोजन आणि राजकीय जोडण्या करत निवडणूक एका दिशेला नेण्यात सतेज पाटील यांचा हातखंडा मानला जातो. जिह्याच्या राजकारणात आमचं ठरलंय हे ब्रीद रुजवण्यात गेल्या 10 वर्षात सतेज पाटील यांना कमालीचे यश आले होते. महाडिक विरोधकांची मोट बांधत महापालिका, जिल्हा परिषद, गोकुळ दूध संघात सतेज पाटील यांनी सत्तांतर घडवले. 2019 च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत अमल महाडिक आणि धनंजय महाडिक यांच्या पराभवाचे निमित्त सतेज पाटील ठरले होते. प्रा. संजय मंडलिक यांच्या 2019 च्या विजयात त्यांचा सिंहाचा वाटा होता. महाविकास आघाडीचे ते राज्यातील प्रमुख नेते तर जिह्याचे कॅप्टन होते.

तीन महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीपर्यंत जिह्याच्या राजकारणाची हवा सतेज पाटील यांच्या बाजूने वाहत होती. लोकसभा निवडणुकीत श्रीमंत शाहू छत्रपती यांच्या विजयाने त्यावर शिक्कामोर्तब केले होते. मात्र नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीने संपूर्ण राजकारणानेच कूस बदलली. राज्यात महाविकास आघाडीचा आणि जिह्यात काँग्रेसचा गड पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. या एका निकालाने राजकारणाचे होत्याचे नव्हते झाले. निकालापूर्वी जिह्याचे एकमुखी नेतृत्व म्हणजे सतेज पाटील ही अटकळ असतानाच सतेज पाटील जिह्याच्या राजकारणाच्या एका कोपऱ्यात गेले. आता मात्र सतेज पाटील यांचे पुढे काय? या प्रश्नांची कुजबूज सुरू झाली.

काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी त्यांच्या नावाची जोरदार चर्चा आजही सुरू आहे. परंतु काँग्रेसच्या ‘थंडा करके खावो’ धोरणाप्रमाणे तेही भिजत घोंगडे पडले. राज्यातील इतर पक्षांतील दमदार नेत्यांप्रमाणेच सतेज पाटील यांना 2019 पासून 2023 च्या मध्यापर्यंत भाजपकडून जोरदार ऑफर्स होत्या. भाजपमध्ये त्याचे राजकीय प्रतिस्पर्धी महाडिक स्थिरावल्याने तसेच काँग्रेसला अच्छे दिन येणार असल्याची अटकळ असल्याने त्यांनी कानाडोळा केल्याची चर्चा आहे. आता नैसर्गिक न्यायाने राजकीय अस्तित्वासाठी इतर नेत्यांप्रमाणे सतेज पाटील यांना भाजप किंवा सत्तेच्या वळचणीची गरज असणार आहे. भाजपची ती ऑफर पुन्हा असेल, याबाबत साशंकता आहे किंवा सतेज पाटील अजूनही काँग्रेससोबतच राहण्यावर ठाम असतील. सतेज पाटील महायुतीचे घटक म्हणून अजित पवार यांच्यासोबत जातील, अशीही चर्चा आहे. मात्र जिह्याच्या राजकारणात मंत्री हसन मुश्रीफ राष्ट्रवादीचे कॅप्टन असल्याने येथेही त्यांना पॉलिटीकल स्पेस नाही. यापैकी खरं-खोटं काहीही असले तरी त्यांच्या पक्षबदलाच्या चर्चा आणि अफवांचे पीक अजूनही बहरलेले आहे.

  • कार्यशैलीत बदल आवश्यक

विरोधकांना गाफील ठेवून आपली राजकीय चाल खेळणे, मतदारांना भविष्याचा वेध देत आपलेसे करण्यात सतेज पाटील यांचा हातखंडा आहे. निवडणुका कशा जिंकायच्या, हा सतेज पाटील यांचा युएसपी मानला जातो. मात्र, धक्कादायकपणे उमेदवारी निवड आणि तो उमेदवार कार्यकर्त्यांसह मतदारांवर ते लादत असल्याचा त्यांच्यावर आरोप होतो. निवडून येणारा आपला समर्थक पदावर जाताना आणि पायउतार होताना शुन्य असावा, ही भावना असल्याची मानले जाते.

  • केंद्रस्थ भूमिकेत..!

दोन लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीप्रमाणेच सतेज पाटील हे यावेळीही आगामी निवडणुकांत खमक्या विरोधक म्हणून केंद्रस्थ भूमिकेत असतील. महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकांच्या माध्यमातून पॉलिटीकल कमबॅक करण्याचे कडवे आव्हान त्यांच्यापुढे आहे. या विजयावरच त्यांची आमदारकीची मदार टिकून असेल. आतापर्यंत काँग्रेस-शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची एकहाती मोट त्यांनी बांधली होती. विधानसभा निवडणुकीतील पराभवाने शिवसेना स्वतंत्र लढणार आहे. शरद पवार गट अजून कमकुवत झाला आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांत प्रचंड मरगळ आली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपच्या तगड्या ग्राऊंड नेटवर्कला ‘अजिंक्यतारा’चे नेटवर्क तितकेच ताकदीचे उत्तर देण्यास समक्ष असल्याचे दाखवून द्यावे लागणार आहे. मात्र, हे अशक्यप्राय आव्हान सतेज पाटील कसे पेलणार? याची उत्कंठा आहे.

  • विरोधकांवर मात करतील ?

आतापर्यंत सतेज पाटील आणि महाडिक असा जिह्याच्या राजकारणात वाद होता. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार विनय कोरे वगळता सर्वच विजयी उमेदवारांच्या रडारवर सतेज पाटील आहेत. मंत्री प्रकाश आबिटकर, खासदार धनंजय महाडिक, माजी खासदार प्रा. संजय मंडलिक, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार चंद्रदीप नरके, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार अमल महाडीक, माजी आमदार प्रकाश आवाडे आणि राजेश पाटील यांच्या हिटलिस्टवर सतेज पाटील आहेत. याला विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या राजकारणाची किनार आहे. जिल्हा बँकेच्या राजकारणाची अडक असल्याने मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी सतेज पाटील यांचा याराना फक्त संस्थात्मक राजकारणात टिकून आहे. त्यामुळे येत्या काळात मोठा राजकीय संघर्ष सतेज पाटील यांच्या वाट्याला आहे.

Advertisement
Tags :

.