ऐन हिवाळ्यात विक्रमी वीज मागणी
महावितरणची माहिती
महावितणरकडून 25 हजार 808 मेगावॅटचा पुरवठा
कोल्हापूर
थंडीमुळे हिवाळ्यात विजेची मागणी कमी होत असली तरी यंदा शनिवार (11 जानेवारी) रोजी राज्यात 25,808 मेगावॅट इतकी आतापर्यंतच्या विक्रमी विजेची मागणी नोंदविली गेली व महावितरणने यापूर्वीच नियोजन केल्यानुसार कोणतीही अतिरिक्त वीज खरेदी न करता ही मागणी पूर्ण केली, अशी माहिती महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार महावितरणने वाढत्या वीज मागणीनुसार पुरवठ्याचा आराखडा तयार केला आहे. त्यामुळे उच्चांकी मागणीनुसार महावितरणला वीज पुरवठा करता आला. महावितरणकडे मुंबईचा काही भाग वगळता संपूर्ण राज्यातील वीज पुरवठ्याची जबाबदारी आहे. महावितरणकडे शनिवारी 25,808 मेगावॅटची वीज मागणी नोंदविली गेली. हा आतापर्यंतचा उच्चांक आहे. यापूर्वी 7 फेब्रुवारी 2024 रोजी 25,410 मेगावॅट तर 14 एप्रिल 2022 रोजी 25,144 मेगावॅट अशी उच्चांकी वीजमागणी नोंदविली गेली होती. या मोसमात पाऊस चांगला झाला असल्याने कृषी पंपांसाठी विजेची मागणी वाढली असल्याचा अधिकाऱ्यांचा अंदाज आहे.
विजेच्या मागणीचा पॅटर्न लक्षात घेऊन महावितरणच्या संबंधित विभागाने यापूर्वीच वीज खरेदी करार केले होते. त्यानुसार शनिवारची उच्चांकी वीज मागणी पूर्ण करण्यात आली. महानिर्मितीकडून 6996 मेगावॅट, केंद्रीय प्रकल्पांकडून 5252 मेगावॅट तर खासगी प्रकल्पांकडून 5733 मेगावॅट वीज उपलब्ध करण्यात आली. याखेरीज जलविद्युत प्रकल्पांमधून 2009 मेगावॅट, सौर उर्जा प्रकल्पांमधून 3093 मेगावॅट, पवन उर्जा प्रकल्पांमधून 228 मेगावॅट आणि सहविद्युत निर्मिती प्रकल्पांमधून 2498 मेगावॅट वीज उपलब्ध झाली. आगामी उन्हाळ्याच्या हंगामात विजेच्या मागणीत संभाव्य वाढ लक्षात घेऊन महावितरणने ग्राहकांना अखंडीत वीज पुरवठ्यासाठी नियोजन केले आहे.