Satara : पालिकेत जे होईल ते सातारकरांच्या भल्यासाठीच !
दिवाळीच्या पूर्वसंध्येला बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे सुतोवाच
by प्रगती जाधव-पाटील
सातारा : मोठ्या अंतराने येऊ घातलेल्या पालिका निवडणुकांमुळे यंदा दिवाळीचा माहोल रंगतदार आहे. कार्यक्रमांच्या निमित्ताने जाईल तिथे पालिकेचे काय, हा सामान्यांना पडलेला प्रश्न आहेच. पालिकेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निर्णय घेतील. सातारकरांच्या भल्यासाठी त्यांच्याकडून आलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे काम आपण करू, जे होईल ते सर्वोत्तम असेल, याबाबत सातारकरांनी निश्चिंत राहावे, असे मत सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराचे भोसले यांनी व्यक्त केले.
सातारा येथे दिवाळीनिमित्त निवडक पत्रकारांशी मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी त्यांच्या निवासस्थानी रविवारी संवाद साधला. यावेळी साताऱ्यातील विकास, सामान्यांचे प्रश्न, शहर विकासाचा आराखडा, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची दिशा आदी विषयांवर त्यांनी संवाद साधला.
मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, 'साताऱ्याच्या विकासासाठी यंदा बरीच मोठी संधी आहे. राज्यात साताऱ्याचा दबदबा आहे. सत्ताधाऱ्यांच्याही या शहराच्या विकासाबाबत नवनवीन संकल्पना आहेत. या सत्यात उतरवण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. आगामी काही महिने सगळ्यांसाठीच धावपळीचे असणार आहेत. यातून तयार होणारे नेतृत्व जिल्ह्याचे भविष्य ठरवणारे असणार आहे. त्यामुळे या निवडणुकांकडे अधिक गांभीर्याने बघितले जात आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अनेक कारणांनी लांबणीवर पडल्या. या निवडणुकीमध्ये स्वतःचे भवितव्य आजमावण्यासाठी मोठ्या प्रमाणावर चढाओढ आहे. नेत्यांच्या पुढे उमेदवार निवडताना बराच मोठा पेच असणार आहे. अशावेळी काम करणाऱ्याला संधी देण्याची मानसिकता वरिष्ठांची दिसते. वरिष्ठांच्या सूचनेनुसार उमेदवारांची निवड केली जाईल. पण यात काम करणाऱ्यालाच प्राधान्य दिले जाणार असल्याचे सुतोवाच शिवेंद्रसिंहराजे यांनी केले.
आम्हाला नाही इतकी तुम्हालाच घाई !
सातारा पालिका निवडणुकीच्या खुल्या प्रवर्गामुळे यंदा नगराध्यक्षपदासाठी इच्छुकांची भली मोठी यादी नेत्यांच्या समोर येत आहे. प्रत्येक जण आपल्या पद्धतीने शक्तिप्रदर्शन करून या पदासाठी आपण कसे पात्र आहोत, हे दर्शविण्याची एकही संधी सोडत नाही. या पार्श्वभूमीवर पालिका निवडणुकांचे कसे? यावर आपल्या शैलीत शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, 'आम्हाला नाही इतकी घाई तुम्हाला या इलेक्शनची झाली आहे. लोकांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये बऱ्याच अफवा उठत आहेत. पण योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ. या निर्णय प्रक्रियेत कोणावरही अन्याय होणार नाही, याबरोबरच काम करणाऱ्याला न्याय मिळेल अशी भूमिका असेल.'