For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पवार, गांधींचे काय होणार?

06:08 AM Apr 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
पवार  गांधींचे काय होणार
Advertisement

भाजप नेत्या, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काही महिन्यांपूर्वी ‘ए फॉर अमेठी बी फॉर बारामती’ असे म्हटले होते व भाजपाने यंदाची निवडणूक पदरात पाडून घेतानाच राजकारणातील घराणेशाही संपवायची असा चंग बांधल्याचे निदर्शनास आले. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी होय आमची घराणेशाही आहे पण ती कल्याणकारी आहे व त्याचा अभिमान आहे. असा प्रतिवाद केला असला तरी आणीबाणीच्या पूर्वीपासून राजकारणात घराणेशाहीला विरोध होत आला आहे. घराणेशाही संपलेली नाही आणि राजकारण हे धनदांडगे, जातदांडगे यांनाच शक्य उरल्याने सामान्य माणूस चुकूनही तिकडे फिरकत नाही. उलट एखाद्याला बरबाद करायचे तर त्याला निवडणुकीला उभे करायचे किंवा कर्जावर ट्रक खरेदी करायला लावायचा असे विनोदाने म्हटले जाते. महाराष्ट्रात लहानमोठी दोनशे अडीचशे घरे आहेत. राजकारण तेथेच घुटमळते. बाकी त्या नादाला लागत नाहीत. लोकशाहीच्या दृष्टीने हे चांगले नसले तरी ते वास्तव आहे. एकेकाळी पोस्टकार्ड टाकून उमेदवार विजयी होत व आमदार सायकलवरून फिरत. आज नेत्यांना विमान लागते व हॉटेलात रहायचे तर पाच सात लाख रूपयेचा सूट लागतो हे कालचक्र आहे. भाजपाने नेहरू घराणे टार्गेट केले आणि लोकशाहीत कुणाचाही पराभव शक्य आहे हे दिसून आले. आणीबाणीनंतर इंदिरा गांधींचा राजनारायण यांनी पराभव केला होता व गत निवडणुकीत स्मृती इराणी यांनी अमेठीमध्ये राहुल गांधींना आस्मान दाखवले होते. भाजपाची यावेळची घोषणा किंवा टार्गेट हे बारामती आहे. जाणते राजे, वस्तादांचे वस्ताद, ग्रेट मराठा वॉरीयर अशा अनेक बिरूदावली लावून पश्चिम महाराष्ट्रात संधीचे व सत्तेचे राजकारण करणाऱ्या ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार यांना लक्ष करण्याचे हे भाजपा नेतृत्वाने ठरवले आहे. ओघानेच बी फॉर बारामती अशी घोषणा देण्यात आली आहे. सुमारे साठ वर्षे राजकारणात मुरलेला हा नेता त्यांच्या मूळ मतदारसंघात पराभूत करणे तितके सोपे नाही. या गावाचे नाव बारामती असले तरी ते एकमती आणि हुकमती आहे हे दिसून आले आहे. भाजपने वेगवेगळ्या मार्गाने हा मतदारसंघ पोखरला आहे. मतदारांच्या जातीय व्होट बँका राजकारणात सक्रिय आहेत. त्या आपल्याशा केल्या आहेत. पण, हा गड सर करणे भाजपला शक्य झाले नाही पण, यंदा हा प्रयत्न निकटचा होतो आहे आणि त्यासाठीच बी फॉर बारामती अशी घोषणा दिली आहे. भाजपा निवडणूक आली की कामाला लागली असे होत नाही. त्यांच्या समर्पित कार्यकर्ते ध्येय घेऊन सेवाकामातून बांधणी करतात असा खुद्द पवारांचा अनुभव आहे आणि यंदा शरद पवारांचेच हत्यार वापरून त्यांना बारामतीत आस्मान दाखवायचे आणि महाराष्ट्रात शरद पवार व उद्धव ठाकरे यांना धक्का द्यायचा असा बेत भाजपा व महायुतीने ठरवलेला दिसतो. त्यासाठीच पवार घराण्यात फूट पडली आणि सुप्रिया पवार विरूद्ध सुनेत्रा पवार ही लढत लक्षवेधी ठरली आहे. शरद पवारांनी महाराष्ट्रात आपले राजकारण साधताना अनेक घरे फोडली होती. तोच अनुभव त्यांच्या वाट्याला आला असला तरी निवडणूक पूर्व चाचण्यात बारामतीत सुप्रिया सुळे विजयी होणार असा अंदाज व्यक्त झाला आहे. शरद पवार यांची तुतारी प. महाराष्ट्रात वाजणार असे अंदाजात दिसते. तसे झाले तर आश्चर्य वाटणार नाही पण, उलटे झाले तर अजित पवार हिरो होणार हे वेगळे सांगायला नको. वस्ताद शेवटचा डाव काय टाकतात, बघायचे. पावसात ठाकरेंनी भिजून घेतले त्यामुळे यावेळी तसे होणार नाही पण काका मला वाचवा नंतर पुतण्या मागे फिर किंवा वाचव असे होणार का हा प्रश्न आहे. राजकारणात सर्व शक्य असते आजच वार्ता आली आहे. शिखर बँक घोटाळ्यातून अजित पवार, सुनेत्रा पवार यांना क्लिनचिट हे होणारच होते. त्यासाठी राष्ट्रवादी फुटली आता बारामतीत काय होणार हा प्रश्न आहे. शरद पवारांनी जुनी घराणी एकत्र करायला सुरूवात केली. सोलापुरात त्यांनी मोहिते पाटील व सुशिलकुमार शिंदे यांना सोबत घेतले आहे. धनगर समाजाचे नेते उत्तम जानकर यांच्या पाठीवर हात ठेवला आहे. यातून बारामती वाचते का हे बघायचे. पण, भाजपा जसा पवारांच्या मागे लागला आहे तसा राहुल गांधींच्या मागे लागला आहे. गेल्यावेळी काँग्रेसला पन्नास खासदार निवडून आणताना नाकी दम आला होता. अबकी बार पन्नास पार अशी काँग्रेसची थट्टा केली जात असली तर भारत जोडो यात्रेने काँग्रेसला थोडे चांगले मार्क मिळतील असा अंदाज आहे. तथापि राहुल गांधी यांना वायनाडमधून धोबीपछाड द्यायचा असा चंग एनडीएने बांधला आहे. इंडिया आघाडीचा सेनापतीच गारद करायचा चंग बांधला आहे. ओघानेच राहुल गांधी यावेळी रायबरेली व वायनाड या दोन मतदारसंघात आपले नशीब आजमावणार अशी दिल्लीत राजकीय पंडितांत चर्चा आहे. वायनाडचे मतदान झाले की राहुल गांधी रायबरेलीतून अर्ज भरतील अशी अटकळ आहे. अमेठीतून स्मृती इराणी यांनी गेल्यावेळी त्यांना पराभूत केले होते. यंदाही तेथे स्मृती इराणी भाजपा उमेदवार असणार त्यामुळे हा परंपरागत मतदारसंघ राहुल गांधींनी सोडून दिला असे मानले जाते आहे. रायबरेली हा गांधी कुटुंबियांचा पिढ्यानपिढ्यांचा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. राहुल गांधींना निवडणुकीत आस्मान दाखवायचे असा मोदी शहा व भाजप चाणक्यांचा मनसुबा आहे तो शक्य होणार की इंडिया आघाडी तो उधळून लावणार हे बघायचे. पण, अमेठीत जसे स्मृती इराणी यांनी यश खेचून आणले तसे रायबरेलीत भाजपाने हुकमाचे पान म्हणून नुपूर शर्मा यांना ओळखले जाते. उत्तम चारित्र्य, मोठा संपर्क, ओघवते वक्तृत्व आणि कट्टर हिंदुत्व असलेल्या नुपूर तरूण आणि आश्वासक आहेत. त्यामुळे यंदा राहुल गांधी अर्ज भरतील तो मतदारसंघ लक्षवेधी ठरणार आहे. लढाईत राजा पडला की सैन्य पळून जाते ही भाजपाची त्या मागची निती आहे. त्यामुळे यंदा वायनाड आणि रायबरेली मतदारसंघ सुद्धा लक्षवेधी न ठरले तरच नवल. सर्वांचे लक्ष अशा लढतीकडे असते आणि मोदी-शहा कोणतीही निवडणूक हलक्यात घेत नाहीत. मतदानाचा दुसरा टप्पा पार पडला की अंदाज येईलच. पण, तूर्त राहुल गांधी, शरद पवार भाजपच्या निशाण्यावर आहेत तेच भाजपाचे टार्गेट आहे. चारशे पार घोषणा असली तरी लढाईतील तपशील स्पष्ट होत आहे. भाजपाने ठरवले की तसे होते असे नाही. मतदारांच्या मनात काय आहे हे महत्त्वाचे. तूर्त लढाईची रणशिंगे वाजत आहेत. याच दरम्यान महागाई वाढणार असा आरबीआयने इशारा दिला आहे. आखातातील युद्ध, हवामान बदल अशी कारणे आहेत पण, पवार, गांधींचे काय होते हे सर्वांत लक्षवेधी आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :

.